श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “फॉरेन बायोग्राफीज ऑफ राजा शिवछत्रपती” – लेखक – श्री सुरेन्द्रनाथ सेन – मराठी अनुवाद – श्री रोहित पवार ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : फॉरेन बायोग्राफीज ऑफ राजा शिवछत्रपती
(परकीयांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराज)
मूळ लेखक : सुरेंद्रनाथ सेन
मराठी अनुवाद : रोहित पवार
पृष्ठे:३७२
मूल्य: ४९९₹
परकीय प्रवाशांनी शिवरायांचे लिहिलेले चरित्र आणि समक्ष भेटून केलेल्या नोंदी यांचा हा एक अस्सल दस्तावेज…..
सतराव्या शतकात पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रजांनी भारताच्या विविध भागांत वखारी स्थापन करून आपापले बस्तान बसवले होते. या व्यापाऱ्यांबरोबर प्रवासी, वैद्य, अधिकारी आणि धर्मप्रसारकही भारतात आले. इथली संस्कृती, लोकांचे राहणीमान यांबद्दल त्यांनी आपल्या प्रवासवर्णनांतून, अहवालातून किंवा चरित्रातून नोंदी करून ठेवल्या. काही परकीयांनी छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकून, काहींनी त्यांना समक्ष भेटून नोंदी केल्या.
या सर्व परकीय प्रवाशांनी केलेल्या या नोंर्दीचा इंग्रजी अनुवाद सुप्रसिद्ध इतिहासकार सुरेंद्रनाथ सेन यांनी एक शतकापूर्वी केला होता. त्याचा हा मराठी अनुवाद म्हणजे इतिहास अभ्यासक, संशोधक आणि शिवप्रेमींसाठीचा एक अस्सल दस्तऐवज आहे.
संपूर्ण शिवचरित्र लिहिणारा पोर्तुगीज चरित्रकार कोस्मी द ग्वार्द
शिवाजी महाराजांचे स्वप्न अगदी कौतुकाने ऐकणारा फ्रेंच प्रवासी अॅबे कॅरे
शिवाजी महाराजांच्या सुरतलुटीचे वर्णन करणारा डच अधिकारी फ्रांस्वा व्हॅलेंटाइन
रायगड किल्ल्याचे ‘अभेद्य’ असे गुणवैशिष्ठ्य सांगणारा इंग्रज व्यापारी थॉमस निकल्स
शिवराज्याभिषेकास स्वतः उपस्थित राहून राजधानी रायगडावरील या सोहळ्याचे वर्णन करणारा इंग्रज अधिकारी हेन्री ऑक्झिंडेन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेचे बारकावे सांगणारा फ्रेंच अधिकारी फ्रांस्वा मार्टिन
– – – अशा अनेक परकीयांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराजांचे बहुरंगी व्यक्तिमत्त्व आपल्या समोर उभे राहते.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈