स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’
☆ कवितेचा उत्सव ☆ हुकूमशहा ☆ कवी…कुसुमाग्रज ☆
हुकूमशहांचे
काचमहाल
सत्तेच्या आणि संपत्तीच्या
उन्मादाने ओथंबलेले,
जन्म देतात
असामान्यतेच्या आविर्भावातून
अमानुष बलात्कारांना;
पण तोपर्यंतच,
जोपर्यंत सामान्य माणूस
रस्त्यातला
जंगलातला
शेतातला,कारखान्याला
उठत नाही जाळ होऊन
आणि करीत नाही चुराडा
दगडांचा वर्षाव करून
त्या बिलोरी ऐश्वर्याचा.
संस्कृतीच्या व्यवहारात
हा एक दिलासा आहे
की सामान्य माणूस
कधीही मरत नाही
कितीही मारला तरी.
– स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’
≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈