सुश्री नीलांबरी शिर्के
कवितेचा उत्सव
☆ आयुष्य फाटले तेव्हा… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
आयुष्य फाटले तेव्हा
शब्दांनी शिवत गेले
जोडून शब्द मी तेव्हा
कविता करीत गेले
मुडपून दुखऱ्या भागा
हळुवार घातली टिप
प्रत्येक टाक्यामागे
मुरे अश्रू आपोआप
ते जिथे फाटले ज्यादा
टाक्यांनी शिवले नाही
रफूच्या छान धाग्यांची
मी केली हो चतुराई
ठिगळाच्या तुकड्यांनी
मी कधी सांधले नाही
काढून त्वचेची साल
मी दु:ख झाकले बाई
आयुष्य वाटते आता
सुरेख तलमसे वस्त्र
आतून टोचती टाके
की तडजोडीचे अस्त्र
टोचोत कितीही टाके
जखमी आतूनी त्वचा
त्या जखमांना परंतू
कधी फुटणार नाही वाचा
चेहऱ्यावरचे सदैव हासू
फसवी जगासह मजला
भुलून जाऊन आपसूक
जपते या महावस्त्राला
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈