श्री संभाजी बबन गायके
जीवनरंग
☆ ‘स्मृती’ होऊन जगताना ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
(ही एक सत्यकथा — सुश्री स्मृति अंशुमन सिंग यांच्या मुलाखतीवर आधारित)
मी आणि तो…अंशुमन..आम्ही दोघे एकाच इंजिनिअरिंग कॉलेजात होतो. म्हणजे मी चार वर्षे होते आणि तो अगदी काहीच दिवस! त्याला M.B.B.S. साठी प्रवेश मिळाला आणि तो पुण्याला निघून गेला. त्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधील त्या काहीच दिवसांत एक मात्र झालं होतं…आमची दृष्टभेट..आणि प्रथमदर्शनी…जीव वेडावला जाणं!
इथून मग एका दूरस्थ प्रेमकथेचा प्रारंभ झाला…एखाद्या हिंदी चित्रपटात शोभेल अशा! मी दूर इकडे पंजाबात आणि तो पुण्यात. त्याचे ध्येय पक्कं ठरलं होतं..वडिलांसारखी सैन्यात सेवा. हातात रायफल ऐवजी स्टेथोस्कोप एवढाच काय तो फरक असणार. या सर्व घडामोडींत थोडीथोडकी नव्हे चांगली सात-आठ कशी निघून गेली समजलंच नाही. माझा वाढदिवस होता त्यादिवशी. अंशुमन इतक्या दूरवरून काही येऊ शकणार नव्हता. आणि हे समजून घेणं भागच होतं..त्यात माझ्या घरी त्याच्याबद्दल मी तोपर्यंत काहीही कळू दिलं नव्हतं…म्हटलं त्याचं सगळं स्थिरस्थावर होऊ देत आणि माझंही. पण वाढदिवसाच्या रात्री बारा वाजता त्याने फोन केला….खिडकी उघडून खाली बघ म्हणाला….भला मोठा पुषगुच्छ घेऊन स्वारी उभी होती! घरचे जागे झाले असते तर मोठा गहजब झाला असता! त्याला तिथून मोठ्या मिनतवारीने घालवला एकदाचा. तर साहेब सकाळी घराच्या दारात उभे! माझ्या बाबांना म्हणतात कसे…काही नाही..इथून चाललो होतो..स्मृती माझी इंजिनिअरिंग कॉलेजमेट आहे..म्हटलं जाता जाता भेटून जावं! काय आहे..पुण्यातून आर्मड फोर्सेस मेडिकल कॉलेज मधून AFMC मधून सहसा सवड होत नाही या बाजूला यायला!
त्याचा पदवी प्रदान समारंभ झाला…passing out parade! एका सामान्य पण हुशार तरुणाचे एका जबाबदार,रुबाबदार आर्मी मेडिकल ऑफिसर मध्ये रूपांतर झाले होते!
घरी सांगितलं…अक्षता पडल्या! अग्निसाक्षी ठेवून फेऱ्या घेऊन उणेपुरे दोनच महिने झाले असतील नसतील…सैन्याला अंशुमनची सियाचीन येथील एकोणीस हजार फूट उंचीवर असलेल्या सैन्यतळावर गरज भासली. निरोप द्यावाच लागला. पण तिथून बोलता मात्र येत होतं तसं नियमित. अठरा जुलै २०२३ च्या रात्री आम्ही असेच दीर्घ बोललो…आम्ही नवं घर बांधणार होतो… बाळ तर पाहिजेच होतं आम्हांला..आमच्या आयुष्याला एक नवं परिमाण मिळवून देणारं! पहाटे अंशुमन साहेबांनी फोन बंद केला गुड नाईट म्हणून..खरं तर त्यावेळी गुड मॉर्निंग झालेली होती!
सकाळी सकाळी घरातला फोन खणखणला…सियाचीन बेस वरून call होता. तिथल्या दारूगोळा असलेल्या ठिकाणी अपघाताने मोठी आग लागली होती. फायबर ग्लास पासून बनवलेल्या निवा-यात झोपलेल्या सहा सैनिकांची डॉक्टर अंशुमन सिंग साहेबांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून सुखरूप सुटका केली! पण…साहेब जखमी झालेत! औषध भांडार असलेल्या कक्षाला आगीने वेढले होते. तिथल्या परिस्थितीमध्ये ती खरी जीवनावश्यक औषधे होती..कारण एकोणीस हजार फूट उंची…काहीही पोहोचवायचे म्हणजे मोठे आव्हानच असते. म्हणून साहेब त्या कक्षात घुसले…औषधे,वैद्यकीय उपकरणे बाहेर काढण्यासाठी. पण फायबर ग्लास आधीच ज्वालाग्राही त्यात आग लागून काही वेळ झालेला होता. ज्वाळांनी अंशुमन सिंग साहेबांना आपल्या कवेत घ्यायला उशीर लावला नाही!
सासरे तिथे वारंवार संपर्क साधून होते…शेवटी नको ती खबर मिळाली… कॅप्टन डॉक्टर अंशुमन सिंग यांनी असामान्य धैर्य दाखवताना वीरगती प्राप्त केली!
वर्ष होईल माझं स्वप्न अग्नीत जळून राख झालं त्या घटनेला… पण धग अजूनही जाणवतेय आणि ती काही कमी होईल,असं वाटत नाही कधीच!
अंशुमन साहेबांना मरणोत्तर दिले जाणार असलेले शौर्य पदक काल राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते स्वीकारायला गेले होते…सासूबाई होत्या सोबत. त्यांचे आणि माझे दुःख सारखेच! माझं कुंकू आणि त्यांचा कुलदीपक एकाच वेळी जगाच्या क्षितिजाच्या पल्याड जाऊन दिसेनासे झाले! आता फक्त ‘ स्मृती ‘ शिल्लक आहे!
साहेबांच्या शौर्याचे वर्णन केले जात होते..त्यामुळे तो न पाहिलेला पण मनाने कित्येकवेळा अनुभवलेला प्रसंग मी पुन्हा जगले! राष्ट्रपती महोदयांनी खांद्यावर हलकेच थोपटले…त्या स्पर्शात पती आणि पुत्र विरहाचे दुःख अनुभवलेला दिलासा होता! आज त्यांनी माझ्यासारख्या दुसऱ्याही वीरमाता,विरपत्नी, पित्यांना दिलासा दिला!वेदनांना अंत नसतो! देशाच्या रक्षणार्थ प्राण दिलेल्या लोकांच्या वेदना तर अमर असतात…त्यांच्या पराक्रमासारख्या!
देश अंशुमन साहेबांना खरं तर विसरूनही गेला होता…माझा चेहरा देशवासीयांना त्यांच्या स्मृती जागवणारा ठरला बहुदा !
काही नाही…एकच मागणे आहे…हा देश सुरक्षित आहे कारण अंशुमन सिंग साहेबांसारखे वीर इथे जन्मतात! माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या मागे भारतीय सेना भक्कम उभी आहेच…तुमच्याही शुभेच्छा असू द्यात ! जय हिंद !
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈