सौ राधिका भांडारकर
पुस्तकावर बोलू काही
☆“पाचा ऊत्तरी सफल संपूर्ण” – सौ. उज्ज्वला केळकर ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर ☆
पुस्तकाचे नाव: पाचा ऊत्तरी सफल संपूर्ण
लेखिका:उज्ज्वला केळकर
प्रकाशक:अरिहंत पब्लीकेशन
प्रथम आवृत्ती: १२जानेवारी २०२०
पृष्ठे:१९१
किंमत: रु २९०/—
पाचा उत्तरी सफल संपूर्ण..
उज्ज्वला केळकर यांचं पुस्तक हाती पडलं की ते कधी वाचते असेच होऊन जाते. पाचा ऊत्तरी सफल संपूर्ण हा कथासंग्रह वाचला आणि त्यावर भाष्यही करावेसे वाटले म्हणूनच हा लेखन प्रपंच!!
या कथा संग्रहात एकूण १४कथा आहेत. विविध विषय त्यांनी या कथांतून हाताळले आहेत. काही हलक्या फुलक्या विनोदी कथाही यात आहेत. हसवता हसवता त्याही विचार करायला लावतात. सामान्य माणसाचे मन, विचार, जीवन याभोवती गुंफलेल्या या कथा खूप जवळच्या वाटतात.
त्यापैकी काही कथांविषयी…
१. पाचा उत्तरी सफल संपूर्ण.. ही संपूर्ण कथा फ्लॅश बॅक मधे आहे. माई या या कथेच्या नायिका आहेत. मुले, सुना नातवंडं असा सुखाने एकत्र नांदणारा त्यांचा परिवार आहे. एक सुखवस्तु, कष्टकरी सधन सुखी परिवार. माईंना नुकताच, त्यांच्या समाजसेवेची दखल घेणारा प्रेरणा हा पुरस्कार मिळाला आहे. आणि त्या निमीत्ताने त्या गतकाळात, आठवणीत रमत त्यांच्या घटनात्मक आयुष्याचा आढावा घेत ही कहाणी उलगडत जाते.
बालपण, विवाह, सांसारिक जबाबदार्या, मुले, शिक्षणं, व्यावसायिक प्रगती अशा साचेबंद आयुष्यात घडणार्या अपघात, पतीनिधन, फसवणुकीसारख्या नकारात्मक घटनांचंही निवेदन आहे. आणि या सर्व पार्श्वभूभीवरचे माईंचे कणखर, सकारात्मक, प्रभावी व्यक्तीमत्व .. आणि त्याची ही बांधेसूद, सूत्रबद्ध कथा. सुख आले दारी हे सांगणारी साठा उत्तराची,पाचा उत्तरी सफल संपूर्ण झालेली कहाणी,वाचकाला आनंदच देते…
२. जन्म पुनर्जन्म.. मरणाला भोज्जा करताना होणारी मानसिक अंदोलने ,उज्ज्वलाताईंनी या कथेत अनुभवायला लावली. जन्म आणि मरण यातले अंतर, त्यांचं नैसर्गिक नातं, ती भोगणारी व्यक्ती आणि भवताल याचं संतुलन, अत्यंत प्रभावीपणे कथीत केलं आहे. पुनर्जन्माची एक वेगळी वास्तव कल्पना आहे ही. बाळंतपण म्हणजे बाईचा पुनर्जन्मच.. त्याविषयीची ही वेगळीच कथा.
३. तृप्त मी कृतार्थ मी.. शून्यातून विश्व निर्माण करणार्या पती पत्नींची ही कथा सुखद आहे.बाल कीर्तनकाराच्या रुपात नातु आपल्या आजी आजोबांची जीवनकथा त्यांच्या वाढदिवसाच्या निमीत्ताने कथन करतो.हा या कथेचा साचा. त्यातून सरकत जाणारी कथा वाचकाला गुंतून ठेवते. कथेचा विषय निराळा नसला तरी मनाला सकारात्मक उर्जा देते..
४. मधु.. कथा तशी लहान पण सकारात्मक. नशीबाचे अनंत फेरे सोसल्यानंतर अखेर चांगले दिवस येतात. मधुचा झालेला कायापालट या कथेत लेखिकेने सुरेख पद्धतीने मांडला आहे.
५. कृष्णस्पर्श.. अतिशय सुंदर कथा. माई— कुसुम यांची ही कथा. कीर्तन हा माईंच्या एकाकी जीवनाचा आधार. अचानक कुसुमसारखी कुरुप वेंधळी बावळट, शून्य आत्मविश्वास असलेली व्यक्ती त्यांच्या नि:संग जीवनात येते. दिव्यत्वाचा साक्षात्कार देणारा सूर मात्र कुसुमच्या गळ्यात असतो. माईंना ती कीर्तनात ती साथ देउ लागते. आणि एक दिवस कृष्ण कुब्जेच्या कथेचं निरुपण करत असताना ही कुरुप कुस्मी संगीताचा स्वर्गीय, दिव्यभक्तीचा असा काही अविष्कार दाखवते की स्वत: माईंनाही कृष्णस्पर्शच झाल्याचे जाणवते. आणि त्या दिवसापासून माईंचे आणि तिचे नातेच बदलते. अतिशय सुरेख, तल्लीन करणारी भावस्पर्शी कथा.
६. हसीना.. काहीशी मनोविश्लेषणात्मक, मनाला चटका लावणारी कथा. हसीना नावाच्या एका रुपवान तरुण मुलीची ही कथा. तिचे बालपण, तिच्या आयुष्यात येणारे पुरुष आणि त्यांच्याभोवती गुंतलेलं तिचं भावविश्व हे वाचकाच्या मनाला कधी सुखावतं. कधी टोचतं. हसीनाच्या मनातील अंदोलने लेखिकेने चपखल टिपली आहेत.
७. सुखं आली दारी.. ही कथा वाचल्यानंतर पटकन् मनात येतं असंही होऊ शकतं. ही कथा मनाला आनंद देते. शिवाय या कथेत जसे योगायोग आहेत तसा एक छुपा संदेशही आहे.
जीवन प्रत्येक टप्प्यावर बदलत असते. सुखी होण्याचे अनेक पर्यायही असतात. अशा पर्यायांचा विचार केला,स्वीकार केला तर आयुष्यातल्या, उणीवा, खड्डे भरुन काढता येतात. विकतचं शहाणपण, स्वर्गलोकात ईलेक्शन, एक (अ)विस्मरणीय प्रकाशन समारंभ या तीनही विनोदी कथा आहेत. थोडी विसंगती, कल्पकता, विडंबन, काहीशी अवास्तविकता या तीनही कथातल्या वेगवेगळ्या घटनांमधून वाचताना हंसु तर येतेच पण सामान्य माणसाच्या आयुष्यात अनुभवायला येणार्या दुनियादारीने धक्केही बसतात.
अशा वेगवेगळ्या रस, रंग भावांच्या या कथा. सुंदर लेखन. हलक्या फुलक्या पण विचार देणार्या. सर्वच कथा वाचनीय आहेत. त्यापैकी काही कथांचाच मी या लेखात आढावा घेतला.
सर्वांनी हा पाचा उत्तरी सफल संपूर्ण हा कथासंग्रह जरुर वाचावा आणि दर्जेदार साहित्याचा अनुभव घ्यावा.
उज्ज्वलाताईंचे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या साहित्य प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!!
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈