सौ.ज्योत्स्ना तानवडे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “हस्व – सौ. राधिका भांडारकर ☆ परिचय – सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

पुस्तकाचे नाव — र्‍हस्व

लेखिका –राधिका भांडारकर

प्रकाशक —  शाॅपीजन

प्रकाशन — मार्च २०२३ ( प्रथम आवृत्ती )

मूल्य — रू. २४५/-

पृष्ठे — ९०

प्रसिद्ध कथा लेखिका राधिका भांडारकर यांचा पाचवा लघुकथा संग्रह र्‍हस्व नुकताच प्रकाशित झाला.  कथा लेखनावर विशेष प्रभुत्व असणाऱ्या राधिकाताईंचा हा संग्रह सुद्धा अतिशय वाचनीय झालेला आहे. या संग्रहात एकूण १३ कथा आहेत. सर्वच कथा आपल्या सर्वांच्या भावविश्वाशी सहजपणे धागा जोडतात. प्रत्येक कथा ही जीवनातल्या एकेका पैलूचे दर्शन घडवते.

सौ राधिका भांडारकर

कथा विषयांचे वैविध्यही खूपच भावते. आवर्जून उल्लेख करावा असा विषय म्हणजे स्त्रीचे ऋतुमती होणे. हा विषय तसा खुलेपणाने न बोलला जाणारा आहे. ‘ पाउल ‘ या कथेत या स्थित्यंतरातील स्त्रीची भावनिक आंदोलने खूप छान पद्धतीने टिपली आणि मांडली आहेत.

‘ पत्त्यांचा बंगला ‘ ही कथा समाजात घडणाऱ्या विलक्षण मनोव्यापाराचे दर्शन घडविते. अत्यंत हलाखीत बालपण गेलेल्या कथानायकाला परिस्थितीच महाराज बनवते. माणसांची दुखरी नस अचूक ओळखणारा तो धूर्त, चाणाक्ष नायक हे नाटक कसे वठवतो हे वाचण्यासारखेच आहे. एका वेगळ्याच विषयावरची ही कथा प्रभावी मांडणीने मनाची पकड घेते.

‘ पस्तीस – छत्तीस ‘  ही कथा मनमानी नवऱ्याचा इगो, वर्चस्व, रुबाब जपताना संसाराचा तोल सांभाळण्यासाठी करिअर सोडून देणाऱ्या एका हुशार, कर्तृत्ववान ‘ती’ ची कथा आहे. ‘आम्ही सिद्ध लेखिका’ या संस्थेच्या राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणारी ही कथा अप्रतिम जमून आली आहे.

आणखी एक सुंदर कथा म्हणजे ‘ क्षपणक ‘. अतिशय बुद्धिमान, महत्त्वाकांक्षी पण तितकाच अस्थिर स्वभावाचा पती आणि प्राणपणाने घर, संसार, मुलं, नवरा यांना जपणारी, नवऱ्यावर जीवापाड प्रेम करणारी पत्नी यांची ही कथा.  रासायनिक प्रक्रियांमध्ये प्रत्यक्ष सहभागी न होता त्या क्रियांना मदत करून शेवटी त्यातून बाहेर पडणारे क्षपणक म्हणजे कॅटाॅलिस्ट तो बनवितो. पण शेवटी तो मनापासून कबुल करतो की,’ त्याच्या खऱ्या आयुष्यातली क्षपणक तीच आहे.’ ही कथा अतिशय प्रभावी झाली आहे.

‘ उत्तरायण ‘ ही कथा ‘आम्ही सिद्ध लेखिका’ संस्थेच्या राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेत द्वितीय पुरस्कार प्राप्त ठरली आहे . दुर्दैवाने बालविधवा झालेली कथा नायिका मोठ्या जिद्दीने, हिंमतीने पुढची वाटचाल करते. एकुलता एक मुलगा संस्कारी, सक्षम, कमावता बनतो. तिथेच तिचे उत्तरायण सुरू होते. लेखिकेने ग्रहताऱ्यांची भ्रमंती आणि मानवी जीवनाची वाटचाल यांची खूप छान सांगड घातली आहे .

सर्वच तेरा कथा एकापेक्षा एक सरस झाल्या आहेत. विषयही सामान्यांच्या जीवनाशी निगडित असल्याने वाचक पटकन त्यांच्याशी जोडले जातात.

‘ चंद्रोदय ‘, ‘ शुभरजनी ‘ या आजकाल मुले परदेशस्थ आणि देशात पालक एकटे या वास्तवावर सकारात्मक भाष्य करणाऱ्या दोन सुंदर कथा आहेत. ‘चंद्रोदय’ मध्ये शिसवी पाटावर साक्षात चंद्रच जेवत होता या सुंदर वाक्याने होणारा कथेचा शेवट मनाची पकड घेतो.

‘ स्थळ ‘ कथा आजकालच्या लग्न जमणे, जमवणे या गोष्टींवर छान प्रकाश टाकते. यात लेखिकेने एक जबाबदार सदस्य म्हणून केलेली निरीक्षणे विचार करायला लावणारी आहेत. शेवटही छान केला आहे.

कथांची शीर्षकं ही लेखिकेची खासियत आहे. सर्वच शीर्षकं वेगळी, वैशिष्ट्यपूर्ण आहेत.  पस्तीस छत्तीस हा आलिशान बीएमडब्ल्यू चा नंबर आहे. त्याचा तो स्टेटस सिम्बॉल. पत्त्याचा बंगला, शुभरजनी, परीघ, क्षपणक, पाउल ही शीर्षकं कथेला वेगळा आयाम देतात.

‘ वाळा ‘ म्हणजे तसं पाहिलं तर शुष्क गवतच ना !पण त्यावर पाणी शिंपडताच शीतल सुगंध दरवळतो. त्याप्रमाणे वयाची साठी पार झाल्यावरही  परिस्थितीचा  तगादा आणि मनातील वडिलांचे प्रोत्साहन यामुळे संगीत शिकून एक प्रतिथयश गायिका बनलेल्या नायिकेची ही कहाणी आहे. संगीतातील तपशीलवार बारकाव्यांचेही छान वर्णन आहे. त्यामुळे कथा रसाळ झाली आहे.

या कथासंग्रहाचे शीर्षक असलेली र्‍हस्व ही कथा सर्वात लहान बहीण सर्वात आधी गेल्याने विलक्षण दुःखी झालेल्या मोठ्या बहिणीचे हे मनोगतच आहे.

” ज्येष्ठांच्याही आधी कनिष्ठांचे जाणे ॥ 

केले नारायणे उफराटे ॥”

हा संत निवृत्तीनाथांचा अभंग वाचताना जसा जीव गलबलतो ही कथा वाचतानाही तशीच भावना मनी दाटून येते‌

सर्वच कथांमध्ये लेखिकेने अतिशय हळुवारपणे कथाबीज फुलवलेले आहे. त्यातून तिचे प्रगल्भ, संवेदनशील मन,  वास्तवाचे सखोल निरीक्षण जाणवते. जगण्यातले काही तरल क्षण सामोरे येतात. सुंदर सकारात्मक संदेशही देतात.

कथेची भाषा अगदी सहज सोपी, ओघवती, चित्रदर्शी आणि मनाला भिडणारी आहे. त्यामुळे वाचताना निखळ आनंद मिळतो.

या कथासंग्रहाला ज्येष्ठ लेखिका अरुणाताई मुल्हेरकर यांची प्रस्तावना लाभली आहे.

राधिकाताईंनी हे पुस्तक आपले प्रेरणास्थान असणाऱ्या रसिक वाचकांना अर्पण केले आहे ही विशेष बाब आहे.

या आधीच्या कथासंग्रहांप्रमाणेच या कथासंग्रहाचे पण वाचक उस्फूर्तपणे स्वागत करतील यात शंका नाही. कारण याही कथा वाचनीय आणि प्रभावी आहेतच. त्यासाठी राधिकाताईंचे मनापासून अभिनंदन. यापुढेही त्यांच्या उत्तम उत्तम कथा रसिकांना वाचायला मिळोत यासाठी त्यांना खूप हार्दिक शुभेच्छा.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments