श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक अत्यंत भावप्रवण कविता “गर्भार प्रतिभा”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 46 ☆
☆ गर्भार प्रतिभा ☆
गर्भार प्रतिभा, कधी कुठे प्रसुत होईल
याची काही खात्री देता येत नाही
म्हणूनच तिचे डोहाळे पुरवण्यात
प्रज्ञाही कुठं कमी पडत नाही
तिच्या प्रसुतिचा काळ, असू शकतो
नऊ मिनिटे, नऊ तास, नऊ दिवस नऊ महिने किंवा आजूनही काही
उगाच चिरफाड करून
ती आपल्या आपत्याला जन्म देत नाही…
प्रसुतीवेदना सहन करण्याची ताकद
आणि जिद्द असते तिच्या मनात
म्हणून ती विहार करत असते
केतकीच्या वनात…
कधी प्रेम, कधी वात्सल्य, तर कधी क्रोध
अस एक एक जन्माला येतं आपत्य
आणि प्रत्येक आपत्य सांगतं
आपलं उघडं नागडं सत्य…
तिच्या जवळ असतात वजनदार शब्द
आणि प्रतिमा, प्रतीकांचे अलंकार
प्रत्येक आपत्याच्या गळ्यात ते अलंकार घालून
ती देत असते त्याला सौंदर्य अन् आकार
कुठलाही सोहळा न करता
ती आपल्या आपत्याला देते गोंडस नाव
देते त्याला वाढण्याचं बळ
मिळावे त्याला नाव, भाव आणि वाव
म्हणून सोसत असते वेदनेची कळ…
एक बिजातून जन्मा येते माता अथवा पिता
तरी कुळाचे नाव काढाते सांगे नाव कविता…!
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८