श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग २१ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- महाबळेश्वरचा अखंड धुवांधार पाऊस हा माझ्या नित्यनेमात मुख्य अडसर ठरणाराय असंच वाटत रहायचं. कारण छत्री,रेनकोट, गमबूट हे सगळं दिमतीला असूनही हाकेच्या अंतरावरचं स्टॅंड गाठेपर्यंतही मी चिंब भिजून जायचो. संपूर्ण प्रवासात ते ओले कपडे अंगावरच थोडे सुकत आले तरी नृ. वाडीला पोचल्यानंतरही
त्यातला दमटपणा रेंगाळतच असायचा.
या सगळ्या कसोट्या पार करत पावसाळा कूर्मगतीने संपत चालला.आता सगळं सुरळीत सुरू राहील असं वाटत असतानाच प्रत्येक पौर्णिमेच्या वेळी नवीनच कसोटीचे क्षण अचानक माझ्यासमोर ‘आ ‘ पासून उभे रहायचे!)
महाबळेश्वरला गेल्यानंतरची जुलै महिन्यातली पहिली पौर्णिमा तशी निर्विघ्नपणे पार पडली. कोल्हापूरलाही घरी दोन-चार दिवस कां होईना रहाता आलं.परतीच्या प्रवासासाठी घराबाहेर पाऊल टाकलं न् ब्रॅंचमधल्या महत्त्वाच्या कामांच्या विचारांनी मनाचा ताबा केव्हा घेतला समजलंच नाही.
त्यानंतरचा एक महिना नेहमीसारखा धावपळीच गेला.
या महिन्याभरात दोन्हीकडच्या खर्चाची तोंडमिळवणी करताना पगाराबरोबरच तोवरची जुजबी शिल्लकही संपून गेली होती. आॅगस्टमधल्या पौर्णिमेला दुपारच्या ३ वाजताच्या सांगलीच्या बसचे वेध आदल्या दिवसापासूनच लागले न् त्याचसोबत आर्थिक तरतूदीचं व्यवधानही.आदल्याच दिवशी पगार जमा झाला होता खरा,पण मेसचे पैसे देऊन,घरी देण्यासाठीचे एक हजार रुपये बाजूला काढून ठेवल्यानंतर हातात कशीबशी एक वेळच्या बस भाड्यापुरतीच जुजबी रक्कम शिल्लक रहात होती.सलिलसाठी सोबत थोडा खाऊ नेणं सोडाच,नृ.वाडीला
दर्शनाला जाण्यापूर्वी देवळाच्या वाटेवरील ओळखीच्या ‘अवधूत मिठाई भांडार’ मधून नारळ/कापूर घ्यायसाठीही पैसे उरले नसते.शिवाय परत आल्यानंतर पुढच्या पगारापर्यंतच्या महिनाभरातल्या माझ्या किरकोळ खर्चाचाही प्रश्न होताच.मेसमधे जेवून,महिन्याचं बील भागवून बाहेर पडलो,तेव्हा ब्रॅंचमधे पोहोचेपर्यंत हेच विचार मनात घोळत राहिले.या विचारांमधे हाच प्रश्न फॅमिली शिफ्टींगपर्यंत वर्षभर रहाणाराच होता याचंच दडपण अधिक होतं.कोल्हापूरला गेल्यावर घरी चर्चा करुन कांहीतरी मार्ग काढायला हवा हे ठरवलं खरं पण तिथली इतर व्यवधानं न् धावपळीत बायकोला हे सगळं सांगायची वेळ येऊच नये असंही तीव्रतेने वाटत होतं. बसला अजून तासभर वेळ होता.हेच सगळे विचार सोबत घेऊन मी घाईघाईने ब्रॅंचमधे गेलो.
ब्रॅंचमधे हेडकॅशिअर रांजणे माझीच वाट पहात होते.
“सर,हे सर्क्युलर बघा.गुडन्यूज आहे.”
मी उत्सुकतेने पुढे होत त्यांनी कॅश विंडोमधून सरकवलेलं ते सर्क्युलर घेतलं. घाईघाईने त्यावरून नजर फिरवली आणि आश्चर्यानंदाने क्षणभर अवाक् होऊन ते सर्क्युलर पुन: एकदा वाचून खात्री करुन घेतली.माझ्यासाठी ती फक्त गूड न्यूजचं नव्हती तर त्या क्षणी माझ्या मनात रुतून बसलेले सगळेच प्रश्न चुटकीसाठी सोडवणारा, चमत्कार वाटावा असा तो एक योगायोग होता..!
राष्ट्रीयकृत बँकिंग स्टाफच्या वेज रिव्हिजन संदर्भातील ‘बायपार्टाईट सेटलमेंटच्या ‘इंडियन बँकज् असोसिएशन’ आणि ‘स्टाफ युनियन्स’ यांच्यामधील चर्चेच्या फेऱ्या बरेच दिवस सुरू होत्या. बोलणी यशस्वीरित्या पूर्ण होऊन पुढील पाच वर्षांसाठीचं ‘वेज रिवीजन ऍग्रीमेंट’ साईन झाल्याचं ते सर्क्युलर होतं. याच एॅग्रीमेंटनुसार ऑफिसर्सपैकी बॅंकांच्या सी.ए.आय.आय.बी च्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना एक अॅडिशनल इन्क्रिमेंट नव्याने मंजूर झालं होतं. माझ्यासाठीची खास गुड न्यूज होती ती हीच.
एखादी अनपेक्षित, अप्रिय, नुकसानकारक घटनाही त्यावेळी त्रासदायक ठरलेली असली तरी दीर्घकाळानंतर अचानक त्या घटनेतल्या तत्कालीन त्रासातही भविष्यकाळातील अनुकूलता कशी लपलेली असू शकते याची ही बातमी म्हणजे निदान माझ्यासाठीतरी नक्कीच एक दिलासा देणारी प्रचिती होती!
सी.ए.आय.आय.बी. पार्ट-१ ची परीक्षा मी नोकरीत कन्फर्म झाल्याबरोबर खूप अभ्यास करुन पास झालो होतो. अॅडिशनल इन्क्रीमेंटबरोबरच आॅफिसर प्रमोशनसाठीही मला त्याचा फायदा झाला होताच. पुढे ऑफिसर झाल्यानंतर नवीन जबाबदाऱ्या पार पाडत असतानाच पार्ट-२चीही तयारी करून मी ती परीक्षाही जून ७९ मधे उत्तीर्ण झालो होतो. त्यामागे करिअरपेक्षाही तातडीने मिळणाऱ्या अॅडिशनल इन्क्रिमेंटच्या आर्थिक फायद्याचा विचारच प्रामुख्याने माझ्या मनात होता. पण १ जुलै १९७९ पासून अस्तित्वात आलेल्या वेज रिव्हीजनच्या नियमानुसार या परीक्षा नव्याने उत्तीर्ण झालेल्या माझ्यासारख्या ऑफिसर्सना मिळणारे जास्तीचे इन्क्रिमेंट बंद करण्यात आले होते. अर्थातच माझा तेव्हा खूप विरस झाला होता. आपल्या हक्काचं काहीतरी हिरावून घेतलं गेल्याचं ते दुःख पुढे दीर्घकाळ माझ्या मनात घर करुन राहीलं होतं! तेव्हा हिरावलं गेलेलं सगळं मला अतिशय अनपेक्षितरित्या असं दामदुपटीने आता परत मिळणार होतं. १९७९ सालचा तो अन्यायकारक निर्णय बदलण्यासाठी ऑफिसर्स युनियनकडून तेव्हापासूनच सततचे प्रयत्न सुरू होते पण त्याला यश येत नव्हतं. त्यामुळे पाच वर्षानंतरच्या यावेळच्या व्हेज रिविजन संबंधीच्या मीटिंगमधे युनियनने तो प्रेस्टीज पाॅईंट बनवला होता. त्यामुळे तेव्हा नाकारलं गेलेले ते अॅडिशनल इन्क्रिमेंट पूर्वकालीक फरकासह आता मंजूर करण्यात आलं होतं.
बातमी अनपेक्षित आणि म्हणूनच अधिक आनंददायी होती पण त्या आनंदात मी गुंतून पडून चालणार नव्हतं.अडीच वाजत आले होते.घरी जाऊन बॅग घेऊन थेट स्टॅण्ड गाठायचं तर पाचदहा मिनिटांत मला निघालाच हवं होतं.
“सर,एक मिनिट…”
मी रांजणेंचा निरोप घेऊन जायला निघालो तेवढ्यात त्यांनी थांबवलं.
” सर,मी तुमच्या स्टाफ फाईल मधले सॅलरी डिटेल्स घेऊन तुमचे एरियर्स-कॅल्क्युलेशन करून ठेवलंय. चेक करून दिलंत तर लगेच तुमच्या अकौंटला क्रेडिट करतो.प्रवासाला निघालात म्हणून.हवे तर जास्तीचे थोडे पैसे बरोबर नेता येतील.”
माझी या क्षणीची नेमकी गरज रांजणेनी न सांगता कशी ओळखली होती ते ‘तो’च जाणे.
मी कृतज्ञतेने रांजणेंकडे पाहिले.त्यांचे मनापासून आभार मानून अॅरीअर्सशीट चेक करायला घेतली. पाहिलं तर अॅरियर्सची मला जमा होणारी रक्कम होती ५३४०/- रुपये. माझा पगार दरमहा १५००/-रुपये होता त्या काळातले ५३४०/-रुपये!मी थक्कच झालो. डिटेल्स चेक करुन ती फाईल आणि १००/-रुपयांची withdrawal slip रांजणेंकडे देऊन त्यांच्याकडून १००/-रुपये घेतले आणि त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडलो.
आज सकाळी बॅंकेत येताना आर्थिक नियोजनाचं केवढं प्रचंड दडपण माझ्या मनावर होतं आणि आता प्रवासाला निघण्यापूर्वीच ते ओझं ‘त्या’ने असं क्षणार्धात हलकं केलं होतं..!
ही अचानक मिळालेली एवढी रक्कम फॅमिली शिफ्टींग होईपर्यंतचे वर्षभर माझी जमाखर्चातली तूट भरुन काढायला पुरेशी ठरली.नेमक्या गरजेच्या क्षणी जादूची कांडी फिरावी तसा घडलेला हा योगायोग श्रध्देबरोबरच ‘त्या’च्याबद्दलची कृतज्ञता दृढ करणारा होता आणि
आता यापुढे दर पौर्णिमेच्या दत्त दर्शनाच्या बाबतीत कधीच कसलीच अडचण येणार नाही असा विश्वास निर्माण करणाराही.पण पुढच्याच पौर्णिमेच्यावेळी एक वेगळंच आक्रित माझी खऱ्या अर्थाने कसोटी पहायला समोर उभं ठाकणाराय याची मला याक्षणी कल्पना कुठून असायला?…
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈