सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-१ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

(वडीलधारी माणसं आपल्याला पोरकं करून पुढच्या प्रवासाला निघून जातात आणि दुरावतात. त्यांच्यापेक्षा त्यांच्या आठवणीच जास्त जवळच्या वाटतात कारण त्या कायमच आपल्याजवळ राहतात. जुन्या पिढीची आठवणींची शिदोरी नव्या पिढीच्या स्वाधीन करावी म्हणून हा लेखन प्रपंच. ह्या शिदोरीत त्यावेळच्या जुन्या काळच्या पुण्याच्या आठवणींचीही सांगड घातली आहे.)

– माय माझी जोगेश्वरी –

बुधवार पेठेतल्या ग्रामदैवत जोगेश्वरी मातेच्या सान्निध्यात माझ बालपण सरल. पुण्यनगरीत बुधवारपेठेचं महत्व अलौकिक आहे. श्रीमंत दगडु शेट गणपतीच वास्तव्य तिथे आहे तर बालाजी, निवडुंग्या विठोबा, लालमहाल, कसबा गणपती हा मानाचा पहिला गणपती कसब्यात विराजमान झाला आहे. शुभकार्याच्या शुभारंभाला इथूनच सुरवात होते. जवळच दिमाखात उभा असलेला शनिवारवाडा इतिहासाच्या वैभवाची साक्ष देतो. आणि ह्या सगळ्या भाविक, ऐतिहासिक वातावरणांत ‘सकाळ’ (पेपर)ऑफीसने आपला संसार थाटला आहे. ह्या धार्मिक एतिहासिक आणि सामाजिक स्थळांनी युक्त अशा ह्या बुधवारांत माझ माहेर होत. तांबडया जोगेश्वरीचा इतिहास सांगतांना वडिलधारे सांगतात.. ह्या भागांत पूर्वी जंगल होत, आणि त्यांत झुळझूळ वहाणारा झरा होता. त्या झऱ्यातून आई जोगेश्वरी प्रगट झाली. भाविकांनी तिथे छोटसं देऊळ बांधले. आईची प्रतिष्ठापना करण्यात आली. पुढे विस्तार वाढला आणि छोट्या देवळाचं मोठ्या मंदिरात रूपांतर झाल. या घटनेच्या साक्षीदार म्हणून दोन दिपमाळी अजूनही दिमाखात तिथे उभ्या आहेत( एक मोडकळीस आल्यामुळे पडली असावी ) त्रिपुरी पौर्णिमेला शतज्योतींनी दिपमाळी झळाळून जायच्या, चंद्राचं टिपूर चांदणं आणि सोनेरी प्रकाशातल्या त्या दिपज्योती मनाचा कानाकोपरा उजळून टाकायच्या. मनातली काजळकाजोळी लगेचच मिटून जायची. काळ सरलाय. पुला खालून बरचसं पाणी गेलय. झाडाझुडपात निर्मळ, नितळ झऱ्या शेजारी वसलेलं पुणं आता निसर्ग सौंदर्यातून लोप पाऊन सिमेंटच्या जंगलात अडकलय. आमच्याही आयुष्याची संध्याकाळ सुरू झाली आहे, त्या भागात गेलं की जुन्या आठवणी जाग्या होतात. बालपणापासून ते तरुणपणापर्यंतचे सुखाचे ते दिवस, ती जीवाला जीव देणारी, अतोनात प्रेम करणारी आपली माणसं आठवतात. मन मागे मागे भूतकाळात विसावत. आणि चलत चित्रपटासारखे सगळे प्रसंग, ते माहेरच्या अंगणातले क्षण आठवतात. आठवणींचा फेर धरता धरता भोंडल्याच्या गाण्यात शिरलेलं मन गुणगुणायलालागतं “अस्स माहेर सुरेख बाई. ” आणि मग आठवणींचे क्षण वेचतां वेचता मन उधाण उधाण होतं.

पंडू पुत्र विजयी झाले. माता कुंती राजमाता झाली तिच्यासाठी पाचपुत्रांनी भव्य प्रासाद बांधला. तो बांधताना राजमातेने एकच अट घातली होती, ” बाळांनो माझ्यासाठी प्रासाद बांधताना तो इतका उंच बांधा इतका उंच बांधा की प्रासादाच्या सज्जातून मला माझं माहेर दिसलं पाहिजे. ” राजमाता कुंतीच्या माहेरच्या ओढीची ही कथा आहे तर मग आपण तर सामान्य स्रिया आहोत. अर्थात प्रत्येकीला माहेरची ओढ असतेच. मनाचं पांखरू केव्हा उडतं आणि माहेरच्या अंगणात केव्हा विसावत. हे तिच तिलाच कळत नाही. श्रीजोगेश्वरीच्या अगदी समोरच दोन दिपमाळ्यांच्या मधोमध आमचा वाडा होता. मंदिर आणि घर म्हणजे अंगण ओसरीच होती. आपली पिल्लं कुठेही विखुरली असली तरी त्यांच्याकडे कासविण दुरूनही लक्ष ठेवते. तशी ही विश्वदेवता साऱ्या जगावर आपल्या मायेचे पांघरूण घालत असते. आणि कृपादृष्टी ठेवत असते. असं हे आठवणींचं गाठोड मला माय माऊली जोगेश्वरीच्या पायाशी सोडावंसं वाटलं आणि तुमच्यापुढे उलगडावस वाटलं.

श्री जोगेश्वरी माय माऊली अशी आहे की संकटात सांवरतेच पण सुखातील गहिंवर आणते. अशा ह्या श्रीजोगेश्वरी मातेला माझा दंडवत.

– क्रमशः भाग पहिला 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments