सौ. शशी नाडकर्णी-नाईक
वाचताना वेचलेले
☆ “येईलच कसा कंटाळा…” – कवी: श्री. अनिल देशपांडे ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक ☆
काहीतरीच तुमचं
तुमचा प्रश्नच आहे वेंधळा
आपल्याच घरात आपल्याला
येईल कसा कंटाळा.
माझ्या घरातली धूळसुध्दा
माझ्यावरती प्रेम करते
किती झटकली तरीही
पुन्हा पुन्हा येऊन बसते.
ताट वाटी भांडं
ही सारीच माझी भावंडं
जेवताना रोज असते सोबत
पिठलं असो की श्रीखंड
फ्रीज, मिक्सर, गिझर, टीव्ही
साऱ्या नव्हेत नुसत्याच वस्तू
रिमोट हातात घेतला की
लगेच म्हणतात ‘ तथास्तु ‘
कपाट नुसतं उघडलं की
उघडतात मनाचेही कप्पे
वरून खाली दिसत जातात
आयुष्याचे सर्व टप्पे
पलंगावर आडवं पडून
खोचून घेतली मच्छरदाणी
तरी लपून बसलेला एक डास
कानामध्ये गुणगुणतो गाणी
खिडकी, गॅलरी, पॅसेज, बाल्कनी
घर असतंच नंदनवन
कितव्याही मजल्यावर घर असो
घरातच तयार होतं अंगण
पती, मुलं, नातेवाईक, मित्रमैत्रिणी
घरात नेहमीच असते जाग
टेबलावरची एक कुंडी
फुलवते आयुष्याची बाग
घरात नुसतं बसून रहा
वाढतं जाईल जिव्हाळा
आपल्याच घरात आपल्याला
येईलच कसा कंटाळा?
☆
कवी :श्री. अनिल देशपांडे
प्रस्तुती :सौ. शशी नाडकर्णी-नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈