मराठी साहित्य – ☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 1 ☆ नवनिर्मिती ☆ – श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे जी का धार्मिक एवं आध्यात्मिक पृष्ठभूमि से संबंध रखने के कारण आपके साहित्य में धार्मिक एवं आध्यात्मिक संस्कारों की झलक देखने को मिलती है। इसके अतिरिक्त ग्राम्य परिवेश में रहते हुए पर्यावरण उनका एक महत्वपूर्ण अभिरुचि का विषय है। हम श्रीमती उर्मिला जी के आभारी हैं जिन्होने हमारे आग्रह को स्वीकार कर “साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होतं आहे रे ” शीर्षक से प्रारम्भ करने हेतु अपनी अनुमति प्रदान की। इस कड़ी में आज प्रस्तुत है उनका आलेख नवनिर्मिती। )
☆ साप्ताहिक स्तंभ –केल्याने होतं आहे रे # 1☆
☆ नवनिर्मिती ☆
मागच्या वर्षीची गोष्ट.उन्हाळ्याची तलखी संपून नुकताच वर्षाऋतू येवू घातला होता.मी प्रवासाला निघाले होते.गाडीतनं बाहेर पहात होते.सग्गळीकडं नांगरलेली काळीभोर शेतं कशी ओळीनं जाजमं अंथरल्यागत दिसत होती.शेतीची खरीपाची लगबग सुरू होती.काही शेतात शेतकरी पाभारीवर उभे राहून पेरणी करताना दिसत होते.बैलांच्या गळ्यातला घुंगुरांची किणकिण ,शेती औजारांचे कुर्रकुर्र आवाज आणि पावसाळी कुंद हवा , खूप छान वाटत होतं.
मी आठ-दहा दिवसांनी माझं काम संपवून परतीच्या प्रवासात होते.येताना परत तीच शेतं पहात होते पण आज त्या काळ्याभोर जाजमांवर सुंदर रेशीमहिरवी नक्षी काढल्यागत दिसत होतं.नाजुक हिरवीगार पानं वाऱ्यानं डुलताना दिसत होती.पेरलेल्या बियाणांना अंकुर फुटले होते.निसर्गाची ही नवनिर्मिती खूपच मनभावन वाटतं होती.
अशीच एकदा काही दिवसांसाठी परगावी गेले होते.प्रवासातून आल्याआल्या जरा खुर्चीत डोकं टेकून शांतपणे बसले होते, इतक्यात खिडकीच्या बाजूने मला छानसा सुगंध जाणवला.मी झटकन् उत्सुकतेने खिडकी उघडून पहाते तो काय, मागच्या पंधरवड्यात वानरांनी ज्या छोट्याशा झाडांची सग्गळी पानं खाऊन टाकली होती अन् अगदी उघडंबोडकं केलं होतं त्याच झाडाला इतका देखणा सोनपिवळ्या रंगाचा मोहोर आला होता,ते छोटंसंच झाड पण मोहोराने खूप भरगच्च डवरलेलं दिसत होतं मी पहातच राहिले.
माझं विचारचक्र सुरू झालं.निसर्गाचं कसं आहे पहा! ज्यावेळी त्या बिचाऱ्या वानरांना भूक लागली होती ती शमवण्यासाठी त्यांना त्या झाडाची पानं खायची परवानगी निसर्गानंच म्हणजे पर्यायानं देवानंच दिली, आणि आज त्याच निसर्गानं त्या झाडाला भरभरुन मनमोहक झुपकेदार मोहोर बहाल केला होता.चैत्रपालवी फुटल्यानंतर पानं पण झाडावर येवू लागली होती व जोडीला मोहोर आला .निसर्गाची नवनिर्मिती किती अगाध आहे पहा..! या विचारांनी त्या निसर्गदेवतेपुढे मी नतमस्तक झाले.
मध्यंतरी माझ्या वाचनात आलं की, अपंगांसाठी ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन वाहून घेतलं त्या कोल्हापूरच्या नसीमा हुरजुक दिदींचे डॉ. पी. जी. कुलकर्णी म्हणतात “मी दिदींना,आता हे काम तुमच्या तब्येतीला त्रास देतंय, तर तुम्ही विश्रांती घ्या ,शांत रहा”. असं म्हटल्यावर दिदी एकदम म्हणाल्या “तुम्ही माझ्या विश्रांतीचा, शांतीचा विचार करु नका. माझी अशांतता मला नवीन काम करायला प्रवृत्त करते. माझ्या माघारी काय होईल असा विचार करत बसले तर या जगात नवं काही स्थापनच होणार नाही. प्रत्येकाच्या माघारी हे जग चालतंच ! मी हे सारं करणारच ! आपल्या देशात लाखो अपंग दुर्लक्षिले जात असताना तुम्ही मला शांत रहाण्याचा सल्ला देताय?”
डॉ. म्हणतात, दिदींचा डॉक्टर म्हणून त्यांच्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्याचा विचार मी करत होतो.पण दिदींच्या बोलण्याने मला आज एका नव्या सत्याचा स्पर्श झाला होता.
काही माणसं स्वत:च्या जीवनाची आहुती देऊनच अगतिकांना ऊर्जा देत असतात.त्यांची अस्वस्थता ही नवनवीन ऊर्जा स्रोतांची केंद्रे असतात.ते करत असलेल्या नवनिर्मिती साठी लागणारा अग्नी ते स्वत:च्या त्यागातून प्रज्वलित करत असतात.
असे असीम कार्य करणाऱ्या आपल्या सर्वांच्या “नसीमा दिदींच्या ” असामान्य सेवेला जबरदस्त. सलाम !!
©®उर्मिला इंगळे, सातारा