सौ राधिका भांडारकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ निसर्गाची निळाई (कविता संग्रह) – कवी : अजित महाडकर ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर  

पुस्तक: निसर्गाची निळाई

कवी: अजित महाडकर 

प्रकाशक: शॉपीजन

पृष्ठे ७५, किंमत  २५०/—

कवी अजित महाडकर यांचा निसर्गाची निळाई हा काव्यसंग्रह अलीकडेच शॉपिजन प्रकाशन तर्फे प्रकाशित झाला. या संग्रहात एकूण ५१  कविता आहेत. या सर्वच कविता निसर्ग आणि नैसर्गिक भावभावनांशी निगडित आहेत. या काव्यसंग्रहाचे वैशिष्ट्य असे की यात वृत्तबद्ध, कृष्णाक्षरी, संगीताक्षरी, अष्टाक्षरी, शिरोमणी, जपानी हायकू, तांका असे विविध काव्यप्रकार लीलया हाताळले आहेत.  त्यामुळे हा काव्यसंग्रह वाचताना एकात अनेक असा सुखद अनुभव येतो.

अजित महाडकर हे एक सिद्धहस्त  प्रतिभावंत कवी आहेत.  त्यांच्या कविता वाचताना विशेष करून जाणवते ती त्यांची अतिशय सरल अशी काव्य भाषा.  एक एक फुल धाग्यात सहजपणे ओवावे इतकी साधी त्यांच्या काव्याची गुंफण असते. काव्याचे शास्त्र आणि नियम सांभाळूनही भाषेच्या काठीण्यापासून, क्लीष्टते पासून  त्यांची कविता दूर असते आणि म्हणूनच ती वाचकाला कवींच्या विचारांपाशी सहजपणे घेऊन जाते.

कवी महाडकरांच्या सर्वच कवितांचा हा स्थायीभाव असल्यामुळे त्यांच्या कविता मनात घर कराव्यात इतक्या बोलक्या आहेत आणि आपल्या वाटणाऱ्या आहेत.

या कवितासंग्रहातील भक्तीरसातील आरत्या व अभंग वाचताना जाणवते की कवीची वृत्ती धार्मिक, परोपकारी आणि श्रद्धाळू असली तरी कुठेही अंधश्रद्धेचा भाव त्यात नाही.

भगवंत या अभंगात ते लिहितात

भेटा भगवंत ।मानवी रूपात ।

नका देवळात। जाऊ रोज ।।

भगवंत हा मनुष्य रूपातच आपल्या सभोवती असतो. आई-वडिलांच्या रूपात, रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या वैद्याच्या रूपात, असंख्य दात्यांच्या दातृत्वाच्या रूपात तो भेटत असतो.

मर्म संसाराचे या कवितेत ते लिहितात

करिता काम धाम 

जपावे रामनाम

मनोमनी

या संगीताक्षरी  काव्यरचनेत गृहस्थधर्म आणि भक्तीमार्ग यांची अगदी सोप्पी सांगड त्यांनी घातलेली आहे.

निसर्गाची अत्यंत ओढ असलेल्या या कवीच्या लेखणीतून शब्द उतरतात ,

देणे निसर्गाचे जपून ठेवावे 

*त्याला का उगा नष्ट करावे ।*।

किंवा ,

झरा निर्मळ असेल का तिथे?

खरा आनंद डुंबण्याचा घेऊया 

या कृष्णाक्षरी काव्यातून सुंदर जीवन कसे जगावे, निसर्ग कसा जपावा याचे प्रबोधनच जणू होते.

लेखणी, कविता, प्रतिभा याच कवीच्या खऱ्या सख्या आहेत.

हाती येईल त्या लेखणीने 

काढते नक्षी कागदावर 

स्वतःच हसते पाहून नक्षी 

आनंद होतो अनावर …

कवीचे हे मनस्वी आणि हृदयस्थ बोल किती मधुर आहेत! जीवन म्हटले म्हणजे सुख दुःख, निराशा, प्रेम आणि वियोगाचाही अनुभव येतोच. अशा या भावभावनांचे प्रतिबिंबही महाडकरांच्या कवितेमध्ये उमटलेले आहे.

कातरवेळ या कवितेत ते लिहितात

सागरकिनारी कातर वेळी 

असता प्रिया जवळी 

संसाराची सुख स्वप्ने 

पाहतो आम्ही आगळी …

निसर्गाच्या सहवासात माणसांची छोटी छोटी स्वप्ने कशी खुलत जातात हेच या ओळीतून व्यक्त होते.

मन संवेदनशील असले की एखाद्या साध्या दृश्यानेही ते उमलते त्याचीच प्रचिती देणाऱ्या या ओळी,

 डेरेदार झाड बागेतले 

रंगीत फुलांनी बहरले 

पाहुनी तो रम्य नजारा 

*मन माझे आनंदाने फुलले.*.

वाह क्या बात है!  निसर्गातच आनंद भरलेला आहे हो! फक्त तुमची पंचेद्रिये जागी असली पाहिजेत. मग जीवन हे सुंदरच होते. किती सुरेख संदेश कवीने या साध्या ओळींतून दिला आहे!

या संपूर्ण काव्यसंग्रहात कवीने ईश्वर, बारा ज्योतिर्लिंगासारखी स्थळे, कृष्ण, अर्जुन, झाडे—पाने, पक्षी, प्रिय सखी, गुरु, घर, कन्या, अगदी घरात वावरणारा मोती कुत्रा यावर इतकी सुरेख काव्य टिपणे केली आहेत  की वाचक त्यात सहजपणे रमून जातो.

दुसऱ्यांना सुखी ठेवण्याची 

कला आहे ज्यांच्यात 

एक आशेचा किरण 

दिसतो मला त्यांच्यात ..

किंवा ,

संस्कार या कवितेत ते लिहितात

डोक्यावरी पिडीतांच्या 

हात फिरवी मायेचा 

दिसे मला त्यांच्यामध्ये

 एक किरण आशेचा…

मनात सहज येते, सभोवताली माजलेल्या स्वार्थी, मतलबी, अनाचारी जगातही सुखाचा किरण शोधणाऱ्या या कवीची सकारात्मकता किती योग्य आहे, महान आहे!

 चंद्र प्रकाश 

तुझा चेहऱ्यावर

 दिसे सुंदर ..

असे हायकू आणि 

 

ऋतू बदल 

निसर्गात घडतो 

तरी फुलतो 

संघर्ष करूनिया

 नव्याने बहरतो ..

अशा तांका काव्यातून झिरपणारे हे काव्यबिंदू मनाला खूप सुखवतात.

निसर्गाची  निळाई ही शीर्षक कविता सृष्टीच्या निळाईचा सुंदर अविष्कारच घडवते.

स्वच्छ निर्मळ चमके

निळे पाणी सागराचे

घेई  उंच उंच लाटा

फेडी पारणे नेत्रांचे ..

किती सुरेख आहे ही स्वभावोक्ती!

खरं म्हणजे यातली प्रत्येक कविता वाचकाला विविध भावभावनांचा अनुभव तर देतेच पण जीवनातले मधुकण टिपण्यासाठी एक चोचही देते .

सुरेख आणि सहज साधलेली यमके, ठिकठिकाणी विखुरलेली स्वभावोक्ती, चेतनागुणोक्ती, उपमा, उत्प्रेक्षांसह उलगडत चाललेला हा काव्यप्रवास अपार सुखद, समाधानाचा आहे.

या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत लेखिका व कवयित्री सौ. संपदा देशपांडे लिहितात,

शब्द बनती कविता 

तोच असे सिद्ध कवी..

त्यांचं लिहिणं किती सार्थ आहे हे या कविता वाचल्यावर  लक्षात येते.

अजित महाडकर यांच्या या चौथ्या काव्यसंग्रहाला शुभेच्छा देताना कवयित्री सानिका पत्की यांनीही महाडकरांच्या कविता म्हणजे सहज, सुंदर, साधे, सोपे व भावनेच्या जाणिवांना स्पर्श करणारर्‍या असे भाष्य महाडकरांच्या काव्यरचनांबद्दल केले आहे.

काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय बोलकं आणि सुंदर आहे.

संपूर्ण निळ्या पार्श्वभूमीवर पसरलेला अथांग निळा सागर, क्षितिजाच्या रेषेवर टेकलेलं निळं आभाळ आणि मुक्त विहरणारे निळसर जलद. केवळ अप्रतिम!

कवी श्री. महाडकर त्यांच्या मनोगतात नम्रपणे लिहितात, “या कविता तुम्हाला आवडतील अशी आशा आहे”

सर! या कविता आमच्या अंतरीच्या कप्प्यात बंदिस्तच होतील एवढेच मी म्हणेन.

कवी अजित महाडकरांचे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या  पुढील  साहित्य प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!

परिचय : राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments