सुश्री मधुमती वऱ्हाडपांडे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “माझं चीज कोणी हलवलं?“ – मराठी अनुवाद – शरद माडगूळकर ☆ परिचय – सुश्री मधुमती वऱ्हाडपांडे ☆ 

मूळ इंग्रजी पुस्तक – “Who Moved My Cheese?“

मराठी अनुवाद – शरद माडगूळकर

प्रकाशक – मंजुल पब्लिशिंग हाऊस प्रायव्हेट लिमिटेड 

किंमत – 125-/ रुपये

पुस्तकं तर आपण अनेक वाचतच असतो नेहमी. काही वरवर चाळतो, काही अर्धवट वाचतो, काही काही पुनः पुन्हा वाचतो. काही तिथल्यातिथे विसरून जातो तर काही मनात खूप दिवस घोळत राहतात. काही खूप काही शिकवतात, काही अंतर्मुख करतात. आज ज्या पुस्तकाबद्दल सांगतेय ते एक लहानसे पण फार मोठं तत्व शिकवणारे पुस्तक आहे. “माझं चीज कोणी हलवलं?” हे ते पुस्तक! अगदी छोटेसे, एका बैठकीत पूर्ण होणारे, खूप काही सकारात्मक बदल आपल्यात घडवण्याची शक्ती असलेले डॉ. स्पेंसर जॉनसन ह्यांच्या ओघवत्या भाषाशैलीतील हे पुस्तक. मूळ इंग्रजीतील “Who Moved My Cheese?“ ह्या पुस्तकाचा शरद माडगूळकर ह्यांनी केलेला हा अनुवाद.

 ह्या पुस्तकात आपल्याला भेटतात दोन छोटे उंदीर, स्निफ आणि स्करी नावाचे आणि त्याच आकाराची दोन छोटी माणसेही हेम आणि हॉ! या चार काल्पनिक पात्रांचा आधार घेऊन जगण्यातील एक शाश्वत सत्य लेखकाने मांडलंय. जगात प्रत्येकालाच केव्हा ना केव्हा संघर्षाचा सामना करावा लागतो. ह्यात अनेकदा आपण रस्ता चुकतो, भरकटतो, गोंधळून जातो. पण आपण ज्या परस्थितीत आहोत ती परिस्थिती कायम तशीच राहावी अशी आपली अपेक्षा असते. त्यामध्ये काहीही बदल झाला तर आपण गडबडून जातो. तो बदल आपल्याला अजिबात सहन होत नाही.

 अगदी साधे उदाहरण द्यायचे तर आपल्याकडे रोज येणारी कामवाली बाई! ती आपलं सगळं काम व्यवस्थित करत असते. घरातलं तिला सगळं माहिती झालेलं असतं. त्यामुळे आपण निश्चिंत असतो. तिचे दोन तीन खाडे वगैरे आपण गृहीत धरलेले असतात. अन अचानकच एका दिवशी ती सांगते की ती उद्यापासून येणार नाही. ती कुठेतरी जाणार आहे किंवा तिची काहीतरी वैयाक्तिक अडचण आहे. आता त्या क्षणाला कुठल्याही गृहिणीची काय अवस्था होते ते सांगायलाच नको. अगदी आभाळ कोसळल्यासारखी गत होते! कारण तिची आपल्याला इतकी सवय झाली असते की त्या क्षणी सगळं त्राणच निघून जातं. आता कसं होणार आपलं म्हणून? वास्तविक पाहता दुसरी बाई शोधणं काही फार कठीण नसतं. थोडंसं चार दोन दिवसात तिलाही कामाचं तंत्र अवगत होणारच असतं. पण बदल म्हटला की मनुष्यस्वभाव त्याचं स्वागत करायला तयार होत नाही पटकन! खरं तर असलेल्या बाई बद्दल अनेक तक्रारी असतात आपल्या. पण दुसरी बाई हिच्यापेक्षाही चांगली मिळू शकते असा सकारात्मक विचार फार क्वचित करतो आपण! 

 तर हे छोटेखानी पुस्तक माणसाच्या नेमक्या ह्या स्वभाववैशिष्ट्यावर प्रकाश टाकते. वर उल्लेख केलेली चारही पात्रे चीज च्या शोधात एका भुलभुलैय्यात जातात. खूप शोधल्यावर एके दिवशी त्यांना हवे असलेले भरपूर स्वादिष्ट चीज त्यांना सापडतं. चौघेही निश्चिंत होऊन त्याचा मनसोक्त आस्वाद घेतात. भरपूर स्वादिष्ट चीज आपल्याला मिळतच राहणार हे ते गृहीत धरायला लागतात. थोडक्यात त्याची त्यांना सवय होऊन जाते. असे अनेक दिवस मजेत गेल्यावर हळूहळू कमीकमी होत जाणारे ते चीज एकदा पूर्णपणे संपते. आता मात्र ‘असंही कधी होऊ शकतं!’ हे अजिबातच गृहीत न धरल्याने चौघेही हतबल होतात. पण त्यानंतर चौघे त्या परिस्थितीला कसे कसे सामोरे जातात आणि त्याचा काय परिणाम होतो ते लेखकाने खूप छान परिमाणकारक रीतीने रंगवले आहे.

 ह्या छोट्याश्या गोष्टीत चीज म्हणजे तुमचा जॉब, तुमचा उद्योग, पैसे, ऐश्वर्य, स्वातंत्र्य, आरोग्य ह्यापैकी काहीही जे तुम्हाला आयुष्यात मिळवावेसे वाटते ते ते! आपली प्रत्येकाची चीज ची कल्पना वेगवेगळी असते आणि आपण ह्या जगरूपी भूलभुलैय्यात ते शोधत असतो. कधीनाकधी ते आपल्याला मिळतंही. एकदा मिळाल्यावर हे चीज आपण सहजासहजी सोडत नाही. मात्र हे कधी परिस्थितीनुरूप हरवले किंवा नाहीसे झाले तर आपल्याला सहन होत नाही. थोडक्यात आपल्या दैनंदिन आयुष्यात कालानुरूप झालेला बदल आपण सहजासहजी पचवत नाही. पण ज्या व्यक्ती बदल घडल्यावर योग्य निर्णय घेऊन त्याला सामोरे जातात त्याच शेवटपर्यंत तग धरू शकतात. ज्या चीजचा तुम्ही आम्ही आस्वाद घेताय ते कधीतरी संपणारच आणि ते संपल्यावर नवीन चीज शोधायला तुम्हाला हातपाय हलवावेच लागणार, त्या बदलाचा स्वीकार केला तरच पुन्हा नवीन चीज सापडेल आणि तुम्ही परत आनंदी व्हाल हा सोपा पण महत्वाचा जगण्याचा मंत्र ह्या छोट्याश्या रूपकात्मक गोष्टीतून आपल्यासमोर येतो. पुस्तकाची आणखी एक खासियत म्हणजे ह्यात मधून मधून चीजच्या मोठमोठ्या तुकड्यांची चित्रे आहेत अन प्रत्येक तुकड्यावर सारांश रूपाने सोप्या भाषेतली सकारात्मक वाक्ये आहेत जी आपणाला खूप काही शिकवून जातात अन सोबतच आनंददायी जगण्याचा एक सुंदर, सोपा मंत्र देऊन जातात.

© सुश्री मधुमती वऱ्हाडपांडे

मो 9890679540

अकोला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments