कविराज विजय यशवंत सातपुते
(समाज , संस्कृति, साहित्य में ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले कविराज विजय यशवंत सातपुते जी की सोशल मीडिया की टेगलाइन “माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं। आज प्रस्तुत है भारत वर्ष में स्त्री शिक्षा में क्रान्ति लाने वाली महान स्त्री शक्ति सावित्री बाई फुले पर आधारित उनकी काव्यात्मक अभिव्यक्ति फुले विद्यापीठ .. . . . ! )
☆ फुले विद्यापीठ .. . . . ! ☆
(श्री विजय सातपुते जी की फेसबुक वाल से साभार )
तव्यावर भाकर भाजता भाजता
ज्योतिबाच्या इच्छेखातर,
गिरवाया शिकली अक्षर
कधी पिठात. . तर कधी. . धूळपाटिवर. . . !
लिवाय शिकली. . . वाचाय शिकली,
तवा उमगलं माता सावित्रीला ..
या समाजानं अज्ञानाच्या चुलाण्यावर
रांधलेला रूढी परंपरेचा तवा .. .
तापायला नगं . . . तळपायला हवा. . . !
बाईवर लादलेली , पिढ्या पिढ्यांची . .
वर्तुळाकार बंधन . . . तिची तिनच मोडाया हवी. !
चूल नी मूल, यात गुतलेली बाई
परीघाच्या बाहेर पडायला हवी.
भाकर थापणारी बाई , साक्षर व्हायला हवी.
अशी सोत्ता साक्षर झालेली साऊ, घरा घरात पोचली.
तिच्या भाषणातून बोलायची ती.. .
”बाई तुझी दोन घर हाईत . .
एक मनातलं… आन् दुसर जनातलं . . . !
जनातल्या घरासाठीच जलमते तू . . .
आन् घरातल्या घरातच मरतेस तू. . . . !
पर बाई , तुझ्या काळजातल्या घराचं काय ?
त्याला बी गरज हाय . . . अन्नाची नाय ज्ञानाची .
गरज हाय आता, घराच घरपण राखायची. . . !
बाई तू फकस्त ‘बाई ‘ नाय ‘बाईमाणूस ‘ हाय.
आता बायांनो, चुलीतला जाळ नाय
मनातला जाळ फुलवायचा. . . !
निस्ती बाई नाय, बाईमाणूस जगवायचा . . . !
आता एकटीने नाय,एक जुटीन संसार रांधायचा. . . !
काळ्या पाटीचा चौकोनी तवा
माणूस वाचत गिरवायचा …!”
घरातल्या बाईला साक्षर करीत
घर जिवंत ठेवणार्या, भाकरीच्या पिठात
माता सावित्रीने, ज्ञानाचं पीठ पेरलं.
अडाण्याला ज्ञान दिलं ,विचारांच दान दिलं .
तवापासून बाईमाणसाला , शिक्षण क्षेत्र खुलं झालं.
समाजात प्रगती झाली, शिक्षणात क्रांती झाली.
म्हणूनच विद्येच्या माहेरी, या पुण्यात,
पुणे विद्यापीठाचं , फुले विद्यापीठ झालं .
माता सावित्रीचं , ‘फुले विद्यापीठ ‘ झालं. . . . !
© विजय यशवंत सातपुते
यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी, सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.
मोबाईल 9371319798.