श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ह्याला आयुष्य म्हणावे काय ? – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

 पद, पैसा, प्रतिष्ठा, प्रसिध्दी

 लोळण घेतात पायात

 बिल गेटची पत्नी तरीही

 का घटस्फोट घेते ह्या वयात ?

*

शिक्षणाने माणूस समृद्ध होतो

आम्ही आहोत अजूनही भ्रमात

उच्चविद्याविभूषकांचे मायबाप

मग का असतात वृध्दाश्रमात ?

*

 हा डिप्रेशनचा शिकार

 तो आत्महत्या करतो

 ज्याला समजावं सेलिब्रिटी 

 तो एकाकीपणात मरतो

*

ज्यांनी कमावलं नाव

त्याला आनंद का मिळत नाही ?

काय चाटायचं ह्या मोठेपणाला

नातं आपुलकीचं जुळत नाही

*

 जळजळीत वास्तव सांगतो

 तुमचा विश्वास ह्यावर बसणार नाही

 गरीब, अडाणी, प्रामाणिक मजुरांचे

 मायबाप वृध्दाश्रमात दिसणार नाही

*

असं नाही त्यांचे घरात

नाहीत वादविवाद

पण घटस्फोट अन् वृध्दाश्रम

बोटावर मोजण्या एवढे अपवाद

*

 आजारी मायबापांचा इलाज 

 करतात किडूक मिडूक विकून 

 पण जिव्हाळ्याची अजूनही त्यांनी

 नाळ ठेवली आहे टिकवून 

*

व्यसनी, रागीट, नवरा

त्याला गरीबीची जोड

तरीही त्याची पत्नी बिच्चारी

करतेच ना तडजोड ?

*

 दु:ख हलकं करतात

 एकमेकांना भेटून

 एका शिळ्या भाकरीचा तुकडा

 खातात सारेजण वाटून

*

जेवढी लावतात माया

तेवढंच बोलतात फाडफाड

कितीदा तरी भांडतात

पण कुठे येतो ईगो आड ?

*

 उशाशी दगड घेऊन

 भर उन्हातही झोपी जातो

 काळ्या मातीत घाम गाळणारा

 बळीराजा कुठं झोपेची गोळी खातो ?

*

ना तोल ढळतो ना संयम

दु:खातही सावरण्याची आस

कारण अजूनही ह्या माणसांचा

आहे माणुसकीवर विश्वास

*

 पण हल्ली इन्स्टंट रिझल्टचे

 आले हे दळभद्री दिवस

 देव सुध्दा लगेच बदलतात

 जर पावला नाही नवस

*

एकत्र कुटूंब हल्ली

सांगा कुणाला हवं ?

कामा शिवाय वाटतं का

आपण कुणाच्या घरी जावं ?

*

 एकदा तरी बघा जरा

 आपल्या आयुष्याचा रोड मॅप

 कुणाचं कुणाशी पटत नाही

 काय तर म्हणे जनरेशन गॅप

*

सांगा बरं कुणावर ह्या

विकृत विचारांचा पगडा नाही

घर, बंगला, फ्लॅट असु द्या

दरवाजा कुणाचाही उघडा नाही

*

 बहुत अच्छे, बहुत खूब !

 क्या बात है ? बहुत बढीया !

 एवढ्या ओसंडून वाहतात प्रतिक्रिया 

 जागृत चोवीस तास सोशल मीडिया

*

आभासी दुनियेची चाले

कोरडी कोरडी ख्याली खुशाली

मोबाईलवर साऱ्या शुभेच्छा

मोबाईलवरच श्रध्दांजली

*

 काय बरोबर ? काय चूक ?

 मत मांडण्याचीही सत्ता नाही

 तो बंद घरात मरून पडला

 वास सुटला तरी शेजाऱ्याला पत्ता नाही

*

मुलं पाठवले परदेशात

आई संगे म्हातारा बाप कण्हतो

अंत्यविधी उरकून घ्या

पैसे पाठवतो असं पोटचा गोळा म्हणतो

*

 लेकराला पाॅकेटमनी, बाईक 

 अन् भलेही दिली जरी कार

 किती छान झालं असतं

 जर दिले असते संस्कार ?

*

होस्टेल, बोर्डींगात बालपणीच पाठवलं 

तो तुम्हाला का वागवणार ?

जमीन असो की जीवन

येथे जे पेरलं तेच उगवणार

*

 जीवशास्त्र शिकवलं

 जीवनशास्त्र शिकवा

 चुलीत गेली चित्रकला

 सांगा चारित्र्याला टिकवा

*

त्रिकोण, चौकोन, षट्कोन

ह्याला सांगा विचारेल कोण ?

ज्याचे जवळ नसेल

आयुष्याचा दृष्टीकोन

*

 विपरीत परिस्थितीतही 

 जपणूक केली पाहीजे तत्वाची

 व्याकरणापेक्षाही अंत:करणाची

 भाषा असते महत्वाची

*

चुकू द्या चुकलं तर

अंकगणित अन् बीजगणित 

माणसांची बेरीज करा

गुण नाहीत पण गुणवत्ता अगणित

*

 प्राणपणाने जतन करावे

 नाते शहर, खेडे, गावाचे

 मेल्यावरती खांदा द्यायला

 असावे चारचौघे जिवाभावाचे

*

मेल्यावर दोन अश्रू 

हीच आयुष्याची कमाई

ज्याने हे कमावलं नसेल

तो आयुष्य जगलाच नाही

*

 मिळून मिसळून वागावं

 आनंदानं छान जगावं

 तुम्ही सगळी मोठ्ठी माणसं

 म्या पामरानं काय सांगाव……

कवी : अज्ञात

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments