सुश्री आसावरी केळकर-वाईकर
☆ सूर संगत – भीमसेन जोशी ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆
कंठात दिशांचे हार
निळा अभिसार
वेळुच्या रानी
झाडीत दडे
देऊळ गडे, येतसे
जिथुन मुलतानी
— कविवर्य ग्रेस
ह्या गूढ शब्दचित्रांतून ऐकू येणारा पवित्र पण घनगंभीर सूर मला भीमसेनजींच्या सुरासारखा भासतो.
ज्या वयात मुलं सवंगड्यांशी खेळण्यात रममाण असतात त्या अवघ्या अकराव्या वर्षी सुराचा ध्यास घेऊन गुरूच्या शोधात पंडितजी कर्नाटकातील गदग येथून घर सोडून निघाले. केवळ तो ध्यास त्यांना ‘मैफिलीचा बादशहा’ होण्यापर्यंत घेऊन गेला आणि हा मैफिलीचा बादशहा भारतीयांच्या गळ्यातील ताईत तर झालाच, शिवाय शास्त्रीय संगीतातील ख्याल गायनशैली जगभरात पोहोचवण्याचं महान कार्य त्यांनी केलं. अर्थात, तिथवर पोहोचण्याचा मार्ग सुलभ नव्हता. मात्र नियतीनं त्यांना सुराचा जो ध्यास दिला होता तो सूर त्यांना सापडावा हीसुद्धा तिचीच योजना होती.
रिक्तहस्तानं अंगावरच्या कपड्यानिशी गुरूच्या शोधात बाहेर पडलेल्या ह्या लहानग्या भीमसेनला जशी बऱ्याचदा परिस्थितीची ठोकर खावी लागली तसेच काही आधाराचे हातही लाभले. त्यात दोन भजनं म्हणून दाखव मग तुला पोटाला दोन घास देत जाईन’ असं म्हणणारा समृद्ध विचारांचा अन्नापदार्थांचा गाडीवाला असो किंवा काही कालावधीनं थोड्याफार मार्गदर्शनाचा लाभ झाल्यावर भीमण्णांनी रियाज सुरू केला तेव्हां ‘रोज इतका रियाज करतोस तर ताकद टिकून राहाण्यासाठी हे घ्यायलाच पाहिजे’ असं म्हणून आपल्या गायीचं निरसं दूध त्यांना आग्रहानं प्यायला लावणारी गंगव्वा असो!
अगदी लहानपणी जानप्पा कुर्तकोटी, माधव संगीत विद्यालयातील कृष्णराव पंडित व राजाभैया पूछवाले ह्यांच्याकडून लाभलेल्या थोड्या ज्ञानासोबत बाहेर पडलेल्या पंडितजींना त्यांच्या भ्रमंतीत ग्वाल्हेरचे सुप्रसिद्ध सरोदवादक हाफिज अली खान, खडकपूरचे केशव लुखेजी, कलकत्त्यचे पहाडी सन्याल, दिल्लीतील चांदखान साहेब, जालंधरचे अंध धृपदिये मंगतराम अशा अनेक लोकांचं शिष्यत्व पत्करून जमेल तेवढा ज्ञानार्जनाचा प्रयत्न केला. शेवटी जालंधरच्या संगीतसंमेलनात भेटलेल्या पं. विनायकबुवा पटवर्धनांनी त्यांना सल्ला दिला की, ‘तुमच्या स्वत:च्या गावाजवळच कुंदगोळ येथे सवाई गंधर्व राहातात, त्यांच्याकडं तालीम घ्या.’ त्यांच्या सल्ला मानून पंडितजी घरी परतले आणि सवाई गंधर्वांकडं त्यांची तालीम सुरू झाली. सुरुवातीला भीमसेनजींना विशेष काही न शिकवता त्यांच्या निष्ठेची फक्त चाचपणी सुरू होती. मात्र त्यांची प्रामाणिक लगन लक्षात आली तसं सवाई गंधर्वांनी ह्या शिष्याला मनापासून घडवायला सुरुवात केली. सुरुवातीला एक वर्ष एकाच रागाची तालीम सुरू होती. नंतर आलापीप्रधान असलेल्या किराणा घराण्याच्या सर्व प्रमुख रागांची तालीम दिली गेली. पुढच्या कालावधीत एक वर्षभर रामपूरला उस्ताद मुश्ताक हुसेन खान साहेबांकडेही भीमसेनजींनी तालीम घेतली.
एक असामान्य कलाकार अस्तित्वात येताना त्याची ज्ञानलालसा किती पराकोटीची असते ह्याचं नेमकं उदाहरण म्हणजे पंडित भीमसेन जोशी! आपल्याला देहभान विसरायला लावणारा दमदार सूर ‘कमावताना’ पंडितजींनी ज्ञानार्जनासाठी किती मार्ग चोखाळले, किती कष्ट सोसले आणि केवढी साधना केली हे फक्त त्यांचं तेच जाणोत! स्वत: हे सगळं सोसून रसिकांना अलगद वेगळ्या विश्वाची सफर घडवून आणण्याऱ्या आपल्या लाडक्या पंडितजींचं न फेडता येण्यासारखं ऋण आपल्यावर आहे. शास्त्रीय संगीताबरोबरच ‘संतवाणी’चा प्रवाह स्वत:च्या संगीतात सामावून घेतल्यानं भारताच्या कानाकोपऱ्यात, प्रत्येक मनात त्यांनी घर केलं. त्यांच्या ‘संतवाणी’वर लोकांनी अलोट प्रेम केलं. याशिवाय ठुमरी, कन्नड भजनं, हिंदी भजनं, भावगीत इ जे जे प्रकार त्यांनी हाताळले ते सगळेच त्यांनी ‘कमावलेल्या’ दमदार, बुलंद आवाजानं झळाळून उठले.
स्वत:च्या गुरूंच्या नावानं त्यांनी सुरू केलेला आणि अखंड सुरू राहून आता सत्तरीच्या उंबरठ्याशी आलेला सवाई गंधर्व महोत्सव म्हणजे त्यांच्या गायकीच्या बरोबरीनं संगीतक्षेत्राला लाभलेलं त्यांचं आणखी एक योगदान आहे. हे व्यासपीठ निर्माण करून शास्त्रीय संगीतातील गुणी कलाकारांना रसिकांसमोर येण्याची केवढी मोठी संधी त्यांनी प्राप्त करून दिली. एका ध्येयानं प्रेरित होऊन गुरूंच्या मार्गदर्शनाखाली मनापासून वर्षानुवर्षं साधना करणारे निष्ठावंत कलाकार मैफिलीत गाण्याएवढे तयार झाले असं त्यांच्या गुरूंना वाटलं की ‘सवाई गंधर्व महोत्सवा’पासून त्यांच्या यशस्वी कारकिर्दीला सुरुवात व्हायची. `तिथं गाणार आहे म्हणजे चांगला अभ्यासू कलाकारच असणार’ हे गणितच ठरून गेलं होतं. भीमसेनजींच्या पुढच्या पिढीतील आजच्या सर्व नावाजलेल्या कलाकारांचं ‘नावारुपाला’ येणं त्यांच्या आशीर्वादानं ह्या व्यासपीठावरूनच सुरू झालं असावं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. स्वत: कलाकार असूनही सर्व कलाकारांना एकत्र आणणारा असा संगीतसोहळा सातत्यानं करत राहाणं हे त्यांच्या गायकीइतक्याच विशाल असलेल्या त्यांच्या मनोवृत्तीचं द्योतक आहे. अशा सर्वार्थानं संपन्न ‘भारतरत्ना’स सादर वंदन!
© आसावरी केळकर-वाईकर
प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत (KM College of Music & Technology, Chennai)
मो 09003290324
ईमेल – [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈