श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “ऐवज विचारांचा” – प्रा. स. ह. देशपांडे निवडक लेखसंग्रह ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : ऐवज विचारांचा “.
स. ह. देशपांडे निवडक लेखसंग्रह
पृष्ठे : ४३९
मूल्य : ५००₹
प्रा. स. ह. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष सरत असताना त्यांच्या निवडक लेखांचा संग्रह ‘ऐवज विचारांचा’ प्रकाशित होत आहे. प्राध्यापक देशपांडे यांनी पाच दशकांहूनही अधिक काळ विपुल लेखन केले व महाराष्ट्राच्या विचार-विश्वावर स्वतःचा एक विशिष्ट ठसा उमटवला. ‘राष्ट्रवाद’ या विषयाचे त्यांचे लिखाण हे अनेक मान्यवरांकडून व व्यासपीठांवरून चर्चिले गेले.
प्रस्तुत पुस्तकात स. हं. च्या लेखांची विभागणी ‘राष्ट्रवाद’, ‘सामाजिक आणि आर्थिक’, ‘व्यक्तिचित्रे’ आणि ‘संकीर्ण’ या चार प्रकारांत केली आहे. या सर्व लेखांतून प्रा. देशपांडे यांची स्वतंत्र लेखनशैली, विचारांतील सखोलता व सूक्ष्मता, तसेच तर्कशुद्ध व चिरेबंद मांडणी या बाबी वाचकाला सातत्याने जाणवत राहतील. आजही ताजे वाटणारे त्यांचे विचारगर्भ लेखन पुढील पिढ्यांनाही मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास वाटतो.
ग्रंथात चार विभाग केले केले आहेत.
विभाग एक : राष्ट्रवाद
या विभागात आठ लेख आहेत. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल, कार्यपद्धतीबद्दल स. ह. देशपांडे यांना काय वाटतं होते, ते मांडण्यात आले आहे.
विभाग दोन : समाजकारण व अर्थकारण
या विभागात पाच लेख आहेत. यामध्ये चार लेख विविध विषयांवर आहेत.
विभाग तीन : व्यक्तिचित्रे
या विभागात सहा लेख आहेत. यामध्ये पाच जणांचे व्यक्तिचित्रण आहे.
विभाग चार : संकीर्ण
या विभागात सात लेख आहेत. यामध्ये स. ह. देशपांडे यांच्याबद्दल लिहिलेले लेख आहेत.
स. ह. देशपांडे यांचे सुपुत्र डॉ. चंद्रहास देशपांडे यांनी ‘सलाम, ‘त्या’ ध्यासाला, ‘त्या’ अभ्यासाला… !’ या लेखात आपल्या वडिलांच्या पैलूंबद्दल लिहिले आहे. त्यातील काही परिच्छेद इथे देत आहे. ते लिहितात- ‘सल्लामसलत, चर्चा, विचारमंथन, मतप्रवाहांची देवाण-घेवाण, या सध्याच्या जगात (दुर्दैवाने) होत चाललेल्या शिक्षण पद्धती हा तर बाबांच्या शिक्षकी प्रकृतीचा आणि प्रवृत्तीचा आत्माच होय. बऱ्याच वर्षांपूर्वी पार्ल्याच्या घरी नियमितपणे एक चर्चासत्र बाबा मुद्दाम घडवून आणीत. अनेक विषयांवर त्यात खुली, खेळीमेळीच्या वातावरणातील, पण गंभीर चर्चा व्हायची, वादाच्या फैरीही झडायच्या. ’
‘स्वतःच्या मतांबद्दल आग्रही, नव्हे क्वचितप्रसंगी अत्याग्रही राहूनही, वैचारिक विश्वात वावरताना मात्र बाबा सदैव विचारस्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्तेच होते. उदाहरणार्थ- जेव्हा बाबांच्याच एखाद्या लेखावर वा पुस्तकावर चर्चा असायची, तेव्हा आपल्या प्रतिपादनाच्या विरुद्ध भाष्य करणाऱ्या अभ्यासू व्यक्तींना आवर्जून बोलवायला बाबा आयोजकांना सांगत असत; पण त्याबद्दल स्वतःही प्रयत्नशील असतं. ‘
‘एक व्यक्ती म्हणून बाबांकडे बघताना मला जर कायम जाणवणारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे हा एक ‘अस्वस्थ आत्मा’ होता. अनेक प्रकारच्या संवेदना असूनही बाबांना नेहमी जाणवत असे वा भिडत असे, ती एखादी सामाजिक वेदना. भोवतालच्या परिस्थितीत फार झपाट्याने सामाजिक- आर्थिक व मुख्यतः नैतिक अधःपात होत आहेत, मूल्यांचा पदोपदी ऱ्हास होत आहे, आपल्या देशाची अशी आयडेंटिटीच जणू वेशीवर टांगली आहे की काय, या व इतर अनेक समस्यांनी बाबा कायमच अस्वस्थ असत, त्यासाठी कायम एखाद्या विधायक मार्गाच्या शोधात असत. मात्र, आपले काम हे हातात मशाल घेऊन जाणाऱ्याचे नसून, वैचारिक पातळीवरून समाजाला काही मार्गदर्शन करण्याचे आहे, याची त्यांना पुरेपूर जाणीव होती. तत्त्वांशी ते तडजोड खपवून घेत नसत व आपल्या डोळ्यांदेखत कोणावरही अन्याय झालेला त्यांना सहनही होत नसे. त्यासाठी निर्ढावलेल्या सरकारी अधिकाऱ्यापासून, उद्धट बसवाहकापर्यंत कोणाशीही भांडायला ते मागेपुढे पाहात नसत. शारीरिक जोखीम पत्करूनही त्यांनी अनेक प्रसंगांना धैर्याने तोंड दिले आहे. ‘
‘आज मागे वळून पाहताना बाबांच्या वैविध्यपूर्ण, लालित्यपूर्ण तसेच सखोल लेखनाचा काहीसा अचंबा वाटतो. एकीकडे भोवतालच्या सामाजिक परिस्थितीचे निरीक्षण आहे, तर ग्रामीण आर्थिक वास्तवाचे (भावुक न होता) परीक्षण आहे; मान्यताप्राप्त व्यक्तींची/विभूतींचीही डोळस चिकित्सा आहे, तसेच राष्ट्रवादासारख्या स्फोटक विषयाची अभ्यासपूर्ण व अभिनिवेशरहित मीमांसाही आहे. रसग्रहण आहे, तेही मर्मग्राही आहे. प्रतिवाद करताना कोठेही आत्मप्रौढी नाही, अहंकार नाही. केवळ आणि केवळ मतभेद व्यक्त करणे आहे (जेथे वैयक्तिक टीका झाली, तेथे मात्र त्याचाही समाचार घेतला गेला आहे). दर्जा, पातळी कधीही घसरलेली नाही, ना शब्दांवरचा ताबा कधी सुटल्याचा प्रसंग… ‘
– – – वैचारिक, तर्कशुद्ध वाचनाची आवड असणाऱ्यांनी हा विचारांचा ‘ऐवज‘ अवश्य वाचावा. यामुळे आपल्या मनाची ‘वैचारिक‘ घुसळण मात्र नक्कीच होईल.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈