सुश्री अरूणा मुल्हेरकर
☆ सूर संगत ☆ सूर संगीत 3 – भीमपलासी ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆
“मेल न हर प्रिय चतुर मिलावत
रागनि भीमपलासि कहावत।
आरोहनमे रि ध न लगावत
सुर वादी मध्यमको बनावत
समय तृतीय दिन प्रहर कहावत ।।”
भीमपलासि या रागाचे थोडक्यांत वर्णन करणारे हे गीत. शास्रीय संगितात अशा गीतांना लक्षणगीत अशी पारंपारिक संज्ञा आहे.
मागील लेखांत काफी थाटांतील काफी या जनक रागासंबंधी विवेचन केल्यानंतर त्याच थाटांतून उत्पन्न झालेल्या भीमपलासि या रागाविषयी काही सांगावेसे वाटते.
शास्राःनुसार काफी थाटाचे सा रे ग(कोमल) म प ध नि(कोमल) असे स्वर असतात, त्यामुळे भीमपलासि राग कोमल गंधार व निषाद घेऊनच सादर करायचा असतो. सहाजिकच अनभिज्ञ व्यक्तीस प्रश्न पडेल असे असतांना काफी आणि भीमपलासि हे दोन राग भिन्न कसे? त्याचे उत्तर असे की वर लक्षणगीतांत सांगितल्याप्रमाणे भीमपलासीच्या आरोहांत रिषभ व धैवत वर्ज्य आहेत. म्हणजे
नि(मंद्र कोमल) सा ग(कोमल) म प नि(कोमल)सां ~ आरोह
सां नि(कोमल) ध प म ग(कोमल) रे सा ~ अवरोह.
याप्रमाणे आरोहांत पांच व अवरोहांत सातही स्वर असल्यामुळे या रागाची जाति ओडव संपूर्ण आहे. मानव निर्मित जातींप्रमाणेच शास्रकारांनी स्वरांच्या संख्येनुसार रागांच्या जाति ठरविल्या आहेत. पांच स्वरांचा राग ओडव, सहा स्वरांचा षाडव आणि सात स्वरांचा संपूर्ण.
वादी मध्यम आणि संवादी षडज.पंचम हा स्वर ह्या रागाचे बलस्थान आहे. हा राग सादर करतांना कलावंत ह्या तीन स्वरांभोवती करामत करून आपले नैपुण्य रसिकांपुढे प्रदर्शित करीत असतो. वानगी दाखल हे काही स्वरसमूह पहावेत.
प(मंद्र)नि(कोमल)सा~ प(मंद्र)नि(कोमल) सा ग(कोमल) रे सा~
नि(मंद्र कोमल)सा ग(कोमल) म प~~
ग(कोमल) म प नि(कोमल) ध प~~
ध म प ग(कोमल) म ग रे सा~~
अतिशय विस्ताराने पेश करण्यासारखा हा राग असल्यामुळे बडा ख्याल, छोटा ख्याल,अशा प्रकारे मैफीलीत हा राग प्रस्तूत केला जातो.
अब तो बडी बेर भई
वारि बेगुमान न करिये सजनी साहेब को तो डरिये या विलंबित लयीतील पारंपारिक बंदिशी आजही प्रचलित आहेत. तसेच “गोरे मुखसो मोरे मन भाई, बिरजमे धूम मचायो शाम, जा जा रे अपने मंदरवा या मध्य लयीतील बंदिशी खूपच गोड वाटतात.
रागदारी संगीतात आज आपल्या माहितीप्रमाणे बंदिशींचे दोन भाग असतात. पुर्वार्ध म्हणजे स्थाई आणि उत्तरार्ध म्हणजे अंतरा! परंतु १७/१८व्या शतकांत बंदिशींचे चार भागांत सादरीकरण होत असे. १) स्थाई २) अंतरा ३) संचारी ४) आभोग. या भीमपलासि रागांतही अशा प्रकारच्या बर्याच बंदिशी आढळतात. त्या प्रामुख्याने चौताल, आडाचौताल, धमार या तालांत बंदिस्त असतात.
रागदारी बरोबरच भजन, अभंग ह्या गीतप्रकारांसाठी हा राग विशेष उचित वाटतो.
माणिक वर्माजींचे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, विजय पताका श्रीरामांची झळकते अंबरी ही प्रसिद्ध भक्तीगीते भीमपलास रागांतीलच आहेत.संत कान्होपात्रेचा अभंग अवघाची संसार सुखाचा करीन हाही भीमपलासच!
भक्तीरसाचा परिपोष करणारा असा हा राग अतिशय सुमधूर आहे. संगीतांतील विविध घराणी उदाहरणार्थ किशोरीबाईंचे जयपूर अत्री घराणे, भिमसेनजींचे किराणा, जसराजचींचे मेवाती आपापल्या नियमांनुसार जेव्हा राग प्रदर्शन करतात तेव्हा सुरांची क्षमता रसिकांच्या लक्षांत येते. कसेही असले तरी संगीत ही एक दैवी शक्ति आहे आणि त्याचा योग्य तो परिणाम मानवी मनावर झाल्याशिवाय रहात नाही.
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈