मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “अश्वारूढ योद्ध्यांची माल्टा मालिका” ☆ अनुवाद – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ “अश्वारूढ योद्ध्यांची माल्टा मालिका” ☆ अनुवाद – सुश्री सुलू साबणे जोशी 

जगभरातील प्रचलित नाण्यांत सर्वात वजनदार, एक किलो वजनाचे, हे चांदीचे नाणे चलनात आणले आहे – एका युरोपमधल्या चिमुकल्या देशाने – ज्याचे नाव आहे “ माल्टा “ 

‘अश्वारूढ योद्ध्यांच्या माल्टा मालिके’तील हे चांदीचे नाणे असून २००३ या वर्षी ते चलनात आणले गेले. भारतीयांसाठी ही अतिशय गौरवाची बाब आहे की, या नाण्यावर  राजा महाराणा प्रताप यांना स्थान मिळालेले आहे.

या नाण्याचे चलनी मूल्य ५००० लिरा आहे आणि वजन आहे १ किलो (चांदी). हे एक किलो वजनाचे नाणे जगात उपलब्ध असलेल्या नाण्यात आकारानेही सर्वात मोठे आहे. या नाण्याच्या एका बाजूला महाराणा प्रताप यांचे चित्र, त्यांच्या जीवनकालासह आहे, तर दुस-या बाजूस माल्टा देशाचे नाव व चिन्ह आहे. माल्टा सरकारने अशी १०० नाणी चलनात आणली आहेत.

सोळाव्या शतकातील एका हिंदू राजाची गौरवास्पद दखल, आपल्यापासून ६,५०० कि.मी. दूर असलेल्या एका लहानशा देशाने घ्यावी, याचा अर्थच असा होतो की, महाराणा प्रताप यांचे प्रभावशाली शौर्य जगविख्यात आहे.                                                                                                                       *                                                                          

या उलट, आपल्या देशांतील इतिहासात मात्र आक्रमक घुसखोरांची नोंद  ‘थोर’ अशी केली गेली आहे, याचे सखेद आश्चर्य वाटते.

अनुवाद : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

(मूळ इंग्रजीत असलेली ही गौरवास्पद माहिती आपल्या सर्वांपर्यन्त पोहोचावी या उद्देशाने सुश्री साबणे यांनी ती मराठीत अनुवादित केली आहे.) 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ परवा अचानक… कवयित्री : इरावती ☆ प्रस्तुती डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ परवा अचानक… कवयित्री : इरावती ☆ प्रस्तुती डॉ. ज्योती गोडबोले 

परवा अचानक मी मेले

आणि चक्क स्वर्गात गेले 

म्हटलं चला पृथ्वीवरच्या

कटकटीतून सुटले

 

स्वर्गात मला माझे

बरेच आप्त भेटले.

संध्याकाळी विचार केला

जरा फेरफटका मारू

स्वर्गाचा आनंद लुटण्यासाठी

पाय मोकळे करू

 

पहिल्याच वळणावर मला

विंदा आणि बापट भेटले

त्यांना पाहून अवाक् झाले

शब्दच माझे मिटले.

 

मला पाहिल्यावर बापट

छान मिश्कील हसले

विंदा म्हणाले याच्या या

हसण्यावरच सगळे फसले.

 

मी नमस्कार केल्यावर

हळूच म्हणाले विंदा

ज्ञानपीठ पुरस्काराचा म्हणे

क्रायटेरिया बदललाय यंदा.

 

मी म्हटलं मी काय बोलणार

मी तर एक सामान्य वाचक

तुमच्या साहित्य पंढरीतला

एक साधासुधा याचक.

 

पुढच्या वळणावरच्या बाकावर 

गडकरी होते बसले

त्यांच्या शेजारी गप्पा मारताना

बालकवी अन् मर्ढेकर दिसले

 

तशीच गेले पुढे

करीत मजल दरमजल

छोट्याशा पारावर होते

सुरेश भट अन् त्यांची 

भन्नाट गझल!!!

 

पुढे एका कल्पवृक्षाखाली

सावरकर होते बसले

मी नमस्कार करताच

हात उंचावून हसले

 

म्हणाले मला,” कसा आहे

माझा भारत देश?

मला दूर नेणा-या सागराचा

तसाच आहे का अजून उन्मेष?”

 

त्यांच्या बलिदानाची आम्ही

काय ठेवलीय किंमत 

हे त्यांना सांगायची

मला झालीच नाही हिंमत.

 

तशीच पुढे गेले तर

गडबड दिसली सारी

कोणत्यातरी समारंभाची

चालली होती तयारी.

 

कोणी बांधीत होते तोरण

कोणी रचित होते फुलं

स्वागतगीताची तयारी 

करीत होते पु ल.

 

पुढं होऊन नमस्कार केला

म्हटलं, ‘कसली गडबड भाई?

विशेष काय आहे इथे? 

कसली चालल्ये घाई?’

 

पुल म्हणाले उद्या आहे

इथं मोठा सोहळा

त्याच्यासाठी थोडासा

वेळ ठेव मोकळा.

 

डोळे मिचकावून भाई म्हणाले

उद्या आहे शिरवाडकरांचा बर्थ डे

तुमच्या भाषेत सांगायचं म्हणजे

उद्या आहे मराठी भाषा डे!!

 

असं नाही हं भाई

मी म्हणाले हसून

मराठी दिनाला आम्ही

‘दिन’ च म्हणतो अजून.

 

अरे वा! पुढे येऊन

म्हणाल्या बहिणाबाई

आसं दिवस साजये करून

व्हतंय का काही?

 

एक दिस म-हाटी तुम्ही 

वरीसभर करता काय?

एक दिस पंचपक्वान्न

पन वरीसभर उपाशी

असती तुमची माय!!! 

कवयित्री  : इरावती

संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “गुंफीयेला शेला” – लेखिका – संपदा जोगळेकर, सोनाली लोहार, हर्षदा बोरकर, निर्मोही फडके ☆ परिचय – सौ विजया कैलास हिरेमठ ☆

सौ विजया कैलास हिरेमठ

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “गुंफीयेला शेला” – लेखिका – संपदा जोगळेकर, सोनाली लोहार, हर्षदा बोरकर, निर्मोही फडके ☆ परिचय – सौ विजया कैलास हिरेमठ ☆ 

पुस्तक – गुंफीयेला शेला  

लेखिका – संपदा जोगळेकर,सोनाली लोहार,हर्षदा बोरकर,निर्मोही फडके….

अभिप्राय- विजया हिरेमठ, संवादिनी,सांगली

 प्रत्येक व्यक्ती वेगळी असते हे जरी सत्य असले तरी काही व्यक्तींमध्ये काही समान धागे असू  शकतात.. या समान धाग्यांमुळेच त्या व्यक्ती एकत्र येऊन समूहाने एखादे चांगले काम करू शकतात असा विश्वास देणारे हे पुस्तक…

पाहून एकच चित्र

विणला प्रत्येकीने कथेचा धागा

त्या एक एक धाग्यांला घेवून

विणला त्यांनी एक सुंदर शेला.. 

चार मैत्रिणी शरीर, मन, विचार, व्यवसायाने वेगवेगळ्या.. वाचन- लेखन हाच एक समान धागा.. उत्तम भाषाभ्यास, निरीक्षण क्षमता व कल्पनाशक्ती यांच्या जोरावर

त्यांनी आपल्या भेटीसाठी गुंफियेला शेला…

तो हाती माझ्या येता उबदार मज भासला….

हे पुस्तक म्हणजे एक आगळा वेगळा प्रयोग आहे . यामध्ये चारही लेखिका आग्रही,जागरूक आणि संयमाने व्यक्त झाल्याची जाणीव प्रत्येक कथेतून होते. या चौघींनी ही एकाच चित्रकृतीचा आपापल्या दृष्टीकोनातून घेतलेला शब्दवेध आणि त्यातून निर्माण झालेल्या आगळ्या वेगळ्या कथांचा हा संग्रह…

प्रत्येकीची कथा अगदी एका पानाची, वीस वाक्यांची, पण खूप काही सांगून जाणारी, कुठेच अधुरेपण नसणारी.. चित्राचा आकार, रूप, रंग आणि प्रत्यक्ष मतितार्थापलीकडच्या जाणीवांना चार लेखकांनी कथा रुपात बांधले आणि 48 चित्रप्रेरीत कथांचा हा शेला गुंफला गेला. पुस्तकातील डॉ आनंद नाडकर्णी यांची प्रस्तावना, हा शेला गुंफण्यापूर्वीचा लेखिकांचा प्रवास उलगडतो तर अच्युत पालव यांची प्रस्तावना या शेल्यास एक नाजूक किनार म्हणून शोभते. चारही लेखिकांचे मनोगत वाचताना प्रत्येकीच्या कथा वाचण्याची उत्कंठा वाटते तसेच प्रत्येकीकडून एक प्रेरणा नक्की मिळते..

एकच चित्र पाहून प्रत्येकीला कितीतरी वेगवेगळ्या आशयाच्या कथा सुचल्या त्यांची शीर्षके वाचूनच हे लक्षात येत गेलं. खूपदा वाटलं ही या चित्राशी या शिर्षकाचा काही संबंध असू शकतो का?  चित्र पाहून आपल्या भावविश्वात एक कथा निर्माण होते  पण प्रत्येक कथा एका वेगळ्याच विश्वाचा प्रवास घडवते. एकाच चित्राकडे पाहून चार लेखिकामधील निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या भाव भावनांचे आणि संवेदनशील मनाचे आपल्याला घडणारे दर्शन खरोखर मन थक्क करते. उदाहरणादाखल सांगायचं तर या पुस्तकात एक चित्र आहे.. एका मुलीने रंगीबेरंगी फुगे हातात घट्ट धरले आहेत आणि त्यावर लेखिका हर्षदाने लिहलेली कथा “पॅलेट” एका सुंदर क्षणी एकत्रच असताना अपघाताने कायमची ताटातूट झालेल्या रसिका आणि पुनीतची कथा.

याच चित्रावरून  लेखिका सोनालीने लिहिलेली कथा-“फुगा” यात भेटते छोटीशी सुमी जी गेली पाच वर्षे आईची माय म्हणून जगत आहे आणि एकेदिवशी तिच्या आईने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्यानंतरचे तिचे आजण भावविश्व आपल्याला हळवं करतं…

लेखिका निर्मोही या चित्रावरून कथा लिहिते “स्टॅच्यू” गंमतीने खेळल्या जाणाऱ्या खेळाची एक हृदयस्पर्शी कथा..

लेखिका संपदा या चित्रावरून कथा लिहिते ” श्वेता” दत्तक बाळ वाढवताना त्याच्या वर्तमान आणि भविष्याचा विचार करायचा भूतकाळ मन गढूळ करत राहील आणि काळाबरोबर त्याचा चिखल होत राहिल. ती आपला अंकुर नसली तरी आपली सावली म्हणून वाढवावी असा सुंदर संदेश देणारी प्रबोधनात्मक कथा… 

शेवटी चारही लेखिकांनी आपल्याला आवडलेलं एक एक चित्र निवडून त्या चार चित्राला एकत्रित अशा समर्पक कथा लिहिल्या. या चार चित्रांना एकाच चौकटीत आणून सलगपणे समोर ठेवून चार चित्रांची मिळून एकच कथा प्रत्येकीने लिहून आणखी एक आगळंवेगळं पाऊल उचललं आणि आत्तापर्यंत विणलेल्या सुंदर शेल्याची शेवटी एकत्रित गाठ बांधून एक सुंदर गोंडा ओवला असंच म्हणावसं वाटतंय.

एखादं चित्र फक्त चित्रच नसतं त्यामागे चित्रकाराच्या भावना दडलेल्या असतात. चित्रकाराव्यतिरिक्त फार कमी जाणकार माणसांनाच त्या जाणवतात किंवा चित्रातून दिसतात.  नाहीतर चित्र म्हणजे नुसताच आकार आणि रंग- रेषांचा खेळ.. कोणी चित्र पाहून नेत्रसुख अनुभवतो. कोणी काही वेळाचं सुख – समाधान शोधतो. कोणी चित्रात असं गुंतून जातो की स्वतःच्या संवेदना मग कथेत शब्दबद्ध करतो. 

‘प्रत्येकीच्या दृष्टीकोनाची न्यारी ही किमया

शब्दांच्या धाग्यांनी,  ” त्यांनी गुंफियेला शेला”

पुस्तकरूपी  भेटीस तो आपुल्या आला’

प्रत्येकाने पुस्तक वाचू या आणि शेल्याचा उबदारपणा अनुभवू या. या शेल्याचा उबदारपणा अनुभवू या.

परिचय – सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares