21 सप्टेंबर- संपादकीय
आज श्री लक्ष्मीकांत तांबोळी यांचा जन्मदिन (२१ सप्टेंबर) कविता, कथा, ललित लेख इ. बहुविध वाङमय प्रकार त्यांनी हाताळले.
कविता संग्रह – अस्वस्थ सूर्यास्त ‘गोकुळवाटा, जन्मझुला, हुंकार इ.
कथा – तवंग, सलामसाब, ललित लेख – कबिराचा शेला, सायसावल्या, इ.
कादंबरी – कृष्णकमळ, गांधकाली, दूर गेलेले घर
समीक्षा – कवि वृत्ती आणि प्रवृत्ती इ. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. कलावंत कधी निवृत्त होत नसतात, असं ते म्हणत.
आजच्या अंकात वाचा, त्यांची कविता ‘अनंता एवढे द्यावे.’
अनंता येवढे द्यावे
अनंता येवढे द्यावे, फुलांचे रंग ना जावे.
उडाया पाखरांसाठी जरा आभाळ ठेवावे.
घराला उंबरा राहो, पेटती राहू दे चूल
कुणाही मायपदराशी खेळते राहू दे मूल
तान्हुल्या बाळओठांचा तुटो ना दे कधी पान्हा
असू दे माय कोणाची असू दे कोणता तान्हा
चालता तिमिर वाटेने सोबती चांदणे यावे
घणाचे घाव होताना फुलांनी सांत्वना द्यावे.
कितीही पेटू दे ज्वाळा जळाचा जाळ न व्हावा
बरसत्या थेंब थेंबाचा भुईतूनी कोंब उगवावा.
अनंता येवढे द्यावे, भुईचे अंग मी व्हावे
शेवटी श्वास जाताना फुलांचे रंग मी व्हावे.
कवी : श्री लक्ष्मीकांत तांबोळी
चित्र साभार – Laxmikant Tamboli | Facebook
आज कविवर्य सदानंद रेगे यांचा स्मृतिदिन. त्यांचा जन्म २१जूनच. कवी आणि भाषांतरकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत.
कविता संग्रह – अक्षरवेल, गंधर्व, देवापुढचा दिवा, बकूंशीचा पक्षी
कथासंग्रह – काळोखाची पिसे, चांदणं, चंद्र सावली कोरतो
अनुवादीत – जयकेतू (रूपांतर )राजा इदीपास, ज्याचे होते प्राक्तन शापित, गोची इ.
अनुवादीत कविता – ब्लादिमिर मायकोव्ह्स्कींच्या कवितांचा सुंदर अनुवाद – पॅंट घातलेला ढग बालकविता – चांदोबा चांदोबा, झोपाळयाची बाग
सदानंद रेगे यांची २८ पुस्तके प्रकाशित आहेत. त्यापैकी ३ पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचा राज्य पुरस्कार प्राप्त झाला आहे.
आजच्या अंकात वाचा सदानंद रेगे यांची कविता आणि राधिका भांडारकर यांनी त्या कवितेचं केलेलं रसग्रहण
संपादक मंडळ, ई – अभिव्यक्ती (मराठी)
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈