सौ राधिका भांडारकर
पुस्तकावर बोलू काही
☆ “साद अंतर्मनाची“ – लेखक अरुण पुराणिक ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर ☆
पुस्तकाचे नाव : साद अंतर्मनाची (काव्य संग्रह)
लेखक : श्री अरुण पुराणिक
प्रकाशन : आर्य प्रकाशन आणि डिस्ट्रीब्युटर्स.
आवृत्ती : ०३ डिसेंबर २०२२
पृष्ठे : ५२
किंमत : रु. १००/—
श्री अरुण पुराणिक यांचा साद अंतर्मनाची हा कवितासंग्रह नुकताच वाचला आणि त्यावर मत, अभिप्राय वगैरे देण्याची माझी योग्यता नसली तरीही मित्रत्वाच्या नात्याने काही लिहावसं वाटलं म्हणून हा लेखनप्रपंच.
तसं पाहिलं तर श्री.अरुण पुराणिक यांचा आणि माझा परिचय तीन-चार वर्षांपूर्वींचा. पण साहित्य, कला, काव्याच्या माध्यमातून एक मैत्रीचं नातं सहज जुळत गेलं. त्या मैत्रीच्या धाग्याचा मान ठेवूनच ‘ साद अंतर्मनाची ‘ या कवितासंग्रहावर भाष्य करावसं वाटलं.
या काव्यसंग्रहात एकूण ३२ कविता आहेत, आणि प्रत्येक कवितेच्या वाचनानंतर ओंजळीत अलगद जणू दवबिंदूच ओघळतात. जीवनशिडीच्या ८० व्या पायरीवर उभे असलेल्या या कवीने अत्यंत संवेदनशीलतेने आणि जाणतेपणाने जीवन जगले आहे. सुखदुःखाची अनेक प्रकारची वादळं झेलत असताना त्यांनी जे जे अनुभवातून टिपलं, अंतर्मनात डोकावून पाहिलं, तपासलं ते ते शब्दांतून साकारलं. अगदी सहजपणे. त्यामुळेच या सर्व कविता सामान्यपणे अथवा निराळेपणानेही जगणाऱ्या सर्वांच्याच मनाला भिडतात. …. भिडतील.
कवितांतले सहज स्फुरलेले शब्द जणू वाचकांच्या अंतर्मनाशीही नातं जुळवतात, त्यामुळेच साद अंतर्मनाची हे कवितासंग्रहाचे शीर्षकही अगदी चपखल वाटते.
आता त्यांच्या कवितांविषयी मला काय वाटले ते सांगते. सर्वप्रथम श्री. पुराणिक ही अत्यंत धार्मिक भावनेने जगणारी, एक श्रद्धाळू आणि निर्मळ व्यक्ती आहे. त्यांच्या या पुस्तकाची सुरुवात ते आद्य देवता गणेश पूजनाने करतात आणि समारोप श्री स्वामी समर्थांविषयी समर्पित भाव व्यक्त करून करतात. अक्षरशः ३२ कवितांमधून त्यांनी विविध विषयांना स्पर्श केला आहे. विविध काव्यप्रकार त्यांनी हाताळले आहेत. सर्वच कवितांतून रचलेली स्वरयमके सहजपणे कवितेला लय प्राप्त करून देतात आणि वाचकाच्या मनाचा ठेका धरतात.
या नुसत्याच काव्यरचना नाहीत तर अनुभवांतून मांडलेले विचार आहेत, दिलेले संदेश आहेत,
होळीनिमित्त केलेल्या ‘ रंग उत्सवाचे ‘ या कवितेत ते जाता जाता म्हणतात ..
रंग नवे भरताना ।
जीवनाला घडवावे।
रंग संपता द्वेषाचा।
आयुष्याला सजवावे ।।
रंगांची ही दुसरी कविता बघा… शीर्षक आहे ‘ रंगांचे रंग.’
सर्व रंगांची जननी होते ।
प्रकाशदायी नारायणाने।
जीवनात रंग आणता।
जगणे आहे अभिमानाने।।
मैत्रीविषयी लिहिताना ते म्हणतात
भाव माझ्या मनातले ।
मुक्तपणे प्रसवले।
मैत्री त्याचेशी जडता।
सुख माझे गवसले।।…… वा! क्या बात है !!
‘जीवन धडे‘, *तरी अश्रु ओघळले.*. या मनात जपलेल्या व्यथांना वाट करून देणाऱ्या कविता केवळ अप्रतिम आहेत. ‘ पाऊलखुणा आता दिसणार कशा। ‘ , किंवा व्यथा वृद्धिंगत होता ना *अवघड झाले जगताना।*। हे शब्द जिव्हारी लागतात. चटकन डोळे पाणावतात.
बळीराजाच्या दुःखाविषयी ते सहअनुभूतीने व्यक्त होतात. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या अश्रुंनीच आधी माती भिजते जणू.
होते नष्टच सगळे
ओले चिंबच ते शेत
स्वप्न बळीराजाचे या
होते उद्ध्वस्त राखेत।।
बालकवींच्या सुप्रसिद्ध ‘ फुलराणी ‘ या कवितेच्या पहिल्या चार ओळी घेऊन त्यांनी रचलेली कविता ही खरोखरच आल्हाददायक आहे.
त्या सुंदर मखमालीवरती
सूर्यकिरणेही अलगद पडती।
भास त्यांचा मोती जणू
नयनरम्यता अद्भुत घडली।।
‘ मृगजळ ‘ या कवितेत सुखाच्यापाठी पळपळ पळणार्या मनुजाला ते सावध करतात…
दिसले जरी दूर ते पाणी
जाशील शोध घेण्या त्याचा
थकशील जाता जाता तरी
हव्यास राहतो फुकाचा।।
‘प्रवास साहित्याचा‘, ‘विद्याधन‘ या कवितांतून त्यांनी स्वतःजवळ असलेल्या कलेविषयीही कृतज्ञता बाळगली आहे. विद्यारूपी धनाला शाश्वत ठरवताना
विद्याधन ही प्रतिष्ठा
लाभो सदा समृद्धीला।।…. असे ते म्हणून जातात.
या कवितासंग्रहातील विशेष उल्लेखनीय कविता मला वाटली ती म्हणजे ‘आई ‘. हा एक वेगळाच काव्यप्रकार त्यांनी हाताळलेला आहे. द्विपंचदशम या प्रकारातील ही काव्यरचना आहे. पहिल्या दोन ओळीत पाच अक्षरे आणि तिसऱ्या ओळीत दहा अक्षरे असा तीन ओळींचा द्विपंचदशम (१५अक्षरांचा) चरण. या माध्यमातून त्यांनी आई विषयीच्या नेमक्या हळुवार भावना उलगडल्या आहेत. ही पहा एक झलक.
तिचे दर्शन
ते आकर्षण
जीवनी अर्थ आणते छान ..
आयुष्यात जशी दुःख झेलली, प्रियजनांचे वियोग सोसले, तसे आनंदाचेही मुलायम क्षण वेचले. हिरवळीवरून चालण्याचे सुखद अनुभव घेतले. याची जाणीव त्यांच्या ‘साथ’, ‘मनाची हिरवळ’ या कवितांमधून वाचताना होते. त्याचबरोबर ‘माझ्या श्वासात तू’ , *छाया.. माहेर माझ्या लेकीचे.*. या कविता वाचताना मन भरून, हेलकावून जाते.
खरं म्हणजे प्रत्येक कवितेविषयी लिहावं तितकं थोडं आहे पण वाचकांसाठी काही रस राखून ठेवावा या भावनेने लेखणीस आवर घालते. एक मात्र नक्की की यातली कुठलीही कविता ही ‘केवळ उगीच’ ‘बोजड” “ओढून ताणून” या सदरातली नाही. प्रत्येक कवितेत विचार आहे, संदेश आहे आणि ती दिशादर्शकही आहे. म्हणून केवळ वाचनीय. सोसण्यातून प्राप्त झालेली सकारात्मकता आहे म्हणून पुन्हा पुन्हा वाचावी अशीच प्रत्येक कविता आहे.
या कवितासंग्रहाचे आर्या ग्राफिक्सने केलेले मुखपृष्ठ ही अर्थपूर्ण आहे. निष्पर्ण झाडावरचा एक पक्षी जणू जीवनाचे गाणे गातोय आणि अस्वस्थ झालेल्या वादळात अडकलेल्या माणसाला काहीतरी शिकवण देतो आहे, आणि त्याच्या राखाडी जीवनाला हिरव्या छटा प्राप्त होत आहेत, असे या चित्रातून अर्थ झिरपतात.
‘साद अंतर्मनाची‘ ही शीर्षक कविता या चित्राशी जणू नाते सांगते.
मना असता अती अशांत
नसते दिशा विचारांना
समृद्ध जीवनाचे विचार
उजळणी काव्य किरणांना।।
परतावा, पाऊलवाट, अर्थमाला अशी आणि यासारखी सर्वच कवितांची शीर्षके आकर्षक आहेत.
या काव्यसंग्रहाला मीरा श्री भागवत– मितेश्री या रसिक, जाणकार आणि गुणी व्यक्तीने अप्रतिम प्रस्तावना दिलेली आहे. आर्या प्रकाशन आणि डिस्ट्रीब्यूटर्सने श्री.अरुण पुराणिक यांचा हा सुंदर काव्यसंग्रह प्रकाशित करून काव्यप्रेमींना उपकृत केले आहे. त्यांना मनापासून धन्यवाद !
श्री अरुण पुराणिक यांचे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या पुढील लेखन प्रवासास खूप खूप शुभेच्छा !
हीच अंतर्मनाची साद मीही त्यांना देते.
धन्यवाद !
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈