सौ .योगिता किरण पाखले

(आदरणीया सौ .योगिता किरण पाखले जी  मराठी साहित्य की विभिन्न विधाओं की  सशक्त हस्ताक्षर हैं। आप कई पुरस्कारों/अलंकरणों से पुरस्कृत/अलंकृत हैं। आपकी रचनाएँ स्तरीय पत्र पत्रिकाओं / चैनलों में प्रकाशित/प्रसारित हुई हैं। आज प्रस्तुत है आपकी  जीवन के संध्याकाळ में विवाह पर एक विचारोत्तेजक आलेख    उतारवयातील लग्न… ।  आपने इस आलेख में  उपरोक्त विषय पर जीवन के संध्याकाळ में होने वाले विवाह का भरे पूरे परिवार पर प्रभाव साथ ही यदि वृद्ध युगल में कोई एक शेष रहता है अथवा वृद्धाश्रम में रहता है तो जीवन पर प्रभाव पर विस्तृत विमर्श किया है।  हम भविष्य में आपकी और चुनिन्दा रचनाओं को प्रकाशित करने की अपेक्षा करते हैं।)   

 ☆ उतारवयातील लग्न… ☆

काही दिवसांपूर्वी व्हाट्स अप वर एका लेखकाचा प्रेमाविषयीचा लेख वाचला. प्रेमाचे अनेक टप्पे ज्यात त्यांनी मांडले होते. प्रत्येक वयात होणाऱ्या प्रेमाचे स्वरूप ,त्याची कारणं आणि गरज सुद्धा वेगवेगळी असते. मग ते प्रेम किशोर वयातील प्रेमापासून  ते वृद्धत्वा पर्यंत नव्हे तर  शेवटच्या श्वासापर्यंतचे असो….

प्रेमाला वयाचं बंधन कुठे? होय ना … आणि ते नसतंच आणि नसावं सुद्धा.

“संसारी लोणचं मुरतं  तारुण्य सरल्यावर

चाखतो चव त्याची जशी प्रेमात पडल्यावर”

पण या मुरलेल्या लोणच्याची चव चाखण्यासाठी जोडीदार मधेच सोडून गेला तर ?आज समाजात बघितले तर 50 ते 60 वर्षापुढील माणसे ही एकटी आहेत. संसाराच्या अर्ध्या वाटवेर जोडीदाराने साथ सोडली. त्यांच्या परिवारात मुलं ,मुली ,नातवंड आहेत पण….. उणीव आहे ती हक्काच्या आधाराची !!!

ती मिळवून देण्यासाठी समाजाने घालून दिलेली किंबहुना स्वतःच कुठेतरी बिंबवून घेतलेली अलिखित नियम आडवी येतात. काळानुसार बदल आणि गरजेनुसार काळ कुठेतरी बदलतोय म्हणून या अलिखित नियमांच्या (चौकटीच्या) बाहेर जाऊन या वयात लग्न ही गोष्ट जन्म घेऊ लागली आहे.

पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती म्हणजेच दोन चार भाऊ आणि त्यांचे कुटुंब एकत्र होते. त्यात जर कुणाचा जोडीदार सोडून गेला याचे दुःख हे कुटुंबासोबत राहून विरून जायचे.आणि मी वर म्हटल्याप्रमाणे अलिखित नियम तर होताच; परंतु फार फार तर दोन किंवा एक अपत्य असलेल्या आई वडिलांच्या जीवनात असा प्रसंग येतो तेव्हा हा विचार जन्म घेतो.

आता हा विचार योग्य की अयोग्य या दोन शब्दात उत्तर देणं म्हणजे फक्त बुद्धी किंवा मन याच्या एकाच अंगाने विचार करण्यासारखे असेल. खरं तर कुठलीही गोष्ट ही व्यक्तिपरत्वे तिच्या प्राप्त परिस्थितीनुसार  योग्य आणि अयोग्य यात बांधली जाते. परंतु एक तटस्थ व्यक्ती एका बाजूला झुकलेल्या मापापेक्षा फक्त मधोमध असलेल्या काट्या कडे पहातो तेव्हा तो विचार हा योग्य आणि अयोग्य या शब्दांच्या पलीकडचा होतो. त्याला वास्तवाची झालर असतेच असते.

जर या वयातील व्यक्तींनी दुसरा जोडीदार निवडला तर त्याची आज 30 ते 35शीत असलेली मुलं, मुली हे बाहेरून आलेली आई किंवा वडील स्वीकारतील का ?त्यांना आई बाबा म्हणून हाक मारतील का ? सख्यांसारख नाही पण किमान आपूलकीचं नात निर्माण होईल का? याच उत्तर कदाचित हो राहील असतं पण जेव्हा मुलं ही लहान असती. कारण लहानपणापासून त्यांचं संगोपन बाहेरून आलेल्या आई किंवा वडिलांनी केलं असतं .पण मुलांचीही आज 4 ते 5   वर्षाची मुलं असतात ते त्याचा संसारात गुंतलेली असतात अशात आई वडिलांचे लग्न हे स्वीकारणे खरचं झेपेल का? हे झालं मुलांच्या बाबतीत. पण सुनेचा विचार केला तर आज सख्खे सासू सासरे ही जिथे नको असतात तिथे परक्या व्यक्तीचा विचार होईल की नाही  याची शाश्वती कशी देणार..?

उदाहरणासह सांगायचं तर (सासूचा विचार करू) सासूचे दुसरे लग्न करायचे यात  बघितलं तर सासूला हक्काचा जोडीदार मिळेल म्हणजेच तिची आर्थिक जबाबदारी त्याचप्रमाणे भविष्यात  वयोमानानुसार येणाऱ्या शारीरिक व्याधी याची मोठया प्रमाणात जबादारी जोडीदार घेईल. यामुळे आपोआपच सासूचे मुलं, सूना यातून बऱ्याच अंशी  जबाबदारीतून मोकळे होतील.

परंतू जेव्हा घरात नवीन आई, सासू आणायची आहे तेव्हा मुलं व सुनेची जबाबदारी वाढेल  सर्वच बाजूने. या सर्व परिणामांचा विचार सर्व अंगाने करणे गरजेचे आहे.

एक सत्य घटना नमूद करावीशी वाटते. ‘एका व्यक्तीने वयाच्या 50 व्या वर्षी दुसरे लग्न केले . मुलांची इच्छा नसतांना. तो आर्थिक दृष्ट्या अतिशय सधन. त्याची मुले ही कमावती ज्यांना वडिलांच्या संपत्तीची हाव आणि गरज नाही . ते जोडपे  त्या मुलांमध्ये न रहाता वेगळे रहायचे. ती व्यक्ती आजारी पडल्यानंतर त्याची पत्नी काळजी देखील घेत नव्हती आणि शेवटी ती व्यक्ती वारली  या आधीच त्या व्यक्तीची सर्व संपत्ती त्या बाईने स्वतःच्या नावावर करून ठेवली होती . तुमचा  बाप वारला हे सुद्धा त्या मुलांना  कळविण्याची तसदी तिने घेतली नाही .  याचे मुलांना फार वाईट वाटले .तिचा हेतू फक्त संपत्ती मिळवणे इतकाच होता.’ या घटनांचा विचार अशा वयात लग्न करतांना घ्यायला हवा.

ज्यांना मुलबाळ नाही व जीवनसाथी अर्ध्यात सोडून गेला त्यांच्यासाठी या वयातील लग्न हे त्यांच्या आयुष्याला सुखाचे वळण नक्कीच देणारे आहे. ज्यांची मुले  त्यांचा सांभाळ करीत नाहीत अथवा वृद्धाश्रमात रहातात अशा साठी सुद्धा जीवनसाथी मिळणं सुखावह आहे.

तारुण्यात लग्न करतांना शिक्षण, सौंदर्य, पैसा ,प्रतिष्ठा या गोष्टीचा मुख्यतः विचार होतो मात्र  उतरत्या वयात फक्त निखळ प्रेम,आधार आणि सगळ्यात महत्त्वाचा शुद्ध हेतू ठेवून लग्न व्हायला हवीत कारण या वयात जर विश्वासघात झाला तर ते दुःख सहन करण्याची ताकद कशी बरं राहील…..!

उतरत्या वयात होणारी लग्न ही काळाची गरज आहे. हा बदल स्वागतार्ह नक्कीच आहे  परंतु तो  प्रत्येकाच्या कौटुंबिक परिस्थिती नुसार ,वास्तविकतेला अनुसरून,परिणामांचा विचार या सर्व बाबी (condition) त्यात रहाणाऱ्या आहेतच. जशा नाण्याला दोन बाजू असतात त्यातील एक बाजू किंवा दोन्ही बाजू देखील  बघून चालणार नाही तर त्याची तिसरी बाजू जो बघू शकतो तो यशस्वी नक्कीच होईल यात शंका नाही.

 

© सौ. योगिता किरण पाखले, पुणे

मोबा 9225794658

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments