मराठी साहित्य – ☆ श्री गणेश चतुर्थी विशेष ☆ चिंतामणि चारोळी आणि गौराई ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. उनकी  श्री गणेश चतुर्थी के शुभ अवसर पर  श्री गणेश जी और गौरी जी की दो सामयिक रचनाएँ  चिंतामणि चारोळी आणि गौराईअष्टाक्षरी छंद कविता के स्वरुप में प्रस्तुत हैं.)

 

एक 

☆ चिंतामणि चारोळी ☆

श्री गणेशा गणेशा

झाले तुझे आगमन

मूर्ती पाहून तुझीरे

तृप्त जाहले हो मन !!१!!

तुझे होता आगमन

आम्हा होई ब्रह्मानंद

घरदार उत्साहात

होई सर्वांना आनंद !!२!!

तुझ्यासाठी बघ केले

किती सुरेख मखर

त्यात बैसवुनी तुला

म्हणू आरती सुस्वर !!३!!

तुला वाहण्यासाठीच

पत्री फुले सुवासिक

तुला फाया अत्तराचा

तूच आहेस रसिक !!४!!

तुझ्या आरतीला बघ

सारे कसे गोळा झाले

नेवैद्यासाठी मोदक

उकडीचे बघ केले !!५!!

गूळ नारळ घालून

केले सारण तयार

वेलदोड्यांचा मसाला

झाले मोदक सुंदर!!६!!

मोदकाच्या सारणात

खूप खुलून सुंदर

किती दिसते मोहक

काश्मीरचे ते केशर !!७!!

गणेशाला वाहताती

एकवीस दुर्वाजुडी

शमी माका जाईजुई

तुला केवडा आवडी !!८!!

माका आहे रसायन

मूत्रपिंडाचा आजार

त्वचारोग विंचूदंश

प्रभावी या रोगांवर!९!!!

तुला आवडती फुले

मधुमालती सुंदर

सांधेदुखी कमी होई

फुफ्फुसांचे ते आजार !!१०!!

हा केवडा सुवासिक

सागराच्या काठावर

थायरॉईड घशाच्या

गुणकारी रोगांवर !!११!!

बेलपत्र शंकरांचे

आहे औषध छान ते

पोटातील जंतांवर

उष्णता कमी करीते!!१२!!

रुई मांदार प्रसिद्ध

अहो हत्तीरोगावर

अति उत्तम औषध

कुष्ठरोगावर फार !!१३!!

तुला आवडे आघाडा

फुले जाईची हो खास

निळी गोकर्ण रंगाची

तुझी आवड विशेष!!१४!!

फुले हादगा देखणी

लागे भाजी छान त्यांची

जीवनसत्वे अनेक

हीच ओळख फुलांची !!१५!!

 

दोन

गौराई ☆

आल्या आल्या गौरीबाई

स्वागत करा हो खास

बसायला द्या हो पाट

करा त्यांची उठबस !!१६!!

दारी सुंदर रांगोळी

काढुनिया ठिपक्यांनी

करा आगत स्वागत

घरच्या सुवासिनींनी!!१७!!

वाजवीत चला घंटा

द्यावे मुलींच्या हातात

निरांजन तबकात

त्यात घाला फुलवात !!१८!!

हळदी कुंकाचा मान

त्यांना देऊनिया छान

त्यांचे करुनी औक्षण

करा त्यांचा हो सन्मान !!१९!!

आल्या गौराई गौराई

हाती कडे पायी तोडे

पैंजणाची रुणझुण

पहा वाजती चौघडे !!२०!!

आल्या गौराई गौराई

नाकी नथ ती सुंदर

कानी बाळी ती बुगडी

शालू नेसल्या सुंदर!!२१!!

गळा साजाचं डोरलं

झुमझुम कंकणांची

ध्वनि मधुर नादात

ओढ माहेर घरची !!२२!!

आल्या गौराई गौराई

त्यांची पाऊले सोन्याची

करा त्यांना लिंबलोण

करा आरास घराची !!२३!!

आल्या गौराई गौराई

भरजरी शालू त्यांना

नेसवा नीटनेटके

ओटी सुंदर भरा ना !!२४!!

ओटीत गं त्यांच्या घाला

जरी खण व नारळ

लवंग नि वेलदोडे

हळकुंडे व तांदूळ!!२५!!

गौराबाईंना आवडे

माका आघाडा मरवा

शमी दुर्वा बेलपत्री

आणि केवडाही हवा!!२६!!

पत्री सगळी औषधी

दुर्वा उष्मा कमी करी

दातांसाठी आघाड्याचा

उपयोग होई भारी !!२७!!

आल्या आल्या हो गौराई

करा नेवैद्य पोळीचा

चला पुरण शिजवा

भात वासाच्या साळीचा !!२८!!

करा पुरणाचे दिवे

त्यांना औक्षण कराया

हळद कुंकू लावुनी

त्यांचा सन्मान कराया !!२९!!

थाट हळदी कुंकाचा

होई सप्तमी दिवशी

गोड मिठाई फळांची !

खेळण्यांची रास खाशी !!३०!!

झाल्या प्रसन्न गौराई

देती तुम्हा आशीर्वाद

लाभो ऐश्र्वर्य सर्वांना

नांदो घरात आनंद !!३१!!

©®उर्मिला इंगळे