श्री मेघ:श्याम सोनावणे

🌸 जीवनरंग 🌸

☆  बाप्पा नेटवर्क : फ्रिक्वेंसी सॉलिड आहे… श्री मयुरेश उमाकांत डंके ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

“अरे, एवढी भली मोठी सजावट विकत घेऊन आलास तू? धन्य आहे बाबा. किती रुपये लागले?” अमितचे बाबा त्याला म्हणाले.

“सात हजार. ” 

“अरे, पण सात हजार रुपये खर्च करण्याची आवश्यकता होती का? आपल्याला चांगली सजावट घरी सुद्धा करता आली असती. ” 

“बाबा, आता ते सगळं विकत मिळतं आणि दिसायला पण ऑस्सम दिसतं. किती वर्षं आपण तीच ती फुलं पानं अन् दिव्यांच्या माळा लावणार? आणि दुसरं म्हणजे मला आता तेवढा वेळही मिळत नाही. ” अमित जरा दुखावलाच होता. जयंतरावांचा एकुलता एक मुलगा. मागच्याच वर्षी इंजिनियर झाला आणि लगेच नोकरी सुद्धा मिळाली. पॅकेज चांगलं होतं.

“तू कमावता झाला आहेस. तुझे पैसे खर्च कुठं आणि कसे करायचे हे तूच ठरवलं पाहिजेस. पण हजारो रुपये खर्च केले म्हणजेच आपण उत्सव चांगला केला असं नसतं. ” जयंतराव सांगत होते.

“पण आता ते कागद आणा, कापत बसा, चिकटवा, रात्रभर वाळत ठेवा, हे सगळं करायला माझ्याकडं वेळच नाही. ” अमित म्हणाला.

“वेळ नाही असं कसं म्हणतोस तू? रोज जवळपास तीन चार तास तरी फोन मध्येच डोकं घालून बसलेला असतोस ना. ” बाबांनी त्यांचं निरीक्षण सांगितलं.

“ते वेगळं आहे हो. तुम्हाला नाही समजणार. ” अमित आता चांगलाच चिडला. एवढं हौसेनं डेकोरेशन आणलं, पण बाबांना त्याचं काही कौतुकच नाही, असं त्याला वाटत होतं.

“तुला दर शनिवारी-रविवारी सुट्टी असते, तेव्हाही करता आलं असतं. पण, ‘वेळ नव्हता’ म्हणण्यापेक्षा सुद्धा ‘इच्छाच नव्हती’ हेच कारण आहे. ” बाबांनी नस बरोबर पकडली.

“तुम्ही काहीही म्हणा. पण आपण स्वस्तात होईल म्हणून घरीच काहीतरी करायला जायचं आणि ते इतरांच्या तुलनेत इतकं गावठी दिसतं की, फेसबुक इंस्टा वर त्याचे फोटो सुद्धा टाकायला लाज वाटते. लोकं लाईक सुद्धा करत नाहीत. म्हणून मग आणलं सरळ विकत. ” अमित तणतणत म्हणाला.

“अरे, पण गणपतीचा आणि सोशल मीडियाचा संबंधच काय? आपण जगाला दाखवण्यासाठी गणपती बसवतो का? लोकांनी लाइक्स दिले नाहीत म्हणजे आपला गणपती चांगला नाही, असा त्याचा अर्थ होतो का?” जयंतराव त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते.

“बाबा, आता हट्ट सोडा तुम्ही. आम्हाला जरा आमच्या पद्धतीनं करु द्या ना. ” अमित म्हणाला.

जयंतराव शांतपणे उठले आणि त्यांच्या खोलीत निघून गेले. खोलीतल्या त्यांच्या गादीवर तक्क्याला टेकून बसले. तीस पस्तीस वर्षांपूर्वीचा काळ त्यांच्या डोळ्यांसमोरून झरझर झरझर सरकायला लागला.

कचकड्यांचे चेंडू तयार करुन केलेली सजावट, पुठ्ठ्याला घोटीव कागद चिकटवून त्याच्या नक्षीदार महिरपी तयार करुन केलेली सजावट, वर्षभर लक्षात ठेवून सोडावॉटरच्या बाटल्यांची झाकणं दुकानांमधून गोळा करून त्यांची केलेली सजावट हे सगळं त्यांना आठवायला लागलं..

गणपती म्हणजे सगळ्यांचा आवडता सण. विशेषतः मुलांसाठी तर पर्वणीच. सजावटीच्या नानाविध कल्पना डोक्यात घोळत असायच्या. पण त्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी विकत आणण्याची पद्धत तेव्हां नव्हती. इकडून तिकडून गोष्टी मिळवाव्या लागत. मिळतील तशा गोळा करुन साठवून ठेवाव्या लागत. त्यामुळे, स्ट्रॉ, झाकणं, टोपणं, छोट्या डब्या, पिसं, बटणं, नट बोल्टस्, लोह चुंबकं, रंगीत कागद, लग्नपत्रिका, त्यांची पाकीटं, पुठ्ठे, दोरे, चित्रं, तारांचे तुकडे, राख्या, झाडांच्या बिया, वाळलेल्या शेंगा असल्या अनेक गोष्टी मुलं साठवून ठेवत असत. त्याचा उपयोग गणपतीच्या सजावटीसाठी बरोब्बर होई.

क्रेप कागदाची फुलं, पानं, मोत्यांच्या माळा, लोकरीची तोरणं, कापसाच्या बाहुल्या असं शिकण्याचे वर्गही चालत असत. कितीतरी मुलं मुली ते शिकण्यासाठी जात. उन्हाळ्याच्या सुट्टीत छंद वर्गात शिकायचं आणि त्याचा प्रयोग गणपतीच्या सजावटीत करायचा, हा तर कित्येकांच्या घरचा शिरस्ता होता. श्रावण महिन्यात दर सोमवारी शाळा लवकर सुटे. नागपंचमी, राखी पौर्णिमा, स्वातंत्र्यदिन यांच्या सुट्ट्या मिळत आणि शिवाय हक्काचा रविवार असे.

हरतालिकेच्या दिवशी सुद्धा शाळेला सुट्टी असे. मुली शाळेत पूजेसाठी जात असत. त्या दिवशी गणपतीच्या सजावटीचा शेवटचा दिवस. त्याची धांदल उडालेली असे. घरातला गणपती सोवळ्यात असायचा आणि घर लहान. त्यामुळे, फार मोठी सजावट करण्याचा प्रश्नच नसायचा. मूर्तीही ठरलेली असायची आणि छोटीच असायची. तेवढ्याशा जागेत त्यातल्या त्यात छान दिसावं यासाठी मुलांचा जो काही आटापिटा सुरु असायचा, त्यात एक विलक्षण गंमत होती. एखाद्या शिंप्याच्या दुकानातून कापडाचे तुकडे मागून आणणे किंवा घरोघरीं जाऊन लग्नपत्रिका मागून आणणे ह्यात कुणालाच काही गैर वाटत नसे.

एकदा कमळात बसलेला गणपती अशी सजावटीची कल्पना डोक्यात आली. पण कमळ खरोखर दिसतं कसं, हे प्रत्यक्ष पाहायला संधीच नव्हती. त्यामुळं, प्रत्यक्षात कमळ करताच आलं नाही. गूगल किंवा युट्यूब तेव्हां नव्हतं. त्यामुळं, करण्याची इच्छा असूनही मार्गच मिळाला नाही. पण कुणीतरी डोक्यात पिल्लू सोडलं की, कागदावर चित्र काढून त्याला खळ लावायची अन् वरुन रंगीत रांगोळी पसरवली की, रांगोळी त्या चित्रात चिकटून बसते आणि छान चित्र तयार होतं. मग घरीच चित्रं काढून त्यांना खळ लावली आणि रांगोळीचे रंग चिकटवून सजावट केली. पण एक मात्र नक्की होतं की, अशा अनुभवांमधून पुष्कळ शिकायला मिळायचं, व्यवहारज्ञान वाढायचं, नियोजन कौशल्य तयार व्हायचं. शाळा कॉलेजेसची वेळापत्रकं सांभाळून हा उद्योग करताना अभ्यासाकडे जराही दुर्लक्ष झालेलं घरी खपायचं नाही. त्यामुळं, वाहवत जाऊन चालायचं नाही. पण त्यामुळं, आवड आणि करिअर यांच्यातला तोल कसा सांभाळायचा, हे वेगळं शिकण्याची गरजच भासली नाही.

जयंतराव विचार करत होते.. इतकं छान, रम्य, क्रिएटिव्ह वातावरण काही वर्षांपूर्वी आपल्या समाजात होतं. मुलं प्रयोग करत होती, चुकत होती, पण त्यातून बोध घेत घेत शिकत होती. त्यांच्यातली शोधकवृत्ती, सृजनशक्ती चांगली विकसित होत होती. हे सगळं बदललं कसं? चांगल्या सकारात्मक गोष्टी गेल्या कुठं? आपल्या पिढीनं त्या संपू कशा दिल्या? जयंतरावांचं विचारचक्र काही केल्या संपेना.

अगदीं दहा पंधरा वर्षांपूर्वी मुलं आरत्या म्हणायची, श्लोक म्हणायची, वेचे म्हणायची. आता कित्येक ठिकाणीं म्युझिक सिस्टिमवरच आरत्या होतात अन् लोक नुसतेच टाळ्या वाजवतात. घरोघरी संध्याकाळी परवचा अन् शुभंकरोती नियमितपणे व्हायचं. वयस्कर मंडळींसोबत नातवंडं कीर्तन प्रवचनांना जायची. कानांवर वेगवेगळ्या कथा, अभंग, संतवचनं पडायची. मराठीतल्या म्हणी, वाक्प्रचार नव्यानं शिकण्याची गरज पडायची नाही. कानांवर उत्तम प्रासादिक भाषा पडायची. आठवड्यातून दोन तीन वेळा तरी भजनाला जाणं व्हायचं. हे सगळं अगदी लहानपणापासूनच अंगवळणी पडत गेल्यामुळे मुलांचं सांस्कृतिक आयुष्य आपसूकच घडायचं. आयुष्याची पहिली सोळा सतरा वर्षं आजूबाजूच्या थोरामोठ्यांच्या नजरेसमोरच जायची. जरासुद्धा इकडं तिकडं करण्याची बिशाद नव्हती अन् तसं वागण्याची गरजही पडली नाही. हे सगळं गेलं कुठं? 

आता घरोघरी मखरं विकत आणली जायला लागली, मोदक विकत आणले जायला लागले, पूजा सांगायला ‘संपूर्ण चातुर्मास’ ची जागा युट्यूब वरच्या व्हिडिओज् नी घेतली. आरती संग्रह गेले आणि म्युझिक सिस्टीम आल्या. टाळ, चिपळ्यासुध्दा जाण्याच्या मार्गावर आहेत आणि त्यांची जागा घुंगरांच्या कड्या घेतायत. रांगोळ्यांच्या रेडिमेड टाईल्स आल्यात. केळीची शुद्ध नैसर्गिक पानं मिळत असताना सुद्धा कापडी पानं लोक विकत घ्यायला लागले. गोविंद विड्याच्या जागी मगई पान सुरु झालं. कण्हेर, जास्वंद, गोकर्ण जवळपास दुर्मिळ झाले अन् त्याच्या जागी जरबेरा सारखी फुलं देवाला वाहण्याचा प्रघात सुरु झाला. म्हणजे सगळंच तर बदलत चाललंय. मग पारंपारिक गणेशोत्सव म्हणून आपण नेमकं काय करतो आहोत? घरच्या गणपतीचासुध्दा इव्हेंट करतोय का आपण?

जयंतरावांच्या डोक्यातले भुंगे आता इतका गुंजारव करायला लागले होते की, शेवटी त्यांना असह्य झालं. आपल्या पिढीनं म्हणावं तितकं लक्ष न घातल्यामुळेच हातातून गोष्टी निसटत चालल्यात याची टोचणी त्यांना लागली. सगळा परिवार एकत्र येणं, सगळ्यांनी एकत्र स्वयंपाक करणं, सकाळ संध्याकाळ खणखणीत आवाजात आरत्या होणं, एकत्र पंगती बसणं, गप्पांचे धबधबे यातलं काहीच आपण गेल्या कित्येक वर्षांत अनुभवलं नाही, हे आठवताना त्यांचे डोळे भरुन आले. गालांवर अश्रू ओघळायला लागले, ते टिपण्याचंही भान त्यांना राहिलं नाही.

एक तास असाच उलटून गेला. बाहेर अंधार पडायला सुरुवात झाल्याची त्यांना जाणीव झाली. त्यांनी खोलीतला दिवा लावला. समोरच्या भिंतीवर गणपतीचा सुंदर फोटो होता. त्यांनी फोटोला हात जोडले. आणि “आपण सगळं आपल्याला जसं जमेल तसं यथाशक्ती, यथाबुद्धी करण्यातच खरी गंमत असते. ती रेडिमेड आऊटसोर्सिंग च्या इव्हेंट मध्ये मिळणार नाही, हे आमच्या अमितला समजेल तो सुदिन.. त्याला तूच जाणीव करुन दे रे बाबा” अशी मनोमन प्रार्थना करत ते उठले आणि बाहेर बैठकीच्या खोलीत आले. पाहतात तर खोली रिकामीच. त्यांनी बाकीच्या खोल्या, बाल्कनी सगळीकडे पाहिलं, आणलेली रेडिमेड सजावट कुठंच दिसेना.. !

तोवर दारावरची बेल वाजली. त्यांनी दार उघडलं. दारात कागदांची भेंडोळी घेऊन अमित उभा.. “बाबा, अहो सेफ्टी डोअर उघडा ना.. माझे दोन्हीं हात गुंतलेत. ” अमित म्हणाला.

जयंतरावांनी दार उघडलं. अमित आत आला अन् तसाच फतकल मारुन बसला. त्यानं पिशवीतून एकेक वस्तू बाहेर काढायला सुरुवात केली. ” ह्या ग्लू स्टीक्स, क्राफ्टच्या कात्र्या, ह्या सोनेरी घंट्या.. चायनीज नाहीत, स्वदेशी आहेत. हे हॅण्डमेड कागद. इकोफ्रेंडली आहेत. आणि ह्या मोत्यांच्या लडी. मस्तपैकी घरीच ओवून त्याच्या झालरी करता येतील. ” अमित उत्साहानं एकेक वस्तू दाखवत होता, जयंतराव बघतच राहिले. त्यांना काही सुचेना.

“अरे, हे सगळं आणलंस खरं. पण मगाशी आणलेला तो सेट कुठंय?” 

“मी तो परत करुन आलो. ” 

“आणि त्यानं घेतलं ते सगळं परत?” त्यांनी आश्चर्यानं विचारलं.

“हो, पण पैसे परत मिळालेले नाहीत. जेव्हा तो सेट दुसरं कुणी विकत घेईल तेव्हा पैसे मिळतील. मी तसं बोललोय त्याच्याशी. ” अमितनं सांगितलं.

“पण, आता ही सजावट कोण करेल? तुला तर वेळ नाही ना?”

“अजून आठ दिवस आहेत. मी रोज ऑफिस मधून घरी येऊन थोडं थोडं करत पूर्ण करेन. अगदीच घाई झाली तर दोन दिवस रजा टाकता येईल. पण डेकोरेशन घरचंच करु. सगळंच विकतचं आणून घरच्या गणपतीचा इव्हेंट नको व्हायला.. ” अमित बोलता बोलता मोबाईल वरुन कुठल्या कुठल्या घरगुती सजावटींचे फोटो दाखवत होता. “आपण असं करुया, असा रंग देऊया, असा पडदा लावूया” वगैरे वगैरे..

जयंतराव मात्र विचार करत होते, “जगात खरोखरच आपल्या बुद्धीच्या पलीकडचं सुद्धा एक कम्युनिकेशन नेटवर्क आहे. बाप्पा नेटवर्क.. फ्रिक्वेंसी सॉलिड आहे!”

लेखक :  श्री मयुरेश उमाकांत डंके

मानस तज्ज्ञ, संचालक – प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे. मो 8905199711

प्रस्तुती : श्री मेघ:श्याम सोनावणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments