सुश्री अरूणा मुल्हेरकर
? सूरसंगत ?
☆ सूर संगत~महाराष्ट्राची लोककला – पोवाडा ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
वीर रसांतील लेखनाचा आणि गायनाचा महाराष्ट्रातील लोकप्रिय प्रकार म्हणजे पोवाडा.
पोवाड्यांत तीन प्रकारची कवने आढळतात
- देवतांच्या अद्भूत लीलांचे वर्णन,तीर्थक्षेत्रांचे महात्म्य. – >> हे गायक गोंधळी म्हणून ओळखले जातात.
- राजे,सरदार,धनिक यांचे पराक्रम,वैभव,कर्तुत्व इत्यादीचा गौरव आणि त्यांची शौर्य गाथा! ->> ह्या प्रकारातील गायक मंडळीना भाट म्हटले जाते.
- लढाई,दंगा,दरोडा,दुष्काळ,पूर आदि घटनांचे रसभरीत निवेदन. ->> ह्या प्रकारातील गायक शाहीर या संज्ञेत मोडतात.
पोवाड्याचे कार्य काही अंशी आजच्या वर्तमानपत्रासारखे होते. घडलेल्या घटनांवर शाहीर लगेचच कवने रचीत आणि पोवाड्याच्या स्वरूपात सादर करीत असत.
पोवाड्याची रचना द्दृष्य वाक्यांची प्रवाही व स्वैर पद्यात्मक असते.बोली भाषेतील जिवंतपणा,ओघ आणि लय ह्यामुळे ती प्रभावी होते.
रचना करतांना लघु गुरू मात्रा मोजल्या जात नाहीत मात्र एकेक चरण चार किंवा आठ मात्रांच्या आवर्तनात गायले जातात.
वीरश्रीयुक्त असा हा गायनाचा प्रकार असल्यामुळे गायकाचा आवाज एकदम खडा,उमदा,टीपेचा असला तरच रसनिष्पत्ती होऊन श्रोतृवृंदात एकप्रकारचा आवेश निर्माण होतो.हा प्रकार गद्य आणि पद्यमिश्रित असल्यामुळे उच्चरवातील संवाद व दमदार गायन हे पोवाड्याचे वैशिष्ठ्य आहे.
शिवाजी, महाराष्ट्राचा जाणता राजा, सर्वांना आदरणीय, त्यामुळे शिवछत्रपतींचे अनेक पोवाडे सतराव्या शतकापासून ते आज एकविसाव्या शतकापर्यंत लिहीले गेले. १६८९ साली शाहीर अज्ञानदासाने जिजाऊंच्या आदेशावरून “अफझलखानाचा वध” हा पोवाडा रचला आणि २००९ साली मी शिवाजीराजे भोसले बोलतो या चित्रपटासाठी अफझलखानाचा वध हा पोवाडा लिहिला गेला.
पोवाड्याची भाषा कशी जळजळीत,तडफदार आणि रांगडी असते त्याचा हा नमूना.
“उठला अफझलखान
जिता जागता सैतान
शिवबाला टाकतो चिरडून?
महाराजांची कीर्ति बेफाम
भल्याभल्यांना फुटला घाम
अशा वाघिणीचा तो छावा
गनिमाला कसा ठेचावा”
तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, सिंहगड, धर्मवीर संभाजी महाराज यांच्यावर लिहिलेले पोवाडे उपलब्ध आहेत.
राष्ट्र शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी तानाजीच्या पोवाड्याप्रारंभी जे नमन गायले आहे ते पहा~~
“ओम् नमो श्रीजगदंबे
नमन तुज अंबे
करून प्रारंभे
डफावर थाप तुणतुण्या तान
शाहीर हा महाराष्ट्राचा प्रान
शिवरायाचे गातो गुनगान”
ह्यावरून शाहीराची भूमिका आपल्याला समजते.
डफ,ढोलकी,संबळ,झांजा ही तालवाद्ये तसेच तुणतुणे,पूंगी,घांगळी ही तंतूवाद्ये पोवाडा गाताना साथीला घेतली जातात.
पठ्ठे बापूराव,रामजोशी,कवी अनंतफंदी,होनाजी बाळा,प्रभाकर आणि अगदी आधुनिक काळात अमरशेख,शाहीर साबळे,विठ्ठल उमप इत्यादी शाहीरांची नावे आपल्याला परिचित आहेतच.
पठ्ठे बापूरावांनी मुंबईवर पोवाडा लिहिला होता आणि संगीत सौदागर छोटा गंधर्व यांनी तो गायला होता.
वाचकांसाठी काही पंक्ति देत आहे.
“मुंबई नगरी बडी बाका
जशी रावणाची दुसरी लंका
मुंबई नगरी सदा तरनी
व्यापार चाले मनभरनी”
शाहीर विठ्ठल उमप हे आंबेडकरवादी होते.त्यांनी त्यांच्या रचनांतून अनेक सामाजिक व मानवतावादी प्रश्न मांडले. ‘खंडोबाचं लगीन’,’गाढवाचं लग्न’,’जांभूळ आख्यान’ हे त्यांचे कार्यक्रम फार लोकप्रिय झाले आहेत.
महाराष्ट्राची ही लोककला म्हणजे नुसतेच लोकरंजन नसून समाजप्रबोधनही आहे.
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈