सुश्री आसावरी केळकर-वाईकर
☆ सूर संगत (भाग – ३) – राग देशकार ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆
दीप्तिमान देशकार
एकाच आरोह-अवरोहातून अनेक राग निर्माण होताना जी संकल्पना ‘की रोल’ निभावते ती म्हणजे रागाचा वादी व संवादी स्वर! तर आज, रागाचा वादी स्वर व संवादी स्वर म्हणजे काय? हे समजून घेण्यापासूनच सुरुवात करूया. रागात सर्वात जास्त महत्व ज्या स्वराला दिलं जातं, सर्वात जास्त प्रमाणात सातत्यानं जो स्वर रागविस्तारात वापरला जातो त्याला त्या रागाचा वादी स्वर म्हणतात आणि वादी स्वराच्या खालोखाल जो स्वर महत्वाचा असतो त्याला संवादी स्वर असं म्हणतात.
थोडक्यात रागाच्या राज्यातला राजा म्हणजे वादी स्वर आणि प्रधान म्हणजे संवादी स्वर! आता कोणत्याही दोन व्यक्तींनी स्वत:ला राजा आणि प्रधान म्हणवून घेतल्यानं म्हणजे फक्त आम्ही महत्वाचे आहोत व बाकी कुणीच नाही असं म्हटल्यानं राज्यकारभार चालू शकेल का? तर नाही! इतर पदाधिकारी सकृतदर्शनी थोडीशी कमी महत्वाची का होईना पण आपापली जबाबदारी नीट सांभाळत असतील तरच राज्य सुरळीत चालेल, प्रजा सुखात नांदेल. त्याचप्रमाणे रागाच्या इतर स्वरांच्या पार्श्वभूमीवरच, त्यांच्यासोबत एका धाग्यात गुंफले जात असतानाच खुलून येणारं ठराविक वादी-संवादी स्वरांचं प्रामुख्य एक राग निर्माण करतं.
वादी-संवादी स्वरांशिवाय रागातील इतर स्वरांपैकी काही स्वरही भरपूर प्रमाणात वापरले जातात, तर काही मध्यम प्रमाणात आणि काही अत्यल्प प्रमाणात! त्या-त्या रागस्वरूपानुसार हे प्रमाण ठरतं. विशेष म्हणजे मुळातच निर्गुण-निराकार असलेल्या सुराला मोजमापांची परिमाणं कशी लावणार!? त्यामुळं प्रत्येक रागातील स्वरांच्या वापराचं हे कमी-जास्त प्रमाण आणि वापराची पद्धती ही गुरूसमोर बसून त्यांनी आपल्याला शिकवताना, रागस्वरूप समजावत गायलेला/वाजवलेला राग ऐकून आणि समजून-उमजून घेऊनच जाणून घेता येते. कागदोपत्री अशा बारकाव्यांची कितीही नोंद करून ठेवली तरी प्रत्यक्ष गुरूमुखातून ऐकल्याशिवाय ह्या गोष्टींचे अर्थ अजिबात कळत नाहीत. म्हणून तर आपल्या रागसंगीताला गुरूमुखी विद्या म्हटलं गेलं आहे.
मागच्या लेखात उल्लेखिलेल्या भूपाच्या संदर्भानेच आजचा विषय पुढे जाणार आहे. आता आपण भूपाविषयी बोलतोय आणि त्यात पाच सूर आहेत तर त्यानुसार कल्पना करूया. समजा, अगदी एकसारखं काढलेलं निसर्गचित्र काही जणांना रंगवायला दिलं. त्यासाठी पिवळा, निळा, लाल, हिरवा, जांभळा असे पाच एकसारखे रंगही त्यांना दिले. मात्र कुठे, कोणता रंग, किती प्रमाणात व कोणत्या पद्धतीनं वापरायचा ह्याचं स्वातंत्र्य रंगवणाऱ्याला दिलं. अर्थातच रंगवून आलेल्या चित्रांपैकी एखाद्या चित्रात पिवळ्या आणि हिरव्या रंगाचा जास्त वापर असेल, एखाद्या चित्रात निळा आणि पिवळ्याचा प्रभाव असेल, एखाद्यात लाल आणि हिरवा ठळक असेल तर एखाद्यात पिवळा आणि जांभळा उठून दिसत असेल आणि त्याशिवायच्या इतर तीन रंगांच्या वापराच्या कमी-जास्त प्रमाणातही फरक असेल.
आता एकच चित्र, एकसारख्या पाच रंगात रंगवलेलं असूनही रंगसंगतीतलं रंगांचं कमी-जास्त प्रमाण प्रत्येक चित्राला वेगळं रूप देईल, प्रत्येक चित्राचा `इफेक्ट’ वेगळा असेल, प्रत्येक चित्र पाहाताना बघणाऱ्याच्या मनात उमटणारे भाव वेगळे असतील कारण एकूण रंगसंगतीमुळे चित्राचा होणारा अंतिम परिणाम वेगळा असेल. हेच उदाहरण अगदी एकसारखेच आरोह-अवरोह असणारे वेगळे राग कसे निर्माण झाले, ही गोष्ट समजून घेण्यासाठी उपयोगी पडेल. रंगांची संख्या सहा किंवा सात केली की हीच गोष्ट आरोह-अवरोहात सहा किंवा सात सूर असतील तेव्हांही लागू पडेल.
वरच्या सर्व परिच्छेदांतील संदर्भ जोडून पाहिले असता एकच आरोह-अवरोह असणारे दोन किंवा त्याहून जास्तही राग कसे असू शकतात ह्याबाबत ढोबळमानाने कल्पना यायला हरकत नाही. आता भूपाचा‘च’ आरोह-अवरोह असणारे आणखी दोन राग म्हणजे एक प्रचलित असलेला ‘देशकार’ आणि दुसरा अप्रचलित ‘जैतकल्याण’! त्यापैकी आज आपण देशकाराविषयी जाणून घेऊया. मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे `ग’ आणि `ध’ हे भूपाचे अनुक्रमे वादी-संवादी स्वर अगदी उलट होऊन देशकारात येतात, म्हणजेच देशकारात ‘ध’ हा वादी आणि ‘ग’ हा संवादी होतो. अर्थातच या दोन्ही स्वररंगांच्या वापराचं प्रमाण तर बदलतंच शिवाय इतर स्वरांच्या वापरातही फरक पडतो आणि दोन्ही रागस्वरूपं पूर्ण भिन्न होऊन जातात. तेच रेखाटन(राग उभा करण्याचा ढाचा) त्याच रंगांच्या(तेच आरोह-अवरोह) कमी-जास्त प्रमाणातील ( वादी-संवादी व इतरही स्वरांचं प्रमाणमहत्व) वापरामुळं बघणाऱ्याच्या मनात वेगळे भाव उमटवतं (ऐकणाऱ्याच्या मनात वेगळे भाव निर्माण करतं)…. एकूणात वेगळा परिणाम साधतं!
भूप आणि देशकाराचा विचार करताना वादी-संवादी तर बदलतातच, शिवाय रिषभाचं प्रमाण हे भूपात व्यवस्थित थांब्याचं आहे तर देशकारात अल्प आहे. भूपाची प्रकृती पुन्हापुन्हा गंधाराकडे वळणारी(अधोगामी) आणि देशकाराची प्रकृती सातत्याने धैवताचा ध्यास घेणारी(उर्धवगामी) आहे. म्हणूनच भूप पूर्वांगप्रधान तर देशकार उत्तरांगप्रधान आहे. दोन्ही रागांचा थाटही वेगळा आहे, भूप ‘कल्याण’ थाटातील तर देशकार ‘बिलावल’ थाटातील राग आहे. ह्या दोन्ही रागांची गाण्याची वेळही वेगळी… भूप रात्रीचा पहिल्या प्रहरातला आणि देशकार दिवसाच्या दुसऱ्या प्रहरात गायला जाणारा! ह्या सर्व संज्ञांचा व संकल्पनांचा अर्थ पुढच्या लेखांमधे हळूहळू येणार आहेच. शब्दमर्यादेमुळे आणि विषयाच्या भव्यतेमुळे सगळ्याच गोष्टी एका लेखात उलगडणे शक्य नाही.
ह्या दोन्ही रागांचा विचार करताना मला असं जाणवतं कि सूर्य उगवण्यापूर्वी आणि मावळण्यापूर्वी अनेक रंग आभाळभर पसरलेले असतात. मात्र उगवतीच्या रंगांमधे उषेची चाहूल असते, त्यावेळच्या सूर्यकिरणांच्या प्रखरतेचा प्रभाव दिवस/कामकाज जोमानं सुरू होणार असल्याची चाहूल देतो, आपल्यापर्यंत गतिमान वलयं पोहोचवतो जेणेकरून आपणही ती गतिमानता आत भरून घेऊन कामकाजाला लागतो. याउलट मावळतीच्या रंगामधे निशेची चाहूल असते. अस्ताचलाला चाललेल्या सूर्यकिरणांतली सौम्यता आपल्याला विसाव्याची चाहूल देते, कामकाज थांबवत शांततेत रमण्याचे वेध देते. अगदी त्याचप्रकारे रात्री गायला जाणारा भूप मला शांत प्रकृतीचा वाटतो आणि त्या तुलनेत देशकारात एक गतिमान सळसळ जाणवते.
रागसंगीताशिवाय विचार करताना देशकाराची आठवण करून देणारी दोन नाट्यपदं पटकन माझ्या मनात आली, जी आपण सर्वांनीच निश्चितच बऱ्याचदा ऐकली असणार… संगीत मंदारमाला नाटकातील ‘जयोस्तुते हे उषादेवते’ आणि संगीत सौभद्र मधील ‘प्रिये पहा’! पं. जितेंद्र अभिषेकींची ‘माझे जीवन गाणे’ ही अप्रतिम रचनाही आठवली. मात्र आता एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कि अशा एकसारखे स्वर वापरले गेलेल्या रागांमधे उपशास्त्रीय किंवा सुगम संगीतातील नेमकी एखादी रचना सांगणे कठीण असते. वरती पटकन आठवलेल्या रचना ह्या सुरवातीलाच ‘ध’चा उठाव घेऊन आलेल्या म्हणून `देशकार’चा ‘फील’ देणाऱ्या म्हणता येतील. पण प्रत्येकवेळी रागानुसार स्वरांच्या वापराचं कमी-जास्त प्रमाण नेमकेपणी सांभाळणं सुगम संगीतात घडेलच असं नाही, ती त्या गानप्रकाराची आवश्यकताही नाही आणि तिथं स्वरांचे ठहराव, अल्प-बहुप्रमाणत्व सांभाळण्याएवढं अवकाश (स्पेस) मिळणंही शक्य नसतं. क्वचितच ठराविक रागांबरहुकूम बांधल्या गेलेल्या अशा उपशास्त्रीय किंवा सुगम रचना आढळतील.
एक जरूर सांगावंसं वाटतं, भूप आणि देशकार एका पाठोपाठ एक ऐकून पाहिले (कोणत्याही एकाच कलाकाराचे दोन्ही राग ऐकले तर कळायला आणखी उत्तम!) तर दोन्हीवेळी काही वेगळी जाणीव होते का, हे जिज्ञासू श्रोत्यांना समजू शकेल. एकाग्रतेने ऐकताना तशी काही वेगळी अनुभूती आली तर मलाही जरूर कळवावे, जाणून घ्यायला नक्की आवडेल व आनंदही वाटेल!
© सुश्री आसावरी केळकर-वाईकर
प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत (KM College of Music & Technology, Chennai)
मो 09003290324
ईमेल – [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈