श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “संसार – देवाच्या भूमीत प्रवेश” – लेखक – श्री सक्षम गर्ग – अनुवाद : डाॅ. अंबरीश खरे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : संसार – देवाच्या भूमीत प्रवेश
लेखक – श्री सक्षम गर्ग
अनुवाद – डाॅ. अंबरीश खरे
मूल्य – ३७५₹
तुम्हाला पुढे जे दिसतेय, ते दुसरे काही नसून पौराणिक कथांमधील वन्यास नावाच्या नगराचा शोध घ्यायला मदत करणारा नकाशा आहे. पण त्यााची मदत तुम्हाला या खोऱ्याच्या गुपिताचे रक्षण करणाऱ्या नंदन नावाच्या वृक्षाजवळ पोहोचेपर्यंतच होईल. तिथे पोहोचल्यावर मात्र पुढचा मार्ग तुमचा तुम्हालाच शोधायचा आहे.
कदाचित तुम्ही यापूर्वी वन्यासाविषयी ऐकले असेल. किंवा हे नेमके काय प्रकरण आहे, याची तुम्हाला उत्सुकता वाटत असेल. जर तुम्ही कधी हे नाव ऐकले असेलच तर ही नगरी काल्पनिक असावी, असेच तुम्हाला वाटले असणार. पण मी तुम्हाला खात्री करून देतो, की वन्यासनगरी आहे. प्रबुद्ध जीवांसाठीच खुली असणाऱ्या या नगरीत आजही अनेक जण पुष्कळ वर्षे किंवा अख्खे आयुष्य ध्यानधारणा करण्यात व्यतीत करीत आहेत.
विविध संस्कृतींमध्ये वन्यासाला वेगवेगळी नावे आहेत. ज्ञानगंज, शंभाला, स्वाकीपुर, किंवा शांग्रिला. हिमालय पर्वतरांगांमधील खोऱ्यात, पृथ्वीच्या जणू छपरावर असलेल्या एका खोऱ्यात ही नगरी आहे. तिथे जाणे पूर्णपणे अशक्यच. पण दर दहा वर्षांनी, स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी भारतीय उपखंडातील मैदानी प्रदेशांमध्ये राहणाऱ्या दहा जीवांसाठी ही नगरी आपली दारे उघडते. त्यांनी खोऱ्यात प्रवेश केल्यावर तिथल्या पद्धतीने सर्व शिक्षण घेणे, पवित्र ज्ञान मिळविणे आणि एका वर्षात स्वतःला शेवटच्या प्रवासासाठी, म्हणजे महायात्रेसाठी, सज्ज करणे अपेक्षित असते. खोऱ्यात राहणाऱ्या अमर लोकांसारखे बनून त्याच्यासह उर्वरित आयुष्य घालवायचे असेल, तर त्यांना ही महायात्रा यशस्वीरीतीने पूर्ण करावी लागते.
अमन हा एक असाच जीव आहे. त्यााला त्याच्या आयुष्यात फार थोडे निर्णय मनाप्रमाणे घेता आले. पण अखेरीस मात्र त्याने ज्यामुळे राष्ट्राचे भवितव्य ठरेल, असा मोठा निर्णय घेतला. ही त्याची कथा आहे.
हिमालयातल्या एका गुप्त प्रदेशात घडणारे हे कथानक. ही वन्यासा नगरी आहे तरी काय ? ही काल्पनिक आहे की वास्तविक? तिथे अनेक जीव आयुष्यभर ध्यान धारणा करत असतात. अलौकिक असा हा प्रदेश आहे. एका रोमांचक आणि अद्भुत प्रवासाचे साक्षीदार व्हा.
या पुस्तकावरचे काही जाणकारांचे अभिप्राय – –
“पुढची अनेक वर्षे हे पुस्तक डोळ्यांसमोर ठेवून अद्भुतरम्य भारतीय कथा कशा लिहाव्या, हे ठरविले जाईल. ”
– अक्षत गुप्ता, लेखक
“संसार हे एक नवे आणि अप्रतिम पुस्तक असून त्यात भव्य घटना आणि अविस्मरणीय व्यक्तिरेखा आहेत. शेवटी हे भारताने हॅरी पॉटरला दिलेले उत्तर आहे. “
– कृष्ण उदयशंकर, लेखक
“संसार तुम्हाला एका अप्रतिम सफरीवर नेते, हिंदू विचारांनी प्रेरित झालेली ही कथा जादू, दैवतशास्त्र आणि गूढवाद यांचे एक उत्तम मिश्रण आहे. त्यात उत्तम रीतीने कथन केलेले कथानक आणि मनाची पकड घेणारा वेग आहे. पदार्पण करणाऱ्या या नव्या दमाच्या लेखकाची प्रतिभा कादंबरीच्या प्रत्येक पानावर दिसून येते. “
– हरीश भट, लेखक,
मार्केटर, स्तंभलेखक आणि ब्रँड कस्टोडियन, टाटा सन्स
“अतिशय खिळवून ठेवणाऱ्या नव्या विश्वाची निर्मिती, कल्पनेची सर्वोत्तम भरारी, “
– आनंद नीलकंठन, लेखक
“संसार ही अद्वितीय आणि मनोरंजक कथा आपल्याला हिमालयातील गुप्त प्रदेशात नेते, जिथे पर्वत आणि दैवतशास्त्र एकमेकांना भेटतात. सक्षम गर्गकडे खिळवून ठेवणारी गोष्ट आहे आणि तो एक रोमांचक आणि विचारप्रवर्तक कथानक उभे करतो.
– स्टीफन ऑल्टर, लेखक
संसारामध्ये वाचकांना आधी न पाहिलेले दैवी विश्व बघायला मिळते. यातील प्रत्येक भागात शक्तिशाली दृश्यात्मकता आहे. “
– केव्हिन मिसल, लेखक
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈