मराठी साहित्य – ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ☆ कविता – जर ….! ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

 

हमारे लिए यह गर्व का विषय है कि  ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, उस्मानाबाद  में वरिष्ठ मराठी साहित्यकार सुश्री प्रभा सोनवणे  जी की गरिमामय काव्य प्रस्तुति निमंत्रित कवि सम्मलेन  में आज 12 जनवरी 2020 को दोपहर 12 बजे से 2 बजे के सत्र में  मंडप – 2 सेतुमाधवराव पगड़ी साहित्यमंच पर सुनिश्चित की गई है। आप आज इस अभूतपूर्व अखिल भारतीय कार्यक्रम में अपनी कविता  ‘जर…..’ प्रस्तुत कर  रहीं हैं । हम आपकी यह रचना ससम्मान अपने पाठकों  के साथ साझा करने जा रहे हैं। )

इस गरिमामय प्रस्तुति के लिए ई-अभिव्यक्ति की ओर से हार्दिक शुभकामनायें

☆ जर….. ☆ 

जर मी जगलेच सत्तर वर्षे….

तर लिहिन एका म्हाता-या परीची कथा…

कुणाला आवडो न आवडो…

त्यात असेल एक गाव….

परीकथेतला….

आजोबा म्हणायचे,

“तुम्ही काहीही  सांगाल, आम्हाला खरं वाटलं पाहिजे ना ? ”

 

परी सांगेल तिची खरीखुरी कहाणी,

परीकथेत असतील इतरही प-या,

यक्ष ,जादू च्या छड्या, चेटकिणी,

घडेल काही आक्रित,

नियती वाचवेल प्रत्येकवेळी परीला…..

परीला पडतील स्वप्न….अगदी साधीसुधी….

ती खेळेल भातुकलीचा खेळ

बाहुला बाहुलीचे लग्न ही लावेल….

 

ती हरवेल कधी जंगलात, कधी गर्दीत….

तिला सापडणार नाहीत हवे ते रस्ते…

ती रस्ता चुकेल, रडेल,

दुखेल, खुपेल तिलाही…

ती सहन करेल तोंड दाबून बुक्क्यांचा मार…

 

आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनाविरुद्ध च घडणार आहे,

हे माहित असूनही,

ती लावेल पत्त्यांचे

नवे नवे डाव आणि हरत राहिल वारंवार!

 

परी सांगेल तिची खरीखुरी कहाणी, गाईल गाणी,

खेळेल  ऐलोमा पैलोमा….

 

ती करेल स्वयंपाक, थापिल भाकरी, कधी सुगरण असेल ती तर कधी करपेल तिचा भात,पोळी कच्ची राहिल,

आडाचं पाणी काढायला जाताना…तिचे पडतील ही दोन दात…

केस पांढरे होतील, सुरकुत्या पडतील चेह-यावर…..

परी म्हातारी होईल, तरीही तिला काढावसं वाटेल आडाचं पाणी….

कुणी म्हणेल ही सहजपणे….

“धप्पकन पडली त्यात”

ती पडेल आडात,पाण्यात की खडकावर माहित नाही…..

तिने हातात गच्च धरून ठेवलेला शिंपला पडेल त्याच आडात…

 

आणि आजूबाजूच्या फेर धरणा-या तरूण प-या म्हणतील….

आडात पडला शिंपला…..तिचा खेळ संपला!

 

जर मी जगलेच सत्तर वर्षे तर लिहिन एका म्हाता-या परीची कथा…..

जी आली होती जन्माला बाईच्या जातीत…..आणि मेली ही बाई म्हणूनच!

 

आणि ही कथा तुम्हाला नक्कीच खरी वाटेल

परीकथा असूनही..

 

© प्रभा सोनवणे 

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

 

आदरणीया सुश्री प्रभा सोनवणे जी का अति-लोकप्रिय मराठी साप्ताहिक स्तम्भ “कवितेच्या प्रदेशात”  शीर्षक से प्रत्येक बुधवार को नियमित रूप से प्रकाशित होता है।