सौ राधिका भांडारकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆“आणि शेवटी तात्पर्य” – भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर ☆ 

पुस्तकाचे नाव   आणि शेवटी तात्पर्य(लघुकथा संग्रह)

मूळ लेखिका     हंसा दीप

अनुवाद            उज्ज्वला केळकर

प्रकाशक           मिलिंद राजाज्ञा

पृष्ठे                  १८४

किंमत              रु. ३३०/-

नुकताच,  सौ उज्ज्वला केळकर यांचा, “आणि शेवटी तात्पर्य ..”हा अनुवादित कथासंग्रह वाचनात आला.

यात एकूण १७ कथा आहेत आणि त्यांच्या, मूळ हिंदी लेखिका, कॅनडास्थित डॉक्टर हंसा दीप या आहेत.

डॉक्टर हंसा दीप या मूळच्या भारतातल्याच. त्या आदिवासी बहुल परिसरात जन्मल्या, वाढल्या, शिक्षित झाल्या.  त्यांनी शोषण, भूक, गरिबीने त्रस्त झालेल्या आदिवासींचे, तसेच परंपरांशी झुंजत, विवशतांशी लढणाऱ्या मध्यमवर्गीयांचे जीवन जवळून अनुभवले. त्यातूनच या कथा जन्माला आल्या.सृजन व संघर्षाचा अनुभव देणाऱ्या, या सुंदर कथांचं,  नेहमीप्रमाणेच उज्ज्वला ताईंनी केलेले अनुवाद लेखन, तितकंच प्रभावी आणि परिणामकारक आहे, हे या कथा वाचताना जाणवतं.

यातली पहिलीच, शीर्षक कथा ..”आणि शेवटी तात्पर्य ..”वाचताना, एक सहज वास्तव मनाला स्पर्शून जातं.  परदेशातले एक मंदिर आणि तिथे ध्यान धारणेसाठी जमलेली परदेशस्थित, भारतीय तरुण, वृद्ध, मध्यमवर्गीय माणसे. त्यांचे आपापसातले संवाद, चर्चा, आणि एकंदरच, वरवरचं  भासणारं वातावरण. या भोवती मंदिरातल्या पंडितांचही जोडलेलं, पोटासाठीचं भक्तिविश्व. केवळ एक व्यवसाय. आणि या सर्वांचे, शेवटी तात्पर्य काय तर मंदिरात येणारे भाविक आणि पंडित यांचा उथळपणा.

‘आपण काही क्षण तरी नतमस्तक झालो’, इतकेच श्रद्धेचे मापदंड.आणि त्यांच्या भावना एनकॅश करणारे पंडीत.  याचे सहज प्रतिबिंब, या कथेत उमटले आहे.

पोपटी पान पिवळं पान… या कथेत एका वृद्ध असहाय झालेल्या, एकेकाळच्या प्रख्यात डॉक्टरांची, एकाकी मानसिकता, त्याला बेबी सिटिंग च्या निमित्ताने सापडलेल्या, काही महिन्यांंच्या बाळासोबत झालेल्या दोस्तीमुळे, कशी बदलते, याचं अत्यंत भावस्पर्शी, अद्भुत वर्णन वाचायला मिळतं.

प्रतिबिंब…. ही कथा तर अत्यंत ह्रदयस्पर्शी आहे. नातीच्या आणि आजीच्या नात्याची ही कथा अतिशय भावपूर्ण, सहज बोलता बोलता लिहिली आहे.

जी आजी, नातीला लहानपणी  प्रॉब्लेम आजी वाटायची, तीच आजी, नात स्वतः मोठी झाल्यावर तिच्या अस्तित्वात कशी सामावून जाते, या प्रवासाची ही एक सुंदर कहाणी.

रुबाब… ही कथा लहान मुलांच्या विश्वाची असली तरी, माणसाच्या जीवनात पॉवर ही कशी काम करते, आणि त्यातूनच लाचखोरीची वृत्ती कशी बळावते, याचीच सूचना देणारी, काहीशी रूपकात्मक कथा वाटते.

मला नाही मोठं व्हायचंय… या कथेतील शेवटची काही वाक्यं मनाला बिलागतात.  कथेतल्या परीचे बालमन का दुखतं, त्याचं कारण हे शब्द देतात.

“मोठ्या लोकांना कळतच नाही की, जे तिने बघितले आहे,तिला आवडले आहे तेच काम ती करू शकेल ना? तिला पसंत असलेलं प्रत्येक काम ही मोठी माणसं रिजेक्ट का करत आहेत? तिच्या ‘मी कोण होणार’ या कल्पनेला का डावलतात?”

मग तिने मोठे होण्याचा विचारच मनातून काढून टाकला. वरवर ही बालकथा वाटत असली तरी, ती रूपकात्मक आहे, माणसाच्या जीवनाला एक महत्वाचा संदेश देणारी आहे.

छोटुली…  या कथेतल्या बालकलाकारावर, पालकांच्या प्रसिद्धी, पैसा, एका ग्लॅमरच्या मोहापायी होणारा आघात अनुभवताना, मन अक्षरशः कळवळते.

तिचं सामर्थ्य… ही कथा एका शिक्षण संस्थेत असलेल्या, द्वेषाच्या स्पर्धेवर प्रकाश टाकते.मिस हैली,एक प्राध्यापिका, तिच्यावरचे आरोप ती कशी परतवून लावते,आणि स्वत:चे निर्दोषत्व सिद्ध करते याची ही ऊत्सुकता वाढवणारी  कथा ,खूपच परिणामकारक आहे.

प्रोफेसर …ही कथा फारशी परिणामकारक नसली तरीही प्रोफेसर, विद्यार्थी, शिक्षणाबद्दलची अनास्था, राजकारण आणि या पार्श्वभूमीवर अधिकार आणि कर्तव्य याची, उपरोधिक, उपहासात्मक केलेली उलगड, ही चांगल्या प्रकारे  झाली आहे.

पाचवी भिंत… ही कथा समता सुमन या निवृत्त होणार्‍या,शाळेत प्राचार्य असलेल्या व्यक्तीच्या राजकारण प्रवेशाची आहे. काही धक्के बसल्यानंतर, राजकारण की पुन्हा शांत जीवन, या द्वद्वांत सापडलेल्या मनाची ही कथा खूपच प्रभावी आहे. आणि शेवटी समताने स्वीकारलेले आव्हान, आणि तिचे खंबीर मन, या कथेत अतिशय सुंदररित्या चितारले आहे.

रुपेरी केसात गुंतले ऊन… ही कथा तशी वाचताना हलकीफुलकी वाटली तरी, त्यात मनाच्या गाभाऱ्यातलं एक गंभीर खोल सत्य जाणवतं. आठवणीत रमलेल्या चार वृद्ध बहिणींच्या गप्पा, या कथेत वाचायला मिळतात.

“आतलं दुःख आजच काढून टाकायचं. हसून ,घ्यायचं.”

कुंडीतील सुकलेली फुले, पुन्हा नव्याने ताजी होत होती …..ही काही वाक्यं अंतराचा ठाव घेतात.

बांधाच्या खांद्यावर नदी.. .या कथेत भावनिक आंदोलनात सापडलेली स्त्री, अखेर त्यातून स्वतःच कशी सावरते, याचे एक सकारात्मक भावचित्र रेखाटलं आहे.

मधमाशी…ही कथा उल्लेखनीय आहे. अतिशय तरल भावनेला, बसलेला धक्का,यात अनुभवायला मिळतो.

तिचं हसू …..ही कथा जाणीवा नेणीवांच्या पलीकडची आहे.  या कथेत एका अकल्पित प्रेमाची ओळख होते. चूक की बरोबर या सीमारेषांच्या पलीकडे गेलेली, ही कथा मनाला घट्ट धरून ठेवते.

समर्पण…. या कथेत कोरोनाचा तो एक भयाण असा विनाशकारी काळ ,एका वेगळ्याच मानवतेचं ही दर्शन देतो. एक वृद्ध रुग्ण, स्वतःचा जीव वाचवण्यापेक्षा, एका तरुण रुग्णाच्या,  संपूर्ण भविष्याचा विचार करून मृत्यूला सामोरे जाण्यास तयार होते.

“त्याला या वेंटिलेटरची माझ्यापेक्षा जास्त गरज आहे. मी माझं आयुष्य जगले आहे. त्याचं जगणं महत्त्वाचं आहे.” असं डॉक्टरांना सांगून ती तिच्या जीवनाचे समर्पणच करते. अतिशय सुंदर कथा!

माझ्या घरच्या आघाडीवर….. ही कथा तशी हलकीफुलकी असली तरी परिवाराच्या सौंदर्याची मेख सांगणारी आहे. स्त्री सवलीकरणाच्या आंदोलनापासून, सुरुवात होणाऱ्या या कथेत, अंदोलनातला रुक्षपणा पटवून देणारी, काही वाक्यं मनाला फारच पटतात.

सविता, नेहा, एलिसिया, आणि यापूर्वी पाहिलेली आजी, आई, यांचा रुबाब सुयशच्या विचारांना नवी दिशा देतात. हे चेहरे त्याला आपले वाटतात. त्यांच्या धमकी भरलेल्या आवाजातही,प्रेम स्त्रवस्त असतं. ते संबंध परिवाराचा अर्थ शिकवतात. हे त्याला जाणवतं.थोडक्यात,या कथेत स्त्रियांच्या अनोख्या शक्तीत घेरलेलाच एक नायक आपल्याला भेटतो.

भाजी मंडई ….या कथेत एक विश्वस्तरीय समारंभात, देश विदेशी साहित्यिकांनी, स्वतःच्या सन्मानासाठी उठवलेला अभूतपूर्व गोंधळ अनुभवायला मिळतो. त्यातून प्रसिद्धीसाठी हापापलेल्यांचे मनोदर्शन अत्यंत वास्तविकपणे उभे रहाते.

अशा विविध विषयांवर हाताळलेल्या या सर्वच कथा मनोरंजना बरोबरच एक प्रकारचं ब्रेन वॉशिंगही करतात. आयुष्यात घडणाऱ्या बिन महत्वाच्या, साध्या, घटनातूनही आशय पूर्ण संदेश देण्याची, लेखिकेची क्षमता, कौतुकास्पद आहे.

आणि शेवटी तात्पर्य काय?.. तर एक अनोखे उत्कृष्ट कथा वाचनाचे समाधान!! उज्ज्वला ताईंची भाषांतर माध्यमांवर असलेली जबरदस्त पकड, याची पुनश्च जाणीव. त्यांचे अनुवादित लेखन, इतकं प्रभावी आहे की कुठेही मूळ कथा वाचनाचा, वाचकाचा आनंद, हिरावला जाऊच शकत नाही.  त्यासाठी आपल्याच संस्कृतीत रुजणाऱ्या कथांची, त्यांची निवड ही उत्तम आणि पूर्ण असते.

वास्तविक या कथा परदेशी वातावरणात घडलेल्या आहेत. पण तरीही त्या तिथल्या भारतीयांच्या आहेत. आपल्या संस्कृतीशी जुळणाऱ्या आहेत. म्हणून त्या वाचकाशी कनेक्ट होतात.

विचारांना समृद्ध करणाऱ्या या कथासंग्रहाबद्दल मूळ हिंदी लेखिका डॉक्टर. हंसा दीप (टोरांटो कॅनडा) आणि अनुवादिका सौ उज्ज्वला केळकर या दोघींचेही आभार आणि मनापासून अभिनंदन!!

धन्यवाद!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments