सौ राधिका भांडारकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “अरूणोदय” – लेखिका सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर  

पुस्तकाचे नाव – (काव्यसंग्रह) अरुणोदय

प्रकाशन – १५ मार्च २०२२

प्रकाशक – शाॅपीझेन.काॅम

किंमत – रु ४०/—

 

आज मी तुम्हाला सुश्री अरुणा मुल्हेरकर यांच्या शाॅपीझेन या डीजीटल मीडीयावर नुकताच प्रकाशित झालेल्या अरुणोदय या काव्य संग्रहाचा परिचय करुन देणार आहे. या संग्रहात एकूण चाळीस कविता आहेत.

त्यांचे वैशिष्ट्य असे की, यातील एकही कविता मुक्तछंदातील नसून, प्रत्येक कविता नियमबद्ध आहे. त्यामुळे या चाळीस कवितातून चाळीस काव्यप्रकाराची अरुणाताई यांनी ओळख करून दिली आहे.

षटकोळी, कृष्णाक्षरी, शोभाक्षरी, शंकरपाळी, नीरजा, मधुसिंधु, रट्टा वगैरे एकाहून एक सुंदर काव्यप्रकार उलगडत जातात.

प्रत्येक काव्यप्रकाराचे नियम त्यांनी सांगितले आहेत. ओळी, यमक, वर्ण अक्षरं, शब्द यांची संख्या मांडणी याविषयीचे संपूर्ण तपशील यात दिले आहेत. त्यामुळे या सर्व काव्यरचना वाचताना आपोआपच एक लयबद्धता येते. आणि वाचकाला त्या रमवतात.

या सर्व कवितातून त्यांनी विवीध विषयही हाताळले आहेत. निसर्ग आहे.मनातली स्पंदने आहेत. सामाजिक दूषणे आहेत.

नव्या पीढीच्या समस्या आहेत. जीवनातली सुख दु:ख प्रेम यावरचे मोकळे भाष्य आहे. भावनांचे अविष्कार आहेत….

नाते प्रेमाचे या षटकोळी रचनेत त्या म्हणतात,

मधुप आणि कुसुम

धेनु वाढवी वासराला

पाखरे झेपावती नभात

घेत उंच भरारी

कोटरात परतती सांजवेळी

प्रेम आहे चराचरात..

या सहा ओळीच्या रचनेत अत्यंत सहज शब्दांत त्यांनी निसर्गातले प्रेम टिपले आहे.

द्विशब्दी रचनेतले आई विषयीचे दोनच शब्द मनाला भिडणारे आहेत.

आई देई

संस्काराचे आंदण

दारात तिच्या

बागडते अंगण…

मधुदीप काव्यांमधे शब्दांची मांडणी तेवत्या दीपासारखी असते. या कविता वाचताना अक्षरांच्या सुबक चित्राकृतीही खूप आकर्षक आहेत.

संगीताक्षरी.. तीनओळीची अक्षरबद्ध काव्यरचना.

चंदन झिजतसे

सुगंध भरीतसे

सदाकाळ…

लीनाक्षरी हे दोन ओळीचं, २४ अक्षरे असलेले काव्यही अतिशय लोभस आहे.

संकटाशी सामर्थ्याने लढायचे

शांतचित्त समाधान ठेवायचे…

शब्द साधे पण अत्यंत ओलावा असलेले. प्राणमय आणि सजीव. प्रत्येक रचना ही त्या त्या भावनेसकट,विचारांसहित मनाला भिडते. नियमबद्ध असूनही अवघड नाही. रुक्ष नाही. फाफटपसारा नाही. ओढूनताणून केलेली अक्षरांची कसरत नाही. एक सहजता, नाद लय गती.. या कविता वाचताना जाणवते. मन गुणगुणायला लागतं.. अरुणोदय या काव्यसंग्रहाचं हेच वैशिष्ट्य आणि यशही.

अरुणाताईंनी अतिशय अभ्यासपूर्ण असा हा काव्यसंग्रह प्रकाशित करून, नवोदित कवी कवयित्रींसाठी एक दालन उघडले आहे.

साहित्य कला व्यक्तिमत्व मंचाचे प्रमुख, आणि मान्यवर लेखक, कवी गझलकार या काव्य संग्रहाच्या प्रस्तावनेत म्हणतात की या काव्य सरितेत प्रथम मी सहज डोकावलो नंतर त्यात कसा ऊतरलो, पोहू लागलो नि संपूर्ण काव्यसंग्रह वाचल्यावर वर येउन पाहतो तर मी एकामहासागरात होतो. अरुणाताईंची प्रतिभा आणि प्रतिमा खूप काही शिकायला ठेवून गेली. तेव्हां रसिकहो आपणही  हा अनुभव घ्यावा. त्यासाठी शॉपीझेन डॉट काॅम या साईटवर जाउन अरुणोदय हा काव्यसंग्रह जरुर वाचावा.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments