सौ राधिका भांडारकर

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “शोध” – मूळ लेखिका सुश्री मधु कांकरिया – अनुवाद – सुश्री उज्ज्वला केळकर ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर ☆ 

पुस्तकाचे नांव…. शोध

मूळ लेखिका .. सुश्री.मधु कांकरिया

अनुवाद    ..    सुश्री. उज्ज्वला केळकर

प्रकाशक         मिलींद राजाज्ञा

किंमत………..रु.३८०/—

 

सौ. उज्ज्वला केळकर यांनी अनुवादित केलेला सुश्री मधु कांकरिया यांचा मूळ हिंदीत असलेला ‘शोध‘ हा कथासंग्रह नुकताच वाचला आणि त्यावर मनापासून लिहावेसे वाटले.

या कथासंग्रहात एकूण १४ कथा आहेत. सर्वच कथा विषय, भाषा, मांडणी या अनुषंगाने दर्जेदार आहेत.विविध विषयांवरच्या आणि जीवनाचे अंतरंग उलगडणार्‍या या कथा आहेत. एकेक कथा वाचताना मनाला धक्के बसतात.वार होतात. मात्र प्रत्येक कथेत दडलेलं एक सूक्ष्म वास्तव मनाच्या जाणीवा रुंद करते.

या पुस्तकाची जमेची बाजू म्हणजे ,उज्ज्वलाताईंच्या भाषेचा प्रचंड प्रभाव. अत्यंत तेजस्वी लयदार भाषा. आपण वाचतो ती मूळकथा नसून अनुवाद आहे हे विसरायला लावणारी आणि कथेच्या मूळ गाभ्यापर्यंत सहज घेऊन जाणारी…अत्यंत समर्थ,  ताकदवान भाषा…. यात थोडीही अतिशयोक्ती नाही आणि अतिरिक्त प्रशंसाही नाही. खरं म्हणजे उज्ज्वलाताईंच्या प्रत्येक अनुवादित लेखनात हे सामर्थ्य जाणवते. आणि त्यामुळेच इतर भाषेतलं उत्तम साहित्य त्याच रंगरुपात वाचायला मिळते.हे उज्ज्वलाताईंच्या लेखणीचे यश आहे…

हे पुस्तक वाचताना माझी मनोवस्था ही ,प्रत्येक कथेच्या वाचनानंतर काहीशी स्तब्ध झाली. कथा सर्वार्थाने पचनी पडायला, उमजायला,त्याचा गाभा शोधताना काही क्षण लागले.. वाक्यावाक्यापाशी मन रेंगाळले.

या संग्रहातील पहिलीच कथा अन्वेषण. मॅथ्यु नावाच्या फादरच्या मानसिकतेची ही कथा आहे. एक आदर्श संचालक, शाळेचा  कर्तव्यदक्ष, प्रामाणिक संचालक, विद्यार्थ्यांशी अत्यंत आपुलकीचे नाते असणारा, सन्यस्त, वितरागी, धर्मपरायण. पण एका तरुणीच्या प्रेमपत्राने त्यांची ही आंतरिक सत्ता पार हादरून जाते. मन अशांत होते. एक वासनांची तृष्णा जाणवते. तेव्हांच ते निर्णय घेतात. पाद्रीत्वाचा त्याग करायचा. आपला कॅसाॅक उतरुन एक सामान्य माणूस बनायचे…हा या कथेचा मूळ भाग. अप्रतीम कथा वाचल्याचा अनुभव वाचकाला मिळतो.

“..ऐक वत्सा* ही कथा तर काळीज पिळवटून टाकते. या कथेत एक बाप आपल्या तरुण मुलाला, त्याच्या आईच्या ममत्वाचे एकेक कंगोरे उघडून दाखवतो. जे, परदेशी वास्तव्य असणार्‍या, स्वावलंबन आणि आत्मनिर्भरतेच्या अवास्तव कल्पना बाळगणार्‍या अहंकारी मुलाच्या डोक्यातही उतरत नाहीत. नुकतंच आजीपण मिळाल्याने त्या आनंदात पूर्णपणे डुंबलेली एक आई, मात्र या मऊ ,कोमल  स्त्रीमनाचा लेकाकडून अपमान, पाणउतारा होत असतो. ते पाहून  बाप आपल्या मुलाला म्हणतो, ”अरे ! मेल्यानंतर तिची चिरफाड केली तर तिने नातवासाठी जपलेली  अंगाई गीते तिच्या कंठातून फुटून बाहेर पडतील..”. हे वाक्यं वाचल्यावर अंगावर सरसरून काटा उभा राहिला.

या संग्रहातील शीर्षक कथा “शोध“  ही एका शोधाचीच कथा आहे.

प्रणीता नावाची एक अनाथ मुलगी.. एका सरकारी हॉस्पिटलमधे जन्मलेली.. . तिची आई ती दहा दिवसाची असतानाच, तिला बास्केटमधे ठेवून, एका चाईल्ड केअरमधे सोडते. बास्केटमधे तिचा जन्मदाखला ठेवते. त्यांत आईचे सूर्यबाला हे नाव असते. मात्र वडीलांचे नाव नसते. तिथून तिची पाठवणी बालआनंद आश्रमात होते. तिथून फर्नांडीस नावाचं डच दांपत्य तिला युरोपमधे घेऊन जातात. अत्यंत प्रेमाने वाढवतात. मोठी झाल्यावर तिच्या रंगरुपामुळे, हेच काआपले आईवडील-या विचाराने ती साशंक होते. व्याकूळ होते. जेव्हां तिला तिच्या भारतीयत्वाचं सत्य कळतं, तेव्हां ती अंतर्बाह्य खवळते. आक्रोश आणि कडवटपणाने ती भरुन जाते. आणि मग एकेका प्रश्नाच्या उत्तरासाठी बेचैन होते. तिचा जन्माचा शोध सुरु होतो. त्यासाठी ती भारतात येते .बालआनंद आश्रमातील मुलांना भेटत राहते. आणि तिच्या शोधाची सुरुवात या आश्रमातूनच होते… या शोधाचा एक धक्कादायक आणि थरारक प्रवास वाचताना मन पिळवटून जातं .. ही कथा वाचकाच्या अंत:प्रवाहाला ढवळून टाकते. कथानक वजनदार आहे, तसाच उज्ज्वलाताईंच्या अनुवादाचीही जबरदस्त पकड आहे. यातले संवाद, संवादातून झिरपणारी तत्वं, त्यातला खरेपणा आणि वास्तविकतेची जाण देतात—” ती जर माझी आई नव्हती तर ती इतकी घाबरली का मला पाहून.. कदाचित मी तिची मुलगी नव्हते. तिची लज्जा होते. घृणा होते…..”  हे प्रणीताच्या मनातले  बोल काळजावर ओरखडे ओढतात. जे संवेदनशील आहेत, ज्यांच्या जाणीवा टोकदार आहेत त्यांच्यासाठी हा कथासंग्रह म्हणजे भरण पोषण आहे. यात  कल्पनेतला उदात्तपणा नसून व्यावहारिक सत्याचा आरसा आहे….

प्रत्येक कथेवर भाष्य करुन वाचकांची उत्सुकता, आनंद कमी करण्याचा माझा मानस नाही…

प्रत्येक कथेतील विषय आणि उत्कृष्ट मांडणी हे या पुस्तकाचं वैशिष्ट आहे.

यात दहशतवाद, मिलीटरी आणि आतल्या माणसाचे दर्शन घडवणारी कथा आहे.

विधवा भावजयीने वाचलेली, तिच्या शहीद पतीच्या भावाची, मनातलं सांगणारी डायरी आहे…

पहाडावर जीवनाचा अर्थ शोधत, अनवाणी फिरणारे महावीर आणि कष्टदायी अस्थिर जीवन जगणारे डोलीवाले आहेत… निसर्ग आणि कायद्याने पिचलेले हाडामासाचे देह आहेत…

एका वास्तविक जीवनगंगेतून प्रवास केल्याचाच अनुभव आहे हा…

वाचताना वेचून ठेवावीत अशी बरीच वाक्येही त्यात आहेत. थोडक्यात, एक हँगओव्हर येतो.एक कथा वाचल्यानंतर दुसर्‍या कथेत नाही शिरु शकत… जीवनाची अनेक अंगाने दाखवलेली एक अप्रतिम फिल्म.. म्हणजे “शोध“ हा कथासंग्रह..

कथेच्या पलीकडे काहीतरी असतं. माणसांच्या अंतरंगातील आंदोलनं  वाचताना मनात वादळे घोंघावतात—एकेक शब्द, एकेक संवाद, या वादळांना कवेत घेतो — कथा सरकत राहते.. आणि वाचक त्यांत पूर्णपणे डुबून जातो, हे या पुस्तकाचे फलित आहे.

उज्ज्वलाताईंनी अनुवादासाठी केलेल्या हिंदी कथांची निवड, त्यांची प्रगल्भ बुद्धिमत्ता, वैचारिक सामर्थ्य आणि अभिरुचीसंपन्नताच स्पष्ट करते. मराठी वाचकांपर्यंत या कथा पोहचविण्याची त्यांची तळमळ प्रशंसनीय आहे..!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments