श्री जगदीश काबरे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “सीतायन” –  लेखिका: डॉ. तारा भवाळकर  ☆ परिचय – श्री जगदीश काबरे

पुस्तक :  सीतायन

…वेदना-विद्रोहाचे रसायन

लेखिका: डॉ. तारा भवाळकर

प्रकाशक: मनोविकास प्रकाशन, पुणे

प्राचीन भूतकाळ हा अंधाऱ्या गुहेसारखा असतो. त्याच्यासंबंधी नेमकी अशी कोणतीच विधाने करता येत नसतात. एक हत्ती आणि सात आंधळे या गोष्टीतल्यासारखी संशोधकाची स्थिती होते. काही प्रकाशकणांच्या आधारे लेखक सामुग्रीची जुळवाजुळव करतो आणि ती अभ्यासुन आपले मत मांडतो. भारतीय इतिहासाच्या संबंधात हे अधिकच खरे आहे. कारण भूतकाळासंबंधीच्या साधनसामुग्रीचा अभाव ही एक इथल्या इतिहासाची बुद्धिनिष्ठ सत्यान्वेषी मांडणी करण्यातील अडचण आहेच; पण त्याचबरोबर ब्राह्मणी विचारपद्धती हाही त्यातील एक प्रमुख अडसर आहे. येथील विद्वान हे एकाच वर्ग संस्कृतीत वाढलेले आहेत. कारण त्यांनाच फक्त अध्ययन आणि अध्यापनाचा अधिकार होता… शिक्षणाचा अधिकार होता. म्हणून त्यांच्या मनाची जडण-घडण ठेवणसुद्धा एकसारखी आहे. हा साचा ठरून गेला आहे. त्यापेक्षा वेगळी भूमिका मांडणाऱ्यांच्या अंगावर ते वस्सकन धावून जातात, तुटून पडतात. त्यांना फक्त आपण वाचलेली पुस्तके दखलपात्र वाटतात आणि बाकीची सगळी चिकित्सक पुस्तके त्यांना पिवळी पुस्तके वाटतात.

आतापर्यंत जेवढी रामायणे लिहिली गेली वा दृकश्राव्य माध्यमात दाखवली गेली ती सगळीच रामाचा गौरव करणारी होती. त्यात फक्त रामाच्या गुणकर्तृत्वाचे गोडवे गाईले गेले, त्याच्या पराक्रमाचे, पौरुषाचे, मर्यादा पुरूषोत्तमाचे कौतुक केले गेले. सीता पतिव्रता असल्यामुळे तिला मिळाले दुय्यम स्थान! स्त्रियांच्या बाबतीत ही संस्कृती नेहमीच पक्षपाती राहिलेली आहे हे वेळोवेळी सिद्ध झालेच आहे. कारण या संस्कृतीने पुरुष वर्गालाच न्याय दिला आहे. या पार्श्वभूमीवर ‘सीतायन’ या पुस्तकात मात्र आजवर सातत्याने अन्याय झालेल्या, दुर्लक्षिल्या गेलेल्या सीतेला यथोचित न्याय देण्याचा, तिची भूमिका मांडण्याचा, समजावून घेण्याचा आणि राम-सीतेतील नात्याचा योग्य सांस्कृतिक अन्वयार्थ लावण्याचा लोकसंस्कृतीच्या अभ्यासातून आणि जनमानसात रुजलेल्या रामायणातून तारा भावाळकरांनी सीतेची वेदना चपखल शब्दात मांडली आहे.

तसे पाहिले तर आजचे वाल्मिकी रामायण खूप अर्वाचीन आहे. बुद्धकाळानंतरचे ते आहेच. कारण यवनांचेही उल्लेख त्यात आढळतात. त्याअर्थी ते अलेक्झांडरच्या स्वारीनंतरचे असावे असेही म्हटले जाते. रामायणाची केवळ दोन-चार संस्करणे झालेली नाहीत. दोन-चारशे संस्करणे झालेली आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अनेक प्रक्षेप त्यात झालेले आहेत. अनेकांनी आपल्या सोयीप्रमाणे वाटेल ते त्यात घुसडले आहे. त्यातील प्रक्षेप बाजूला काढून निश्चित मूळ वाल्मीकी रामायण बाजूला काढणे वाटते तितके सोपे नाही. ते कठीण काम आहे. प्रक्षिप्त भागांसंबंधी मत प्रतिपादन करताना अनेकदा आपले पूर्वग्रह आड येण्याची शक्यता असते. ज्या गोष्टी आपल्याला पटत नाहीत, आपल्या पूर्वनिश्चित दृष्टिकोनावर आघात करतात, धर्मश्रद्धा पायदळी तुडवतात तो भाग प्रक्षिप्त म्हणून मोकळे व्हायचे. ही ब्राह्मणी विचारवंतांची आणि ग्रंथकारांची अनैतिहासिक एकांगी धर्मश्रद्धवृत्ती अनेकदा कोणत्याही बाबीच्या सत्यन्वेषणाला आड येते, बाधा निर्माण करते.

रामायणाचे मूळ कोणते यासंबंधी विचारवंतांत मतभेद आहेत. ए. वेबर या ग्रंथकाराने रामायणाचे मूळ, बौद्धांच्या दशरथ जातकात आहे असे म्हटले आहे. तो म्हणतो, ‘प्राचीन धार्मिक राजासंबंधी जी बौद्धकथा प्रचलित होती तीच या रामायण काव्याला आधारभूत झाली’ (महाराष्ट्रीय ज्ञानकोश हिंदूस्थान खंड, पृ. ७३). याशिवाय संस्कृतिकोशात म्हटले आहे ‘वाल्मिकीच्या पूर्वी रामाविषयी काही गाथा प्रचलित होत्या. याचे प्रमाण बौद्ध त्रिपिटिकावरूनही मिळू शकते. या रामविषयक गाथा हाच रामकथेचा मूलस्त्रोत असे म्हणता येईल. ‘ (भारतीय संस्कृतिकोश खंड ८, पृ. १७). डॉ. भदंत आनंद कौसल्यायन यांनीसुद्धा रामायणाचा मूलस्त्रोत बौद्धांच्या जातककथा हाच सांगितला आहे. रामायणातील काही श्लोक व जातकातील काही गाथा सारख्या आहेत हे त्यांनी त्यांच्या ‘जातकठ्ठ कथा’ या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत सप्रमाण दाखविले आहे, ते म्हणतात की, ‘रामकथा का अनगढ़ स्वरूप जातक में है और वाल्मिकी के रामायण में चित्रित उसी का सँवारा स्वरूप है। (खाजगी मुलाखत : डॉ. भदंत आनंद कौसल्यायन). श्री. दिनेशचंद्र सेनसुद्धा दशरथ जातकात रामकथेचा आधार व पूर्वरूप पहातात. (बेंगाली रामायण पृ. ७३). या सर्व बाबी पाहिल्या म्हणजे जातक आणि रामायण यातील संबंध लक्षात येतो. परिणामी आज आपल्या हाती असलेले ‘वाल्मिकी रामायण’ खूपच अर्वाचीन आहे हे लक्षात येते. त्यातही अनेक प्रक्षेप घुसवलेले आहेत. त्यामुळे ‘आम्ही वाचलेले वाल्मीक रामायण तेवढेच खरे’, असे समजणे हा आपलाच कोतेपणा ठरतो.

रामायणासंबंधात अनेक वेगवेगळ्या धारणा आहेत. जगभर ही कथा वेगवेगळ्या रूपात अस्तित्वात आहे. तिच्या अनेक आवृत्या आहेत. अनेकांच्या मते, रामायण ही एक मिथ् (पुराणकथा) आहे. त्याला वास्तवाचा आधार नाही. (पण आजचे हिंदुत्ववादी मात्र रामायणाला हिंदुत्वाच्या अस्मितेपोटी भारताचा प्राचीन इतिहासच समजतात. ) खरे पहाता वाल्मिकीच्या प्रतिभेला स्फुरलेली ती सर्जनशील कलाकृती आहे. वाल्मिकी रामायण घडले की घडले नाही ही गोष्ट महत्त्वाची नाही. राम, लक्ष्मण, सीता कैकेयी, रावण इ. या ऐतिहासिक व्यक्ती होत्या की नाही हेही महत्त्वाचे नाही. महत्वाचे आहे ते हे की रामायण भारतीयांच्या मनामनात कशा पद्धतीने रुजलेले आहे त्याचा ठाव घेणे. ज्यात राम हा क्षत्रिय राजकुमार म्हणून अवतरतो. ब्राह्मण्याचा समर्थक व संरक्षक असे त्याचे रूप लक्षात येते. मनुस्मृती आणि रामायणाचा अनुबंध लक्षात येतो. ‘सीतायन’ ग्रंथाच्या लेखिकेनेही भारतातील वेगवेगळ्या प्रांतातील ‘अंकुशपुराण’, ‘कन्नड चित्रपट रामायण’, ‘चंद्रावती रामायण’, ‘बंगाली दुर्गा पुजा’, ‘दशरथ जातक’ अशा विविध रामायणात लिहिलेल्या कथांचा अभ्यास करून त्यातील सीतेचे सत्व अभ्यासपूर्ण रीतीने मांडलेले आहे. ‘ओवीगीतातील सीतायन’ या प्रकरणामध्ये अडाणी, अशिक्षित समजल्या जाणाऱ्या पण सुजाण मनाच्या स्त्रियांनी ओव्यातून..

“राम म्हणू राम। न्हाई सीतेच्या तोलाचा।

हिरकणी सीतामाई। राम हलक्या दिलाचा।।”

असे म्हणत रामाला धिक्कारले आहे. असे अनेक ओव्यांचा आधार घेत त्यांनी सिद्ध केले आहे. सीतेच्या सोशिकतेचा कडेलोट रामाच्या अहंकारामुळे कसा झाला, तिला कैकेयीच्या सासुरवासामुळे भूमिगत कसे व्हावे लागले याचे विश्लेषणात्मक वर्णन मनाला भावून जाते आणि ‘स्त्री जन्मा तुझी ही कहाणी’, असे वाटल्या वाचून राहत नाही. पुस्तकात रामायणाचा विचार सीतेच्या दृष्टिकोनातून केल्यामुळे लेखिकेने सीतेची प्रतिमा रामापेक्षा उजवी दाखवलेली आहे, असा आरोपही सनातनी रामभक्त करतात; पण खरे पाहता लोक परंपरेचं रामायणाशी असलेलं नातं लक्षात घेता सीतेच्या संदर्भात भारतीय जनमानसाने सीतेलाच झुकते माप दिले आहे हे मराठी, हिंदी, कन्नड, बंगाली, बौद्ध कथा आणि अनेक आदिवासी कथांमधूनही वाचकाच्या लक्षात येते. अर्थात हा वेगळा विचार सनातनी भक्तांच्या पचनी पडेलच असे नाही… किंबहुना तो पचनी पडतच नाही म्हणूनच ते या पुस्तकावर सोशल माध्यमात तोंडसुख घेताना दिसतात. पण सजग विचारी माणसांनी या पुस्तकाचे स्वागतच केलेले आहे. मागच्या शतकात ‘रिडल्स इन हिंदूईझम’ लिहिणारे आंबेडकर, ‘रामायणातील संस्कृतीसंघर्ष’ लिहीणारे प्रा. अरुण कांबळे आणि ‘सच्ची रामायण’ लिहिणारे स्वामी पेरियार यांनी ज्या पद्धतीने रामायणाची विवेकी चिकित्सा केली त्याच तोडीची रामायणाची चिकित्सा करणारे तारा भावाळकरांचे ‘सीतायन’ हे पुस्तक सर्वांनी वाचावे असेच आहे. रामाला उच्चासनी बसवण्याच्या पुरुषप्रधान मानसिकतेच्या पार्श्वभूमीवर या पुस्तकाने सीतेला खरा न्याय दिलेला आहे

परिचय : श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments