मराठी साहित्य – ☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होत आहे रे # 15 ☆ श्रीमंती ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

(वरिष्ठ  मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है. इसके अतिरिक्त  ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण  उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है. श्रीमती उर्मिला जी के    “साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होत आहे रे ”  की अगली कड़ी में आज प्रस्तुत है  उनका  एक भावप्रवण  आलेख  श्रीमंती। )

☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 15 ☆

☆ श्रीमंती ☆

घराबाहेर पडले अन् चालायला सुरुवात केली तेवढ्यात ‘ आवं ताई..! आवाजाच्या दिशेनं पाहिलं तर रस्त्याकडेला कधीमधी बसणारी वयस्कर बाई मला बोलावीत होती.मी म्हटलं, कां हो..?

तशी ती जरा संकोचल्यासारखी झाली न् म्हणाली..”ताई तुमच्या अंगावरलं लुगडं लयी झ्याक दिसतया बगा.!”

मी हसून पुढं चालायला लागले तशी ती पट्कन म्हणाली मला द्याल कां वं ह्ये लुगडं..?अक्षी म ऊशार  सूत हाय असलं मला कुनीबी देत न्हाई वं ! हे थंडीच्या दिसांत लयी छान..! आन् आमाला ही असली देत्यात असं म्हणून तिनं अंगावरची सिंथेटिक साडी दाखवली.

मी थोडी विचारात पडले कारण मी नेसलेली साडी एका भव्य प्रदर्शनातल्या आंध्रप्रदेश स्टाॅलमधून मी नुकतीच खरेदी केली होती.आणि माझ्या आवडीचा ग्रे कलर,साडीचं सूत पोत अतिशय सुरेख मस्त कांबिनेशनची साडी मिळाल्याने मी हरकून गेले होते.आणि मी आज पहिल्यांदाच नेसले होते.

मी विचारात पडलेली पाहून ती बाई म्हणाली ताई तुमची इच्छा असल तरच द्या.

मी आता वेगळ्याच विचारात होते.मी अंगावरची साडी तिला कशी द्यावी. म्हणून तिला म्हटलं माझ्याकडे आणखी छान साडी आहे तुला आणून देते.तशी ती म्हणाली दुसरी नको..हीच …

तुमच्या अंगावर कायम सुती लुगडी असत्यात मला लयी आवडत्यात.पन् ही आजची माझ्या मनात भरलीया..!

मग मी म्हटलं हो हीच देईन पण अशीच कशी देऊ धुवून नंतर देते.

नंतरच्या रविवारी ती बसलेली मला दिसली मग मी घरुन धुवून इस्त्री करुन ठेवलेली ती साडी त्यावरचं ब्लाऊज व त्यावर  एक नवीन ब्लाऊजपीस असं तिच्या हातावर ठेवलं व तिला वाकून नमस्कार केला.तशी ती थोडी मागे सरकून म्हणाली हे काय वं ताई..? मला नमस्कार करताय.?

मग मी तिला म्हटलं मी तुला खूप वर्षापासून ओळखते.आज तू खूप दिवसांनी दिसलीस .पण पंचवीस तीस वर्षांपूर्वी आमचं हे घर शेणामातीच्या भिंतींचं होतं तेव्हा तूंच मला ते सारवण्यासाठी शेण आणून द्यायचीस.मला भिंती सावरायला घर साफ करायला मदत करायचीस.हे मी विसरले नाही.तेव्हा मी तुला नमस्कार करण्यात  वेगळं  काहीच नाही.

मी स्वत: नोकरी करत असल्याने मी तशी साडी केव्हाही घेऊ शकले असते पण आज तिला त्या साडीची जास्त गरज होती व तिच्या मनात ती भरली होती.

पुढच्या रविवारी जाताना माझं सहज लक्ष गेलं तर ती साडी नेसून मॅचिंग ब्लाऊज घालून उभी होती.मी तिच्याकडे पाहिलं तर तिच्या चेहऱ्याची श्रीमंती काही वेगळंच सांगत होती.मी भरुन पावले.

©®उर्मिला इंगळे

सातारा.

दिनांक:-२८-११-१९

!!श्रीकृष्णार्पणमस्तु!!