‘सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे
संपादकीय निवेदन
अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!
तितीक्षा इंटरनॅशनल पुणे आयोजित दशदिवशीय नवरात्र काव्य लेखन स्पर्धेत आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका व कवयित्री सुश्री उज्ज्वला सहस्रबुद्धे यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे नवरात्रातील प्रत्येक दिवसासाठी एक आणि दसऱ्यासाठी एक अशा एकूण दहा काव्यरचना स्पर्धेसाठी मागवलेल्या होत्या, आणि सगळ्या रचना विचारात घेऊन क्रमांक ठरवण्यात आले. उज्ज्वलाताईंचे आपल्या सर्वांतर्फे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा.
– आजच्या अंकात वाचूया त्यातील त्यांची एक पुरस्कारप्राप्त कविता – “सीमोल्लंघन करू…”
– संपादक मंडळ
ई – अभिव्यक्ती, मराठी विभाग
कवितेचा उत्सव
☆ सीमोल्लंघन करू… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
☆
नवरात्रीचे दिवस,
आगमन दसऱ्याचे !
रंग,रूप नव रीती,
जगी या आचरण्याचे !..१
*
सीमोल्लंघन करू या,
दुष्ट अनिष्ट प्रथांचे !
स्वागत आपण करू,
नित्य नूतन जगाचे !….२
*
देवी शारदे स्फूर्ती दे,
साहित्य नवे लिहावे !
उदासी मनाची जावी,
कार्य नवे आचरावे !…३
*
रामायण ते दाखवी ,
अन्यायाचे निर्दालन!
महाभारत शिकवी ,
दुष्टांचे व्हावे दमन !…४
*
इतिहासातून घ्यावा ,
बोध मनी घटनांचा !
दुष्ट शक्तींना मारून,
विजय व्हावा सत्याचा !…५
*
सीमोल्लंघन करूनी,
वाट पुढील पहावी !
आयुष्यात प्रत्येकाच्या,
नवीन पहाट व्हावी !…६
☆
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे