सौ राधिका भांडारकर
पुस्तकावर बोलू काही
☆ “सूरसंगत” – लेखिका सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर ☆
पुस्तकाचे नाव… सूर—संगत
लेखिका : अरुणा मुल्हेरकर
प्रकाशिका : डाॅ. स्नेहसुधा अ.कुलकर्णी, नीहारा प्रकाशन.
मुखपृष्ठ… सौ. सोनाली जगताप
प्रकाशन दिनांक: २१ मार्च २०२२
किंमत: रु. १५० /—
सुश्री अरुणा मुल्हेरकर यांचा सूर संगीत हा संपूर्णपणे संगीत याच विषयावर आधारित लेखांचा, एक छोटेखानी संग्रह पुस्तकरुपाने प्रकाशित होत आहे ही अतिशय आनंदाची आणि स्वागतार्ह बाब आहे.त्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करते आणि संगीत आणि साहित्याच्या या वाटचालीत त्यांना खूप खूप शुभेच्छा देते…
वास्तविक संगीत,गाणी यांची आवड नसणारी व्यक्ती ही क्वचीतच आढळेल..कारण संगीत हा मानवी जीवनाचा एक महत्वपूर्ण हिस्सा आहे हे निर्विवाद! जन्मापासून ते मृत्युपर्यंत कुठल्या ना कुठल्या स्वरुपात मानवी जीवनात संगीत हे आहेच…
मात्र संगीताची आवड, त्याचे अस्तित्व, आणि त्याचा सखोल शास्त्रीय अभ्यास या भिन्न बाबी आहेत…
गाणी ऐकायला ,त्यातल्या सूर, ताल शब्दसाहित्याचा आनंद घेणं मला नककीच आवडतं.पण त्यातलं शास्त्र मला ऊमजत नाही .त्यामुळे संगीत एक शास्त्र यावर काही भाष्य करण्याचा मला काही अधिकारही नाही…तो माझा प्रांतच नव्हे..
पण तरीही, जेव्हां मी अरुणा मुल्हेरकर यांच्या, सूर संगीत या पुस्तकातले लेख वाचायला सुरवात केली, तेव्हां त्यात अक्षरश: बुडून गेले.. ३०लेखांचं हे पुस्तक नकळत मला समृद्ध करत गेलं…
मूळातच या पुस्तकाची भूमिका ही, संगीत विषयावरचं सुरेख शास्त्र हे माझ्यासारख्या अनभिज्ञ व्यक्तींपर्यंतही पोहचावं ही असावी..इतकं सुबोध,रंजक आणि क्लीष्टता टाळून, माहिती देणारं हे पुस्तक आहे…
यात संंगीताच्या सर्व प्रकारांविषयी अत्यंत सूरमयी रसाळ माहिती आहे.
शास्त्रीय, उपशास्त्रीय, लोकसंगीत, नाट्यगीत अभंग भजने भारुडं ते भावगीतांपर्यंत सर्वच प्रकारात, संगीत म्हणजे नेमकं काय याची ऊलगड या पुस्तकात नेमकेपणाने केली आहे.
अरुणाताई म्हणतात, संगीत म्हणजे निबद्ध गायन किंवा वादन. तालात बांधलेली स्वररचना. राग, स्वर आणि शब्द, एका तालात बद्ध करुन, त्या तालाच्या खंडाप्रमाणे, सम, टाळ्या काल या आवर्तनातली स्वररचना म्हणजे संगीत…
पाण्याची खळखळ ,वार्याची फडफड,समुद्राची गाज,पक्षांचा कलरव,कोकीळेचे कूजन,भ्रमराचे गुंजन हे जर शांतपणे ऐकले तर त्यातही नाद,ताल,लय आहे..याची जाणीव होते.
या पुस्तकात विवीध रागांची माहिती त्यांनी सांगितीक पण सोप्या भाषेत उलगडून दिली आहे.
काफी, खमाज, जौनपुरी, मारवा, पूरिया, बिहाग, बागेश्री, बसंत, बिभास भटियार, मालकंस भैरव अशा अनेक रागांविषयी लिहीतांना, त्यात्या रागांची उत्पत्ती, त्यातील स्वररचना, आणि ते कुठल्या प्रहरी गायला जातात याची अत्यंत सुंदर भाषेत मांडणी केली आहे.
निसर्ग आणि एखाद्या रागातील स्वररचनेचं कसं नातं असतं हेही त्यांनी छान समजावलं आहे… प्रत्येक रागांच्या वृत्ती बद्दल त्यांनी लिहीलं आहे ते मनाला फार भावतं.. खमाज या रागाची वृत्ती आनंदी आणि खेळकर आहे. पण स्वररचनेतला किंचीत बदल हा रागाची वृत्ती कशी बदलवतो याचं उदाहरण देताना ते एखादं प्रचलीत गाणं घेतात..मग ते नाट्यगीत भावगीत अथवा चित्रपट गीतही असू शकतं..
अशा प्रकारच्या लिखाणामुळे सर्वसामान्य श्रोत्यांचा संगीत ऐकणारा कान तयार होतो.
सूरांची एक दिशा नकळतपणे मिळते.
सूरांचे, वेळ, वृत्ती अविर्भावाशी असलेलं नातं कळल्यामुळे गाणं ऐकण्यातली मजा दुपटी तिपटीने वाढते…सूर म्हणजे आभास न वाटता त्याचं अस्तित्व जाणवायला लागतं… म्हणूनच हे पुस्तक का वाचावं याचं हे माझं मत.
गाणं कुठलंही असूदे..लावणी असो पोवाडा असो अभंंग असो वा भावगीत असो ते कोणत्या ना कोणत्या रागात स्वरबद्ध असते..अगदी एखादे उडतं किंंवा राॅक ,पॉप जाझ..कुठलंही गाणं..पण त्याला भारतीय शास्त्रीय संगीताचा पाया आहेच…हे लक्षणीय सत्य अरुणाताईंनी या पुस्तकात मांडून शास्त्रीय संगीताचं महत्वही पटवून दिलं आहे..
या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी रागनिर्मीती वेळच्या काही मनोरंजक घटनाही सांगितल्या आहेत..
चंद्रकंस रागाची अशीच एक कथा त्या सांगतात…
एकदा देवधर मास्तर संवादिनीवर मालकंस वाजवत होते.चुकून त्यांची बोटं कोमल निषादाऐवजी,शुद्ध निषादावर पडली..काहीतरी छान वाजलं याची जाणीव झाली म्हणून त्यांनी पुन्हा पुन्हा कोमल निषाद न घेता,शुद्ध निषादच वाजवला ..आणि चंद्रकंस रागाचा जन्म झाला…
राग मधुवंती बद्दलही अशीच एक गंमतीदार घटना या पुस्तकात वाचायला मिळते.
कुमार गंधर्व आणि वसंतराव देशपांडे यांच्यात काही कारणामुळे दुरावा निर्माण झाला..त्यावेळी मनाच्या विमनस्क अवस्थेत वसंतरावांनी कुमारांना, “मै आऊ तेरे दरवा..” अशा अस्थाईच्या ओळी लिहून पाठवल्या, त्यावर कुमारांनी लगेच,
“अरे मेरो मढ्ढैया तोरा आहे रे.” असा अंतरा लिहून पाठवला.
तीच पुढे मधुवंतीची बंदीश म्हणून प्रसिद्ध झाली..
हे सर्व वाचकांना सांगण्याचा माझा हेतु असा की संगीत या काहीशा अवघड शास्राचा अभ्यासात्मक लेखनप्रपंच करताना,तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा म्हणून ही हलकी फुलकी मनोरंजकता फार महत्वाची वाटते…
तसे या पुस्तकाविषयी लिहीण्यासारखे भरपूर आहे… मात्र वाचकांना वैयक्तीक आनंद मिळावा… नव्हे त्यांनी तो घ्यावा, असा विचार करुन मला ही इतकीच झलक पुरेशी वाटते….
संगीत हा अक्षरश:महान संशोधनाचा विषय आहे.
तो एक अथांग महासागर आहे..
अरुणाताईंनी सूर संगत या पुस्तक रुपी कळशीतून थोडीशी पवित्र गंगा आपल्याला बहाल केली आहे…ती प्रेमभावे जवळ बाळगूया….
पुन:श्च्च सुश्री अरुणा मुल्हेरकर यांचे अभिनंदन आणि खूपखूप शुभेच्छा!!
सौ. सोनाली जगताप यांनी केलेलं मुखपृष्ठही अतिशय बोलकं आणि स्वरमयी आहे.या सुंदर साजाबद्दल तिचेही अभिनंदन…!!
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈