मराठी साहित्य – मराठी आलेख – ☆ स्त्री कालची आणि आजची ☆ – कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

☆ स्त्री कालची आणि आजची ☆

(प्रस्तुत है  कविराज विजय यशवंत सातपुते जी  द्वारा  लिखित मराठी आलेख  ☆ स्त्री कालची आणि आजची ☆  जो आपको  हमारे पुरातन एवं नवीन साहित्य और समाज में वर्णित नारी के विभिन्न रूपों के साथ ही पुरुष प्रधान समाज में  उसके संघर्ष से अवगत कराएगा

रामायण  आणि महाभारत  ही आपली महाकाव्ये.  या दोन पौराणिक कथानकातून स्त्री ची विविध रूपे समोर आली.  अहिल्या,  द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी या स्त्रिया महान पतिव्रता म्हणून जनमानसात रूजल्या गेल्या.  यांचे केवळ स्मरण केल्याने महापातकांचा नाश होतो  असे संस्कार या काळात केले गेले.

संत वाङमय,  पंत वाड़मय आणि शाहिरी फड यातून वर्णिलेली स्त्री लोकसाहित्याचा विशेष भाग ठरली. जनमानसात खोलवर रूजलेली ही स्त्री,  समस्त नारीशक्ती समाजाशी संवाद साधत गेली. माया, ममता  आणि करूणा या भावनांच्या मुशीतून घडलेली ही स्त्री  त्याग, समर्पण  आणि विश्वास या  त्रिसूत्रीतून स्वतःला, कुटुंबाला,  समाजाला घडवीत गेली.

पौराणिक  काळातील स्त्री पातिव्रत्य, हे अस्त्र समजून स्वसंरक्षण करीत गेली. सत्यवती, माद्री, कुंती गांधारी, सुनिती, सुरूची, आदिती,  छाया, अनुसया,  लक्ष्मी, सरस्वती, पार्वती, यशोदा, देवकी, रूक्मिणी सुभद्रा  या, सर्व स्त्रियांनी उत्पत्ती,  स्थितीआणि लय  यांचा समतोल राखण्यासाठी वेळीवेळी सत्व परीक्षा दिली.  पुरुष प्रधान संस्कृती चा संघर्ष त्या  काळापासून आज तागायत ही स्त्री करीत आहे.

कालची स्त्री जेव्हा जेव्हा बंड पुकारून जागृत झाली तेव्हा तेव्हा ती समाजासाठी  आदर्श ठरली. पण हे  आदर्श पण टिकवायला तिला स्वतःला  अतोनात कष्ट सहन करावे लागले.  संत मीराबाई, संत जनाबाई, संत सखू, संत कान्होपात्रा, संत मुक्ताबाई यांचा जीवन प्रवास  अत्यंत कष्टमय होता.  यांच्या शब्द सुमनांची वैजयंती माळा विठ्ठलाच्या गळ्यात पडली पण त्यासाठी समाजकंटकाची वासनांध नजर, कर्मठ रूढी परंपरांची  तीक्ष्ण धारधार सुई काळजात आरपार टोचून घ्यावी लागली.

ऐतिहासिक कालखंडात स्त्री ने पौराणिक काळातील शस्त्र विद्येचा अभ्यास करून न्यायासाठी,  संघर्षासाठी रणांगणात उतरली.   छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मदात्री एकमेव ठरली. यानंतर  अशी  स्त्री जन्मली नाही  असे खेदाने म्हणावे लागेल. कारण  आजतागायत प्रति शिवाजी जन्माला  आलेला नाही.  शिवाजी महाराजांनंतर शिवशाहीतील दोन स्त्रीयांनी वर्षानुवर्षे तुरूंग वास भोगला.  महाराणी येसूबाई,  आणि ताराबाई या दोन स्त्रिया होत.  एकीने स्वराज्यासाठी यवनी कैद स्विकारली तर ताराबाई सवती सुभ्यामुळे स्वराज्यातच कैदेत होत्या. महाराणी जोधाबाई,  झाशीची राणी, राणी चन्नमा, चांदबिबी, मुमताज, रमाबाई,  आनंदी बाई या स्त्रिया शेवटपर्यंत लढा देत गेल्या.

या  सर्व इतिहासाचा मागोवा घेत सावित्री, रमाई,अहिल्याबाई,  आनंदी जोशी, रमाबाई रानडे या स्त्रिया स्वतः साक्षर झाल्या. मुलगी शिकली प्रगती झाली हे ब्रीदवाक्य  इतिहासात कोरले गेले ते यांनी केलेल्या समाज कायामुळे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला  अत्यंत विश्वासाने मोठ मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. कला,उद्यम  आणि संस्कृती या  क्षेत्रात महिला  आघाडीवर आहेत. पण चार भिंतीच्या आत  आजची स्त्री  अजूनही  असुरक्षित आहे.  कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडणार्‍या स्त्रिया त्यांच्या वेदना  आजही कुठेतरी धुमसत आहेत.

कालची स्त्री आणि आजची स्त्री रूपे आणि स्वरूप बदलले आहे. पण त्याग, समर्पण,  अवहेलना स्री ला आजही चुकलेली नाही.  आजची स्त्री समाजात  अर्थार्जनासाठी बाहेर पडताना  आजही सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडून पुरूषी  अहंकाराचा सामना करीत कुटुंबाला सावरीत आहे.  सत्ता, पैसा आणि वासना यांचा उपभोग घेण्यासाठी  आजही स्त्री वापरली जाते, विकली जाते,  रूढी परंपरांच्या नावाखाली नागवली जाते.

विभक्त कुटुंबाची वाढत जाणारी संख्या सासू सून संघर्ष, माहेरचे अती लाड,  इगो प्रोब्लेम,  पैशाची गुर्मी यात अजूनही स्त्री प्रमुख पात्र म्हणून खेळवली जाते.

अनाथ  आश्रम,  वृद्धाश्रम,  पाळणाघर या समस्येला सामोरे जाणारी स्त्री समाजाकडून  आजही दोषी ठरवली जाते. माता, भगिनी, पत्नी,  सखी या रूपात समोर येणारी स्री  आजही पुरूषी अत्याचाराला बळी पडत आहेत.

काळ बदललाय, माणूस बदललाय , जमाना बदललाय. . .असः नेहमी ऐकतो  आपण. कोणी घडवले हे बदल? माणसानच आपली विचारसरणी बदलली  आणि दोष बदलत्या काळाला आणि स्त्री ला पुरूष वर्ग परस्पर देऊन  मोकळा झाला. आपण समाजात रहातो. . . समाजाचे देणे लागतो. . . ही संकल्पना प्रत्येकाने सोइस्कर अर्थ लावून बदलून घेतली. स्वतःची जीवनसंहिता ठरवताना प्रत्येकाने माणसापेक्षा पैशाला  अधिक महत्त्व दिले  अन तिथेच नात्यात परकेपणा आला.

☆ चार पायाच्या प्राण्यांना ☆

☆ हौसेने पाळतात माणसं ☆

☆ दोन पायाच्या  आप्तांना ☆

☆ मोलानं सांभाळतात माणसं ☆

हे आजचं वास्तव आहे.   विभक्त कुटुंब पद्धतीतून जन्माला आलेली ही विचार सरणी. आज ”हम दो हमारा  एक”  चा नारा लावणारे सुशिक्षित पाळीव, मुक्या प्राण्यांवर अतोनात भूतदया दाखवतात.  अन जन्मदात्या आईवडिलांना मात्र वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतात. मी मी म्हणणारे सुशिक्षित पतीपत्नी दिवसरात्र घराबाहेर रहातात. नवी पिढी सोशल मिडिया नेटवर्किंग मधून स्वतःचे भविष्य साकारताना दिसते. एकविसाव्या शतकातील घर संवाद साधताना कमी पण वाद घालताना जास्त दिसतात.  वाद वाढले की माणस माणसांना टाळायला लागतात. अशी नात्यातली अंतरेच नात्यात विसंवाद  आणि दरी निर्माण करतात.

नवीन पिढीला  आता संस्कारापेक्षा व्यवहार जास्त महत्वाचा वाटतो. पैसा  असेल तर माणूस ताठ मानेने जगू शकतो हा  अनुभव त्याला  आपल्या माणसात दुरावा निर्माण करायला भाग पाडतो. जुन्या पिढीतील नातवंडे सांभाळणारी जुनी पिढी, त्यांचे विचार,  नव्या पिढीला नकोसे वाटतात. ”पैसा फेको तमाशा देखो” हे ब्रीद वाक्य घेऊन नवीन पिढी माणुसकी पेक्षा  मतलबी पणाला प्राधान्य देताना दिसते.

वृद्धापकाळी हवा असलेला मायेचा ओलावा, समदुःखी, समवयस्क व्यक्ती कडून मिळाल्यावर  एकटा जीव वृद्धाश्रमात आपोआप रुळतो. स्वतःच दुःख विसरायला शिकतो.  प्रत्येक व्यक्ती  आपला राग आपल्या व्यक्ती वर किंवा पगारी नोकरावर काढू शकते.  वृद्धाश्रमात या दोन्ही गोष्टी शक्य नसल्याने माणूस नव्याने जगायला शिकतो. स्वतःच्या विश्वात रममाण होण्यासाठी स्वतःच्या भावनांना  आवर घालतो आणि हा नवा घरोबा स्विकारतो.

नवीन पिढीला घडविण्यात आजची स्त्री  कुठेतरी कमी पडत  आहे का? याचा विचार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

आपण कुणाचा  आदर्श घ्यायचा? कुणाचा आदर्श समोर ठेवायचा?  आपली जबाबदारी,आपली कर्तव्ये हे सारे जर  आपण  आपल्या  आर्थिक परिस्थितीशी निगडीत केले तर हा गुंता सोडवायला  अतिशय कठीण जाईल.

आपण  आणि आपली जबाबदारी यात जोपर्यंत  ”आई बाबा ‘, यांचा समावेश होत नाही तोपर्यंत ही पळवाट आडवाटेन या समाजव्यवस्थेला,  कुटुंब व्यवस्थाला दुर्बल करीत रहाणार यात शंका नाही.

मी माणसाचा आहे, घरातील बाई माणूस माझ्या कुटुंबाचा घटक आहे त्याच मन जपणे ही माझी जबाबदारी  आद्यर्तव्य आहे हे जोपर्यंत पुरुष प्रधान संस्कृती  मान्य करीत नाही तोपर्यंत ही पळवाट अशीच निघत रहाणार. आपण घडायचं की आपण बिघडायचं स्री ला आधार द्यायचा की  भार व्हायचं हे  आता ज्याचं त्यानचं ठरवायचं.

कालची स्त्री आणि आजची स्त्री  हा विचार करताना मन खालील काव्यपंक्तीवर स्थिर होते.

☆ थोर महात्मे होऊन गेले,  चरीत्र त्यांचे पहा जरा ☆

☆ आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडे बोध खरा ☆

या नररत्नांना जन्मणारी ही माऊली आज समाजात सुरक्षित आहे का? हा प्रश्न  ऐरणीवर आला आहे.

या देशाच्या सर्वोच्च पदी राष्ट्रपती पदावर राहण्याचा मान मिळूनही  ☆आजची स्त्री☆ उपभोग्य वस्तू समजली जाते हे आपले  दुर्दैव आहे. विश्वबंधुतेचा आणि समानतेच्या नारा देऊन  आपण ही नारीशक्ती आद्य ईश्वराचे रूप मानून स्त्रीला संघटीत आणि सुरक्षित करण्याची जबाबदारी  आपल्यावर  आली आहे.  तरच  आपण  अभिमानाने म्हणू शकू.

 

© विजय यशवंत सातपुते, यशश्री पुणे. 

मोबाईल  9371319798

विजय यशवंत सातपुते.