सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
श्री सुहास रघुनाथ पंडित – अभिनंदन
संपादकीय निवेदन
आपल्या समूहाचे साक्षेपी संपादक, चतुरस्त्र लेखक आणि कवी श्री सुहास रघुनाथ पंडित यांचा … “ प्रेम रंगे, ऋतूसंगे “ … हा दुसरा काव्यसंग्रह आज प्रकाशित होतो आहे.
श्री. पंडित यांचे आपल्या सर्वांतर्फे अगदी मनःपूर्वक अभिनंदन, आणि उत्तरोत्तर त्यांच्या हातून अशीच दर्जेदार साहित्य-निर्मिती होत राहू दे अशा असंख्य हार्दिक शुभेच्छा !!
हा प्रकाशन समारंभ सांगलीमध्ये संपन्न होत आहे, त्यामुळे सांगलीतील काव्य-रसिकांसाठी या कार्यक्रमाची माहिती देणारी पत्रिका —
या नव्या संग्रहातली एक नवी कोरी सुंदर कविता आपल्या सर्वांसाठी सादर —
शब्दरंग…
☆
कुंचल्याचे रंग ओले उतरले शब्दांतून
रंग शब्दांतून फुलले कल्पनांचे पंख लेऊन
☆
मोरपंखाची निळाई पसरली ओळींतून
पाखरांची पाऊले ही खुणविती पंक्तीतून
☆
पुष्पगुच्छांच्या परि ही जोडलेली अक्षरे
झेप घेती शब्द जैशी आसमंती पाखरे
☆
शब्दवेलीतून फुटते कल्पनेला पालवी
स्पर्श होता भावनांचा अर्थ भेटे लाघवी
☆
गर्भितार्थाच्या गुहेतून अर्थवाही काजवे
गंधशब्दांतून येती जणू फुलांचे ताटवे
☆
प्रकृतीच्या हर कृतीतून गीत जन्मा ये नवे
अंतरंगातून उडती शब्द पक्ष्यांचे थवे
☆
रंगले हे शब्द आणि शब्दांतूनी रंगायन
शब्द आणि रंग यांचे अजब हे रसायन
☆
कुंचला की लेखणी ? मी धरू हातात आता
शब्द फुलले,रंग खुलले,मी अनोखे गीत गाता.
☆
सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈