सुश्री ज्योति हसबनीस
ऊस डोंगा परी……..
(प्रस्तुत है सुश्री ज्योति हसबनीस जी की लघुकथा ऊस डोंगा परी……..। )
रात्रीची फ्लाईट घेतांनाच मनावर एक प्रकारचं दडपण आलं होतं. एयरपोर्टपासून घर बरंच दूर होतं. रात्रीच्या वेळी पायाखालचा रस्ता, सवयीची वळणं देखील अनोळखी भासू लागतात, रस्त्यावरचे दिवे बऱ्याचदा काळोखच उजळ करतायत की काय असा भास होत असतो. पण वेळेचं आणि पैशाचं गणित सोडवण्याचा हाच एक उत्तम पर्याय असल्याने जिवाच्या कराराने शेवटी हाच निवडला , आणि आता ज्याची भिती वाटत होती तेच झालं. चांगली दीड तास लेट झाली होती flight! विमान लॅंड होऊन सामान मिळेपर्यंत ११.३० च वाजले होते.
सामान घेऊन बाहेर पडले आणि रिक्षेवाले टॅक्सीवाले मागे पुढे घोटाळायला लागले, टॅक्सी की रिक्षा अशी दोलायमान स्थिती असतांनाच एक काळाकभिन्न, राकट, डेरेदार पोटाचा, घेरदार माणूस जणू मला घेरल्यासारखाच जवळ आला. ‘चला आपल्या रिक्षेत बसा, सामान द्या, तुम्ही व्हा पुढं!’ मला हो नाही म्हणायची संधी ही न देता.
जणू त्याने फर्मानच सोडलं त्याच्या रिक्षेत बसायचं. आणि त्याने एका माणसाला इशारा केला, त्यासरशी त्या माणसाने सराईतपणे रिक्षा जवळ आणून उभा केला आणि माझं सामान ठेवायला सुरूवात केली. ‘माझा हात घट्ट घरून ठेव ‘असं देवाला विनवत मी रिक्षेत बसले. मी मनोमन स्वत:लाच शिव्या घालत होते की, ‘का आपण असे त्या माणसाच्या म्हणण्याला भुललो, का नाही म्हंटलं नाही , कसा दिसत होता तो, अक्षरश: गुंड पुंड, भाई कॅटॅगरितला वाटत होता! आणि त्याने इशारा केलेला माणूस पण त्यालाच सामिल असणार! कित्येक उलट सुलट बातम्या पेपरमधल्या आपण वाचत असतो, का आपण त्यातून शहाणपण शिकत नाही, ‘अशा एक ना अनेक विचारांचे भुंगे डोकं पोखरायला लागले.
दिवसभराची पावसाची झड थांबली होती. खाचखळगे पाण्याने तुडुंब भरले होते ! रस्ते पण काजळलेले, शिणून पेंगुळलेले, एकटेपणात गुरफटलेले वाटत होते. गारेगार झालं होतं पुणं अगदी! थंडं वारं हाडात शिरून अगदी झिणझिणून टाकत होतं तनामनाला! एखाद् दुसरं वाहन आणि रिक्षेचा आवाज एवढंच काय ते रात्रीच्या नीरव शांततेचा भंग करत होतं. संभाषण नसल्याने एक विचित्र शांतता वातावरणात जाणवत होती. माझ्या मनातल्या गोंधळाचा सुगावा लागल्यासारखा, ‘ताई लेट झालं का विमान’ अशी त्याने संभाषणाला सुरूवात केली. त्याचं ‘ ताई ‘ हे संबोधन मी ऐकलं आणि माझ्या मनावरचा ताण अगदी कुठल्याकुठे पळाला. आणि मग आमच्या काय गप्पा रंगल्यायत राव ! त्याचं नेटकं कुटुंब, दोनच मुली पण त्यांना कसं मुलासारखं वाढवलं, त्याच्या ऐपतीप्रमाणे कसं शिकवलं, पुण्यातलं, समाजकारण, अर्थकारण, राजकारण, राजकारणातले डावपेच, मुत्सद्दी, तसंच कुचकामी नेतृत्व, आणि शेवटी सामान्यांसाठी सारे एकाच माळेचे मणी हा निष्कर्ष! सगळं शेवटी जिथलं तिथेच राहतं, आपल्या पोळीवर तूप ओतून घेणाऱ्यांचं फावतं असा सूर!
खरंच, रात्र , निर्मनुष्य रस्ता, दूरवरचं घर सारं सारं विसरायला झालं मला. भानावर येत, ‘आता डावीकडे घ्या दादा’ असं त्याला सुचवत मी घरी पोहोचले देखील! त्याला रिक्षेचं भाडं देत आणि वर बक्षिसी देत शुभ रात्री चिंतत जिना चढतांना चक्क गुणगुणत होते मी …
मंडळी कल्पना करा काय गुणगुणत असेन मी ..? ‘ ऊस डोंगा परी, रस नोहे डोंगा, काय भुललासी, वरलिया रंगा? ‘खरंच राहून राहून माझ्या डोळ्यासमोर तो काळाकभिन्न, राकट देहाचा, डेरेदार पोटाचा, घेरदार माणूस आणि त्याने त्या रिक्षेवाल्याला केलेला इशारा येत होता. त्याच्या बाह्यरूपाचा मी धसका घेतला होता, भीती वाटली होती मला, पण प्रत्यक्षात किती वेगळा अनुभव आला मला. खरंच बाह्यरूपावरून असे अंदाज बांधणं अगदी चुकीचं आणि एखाद्यावर अन्याय करण्यासारखंच आहे, नाही का? किती मोठी चूक करतो आपण अशावेळी! माणसाचं दिसणं आणि त्याचं असणं यातल्या त्याच्या माणूस असण्याचा विसर का पडतो आपल्याला? आणि हो अजून एक गोष्ट ….कुठल्याही परिस्थितीत आपला हात ‘त्याने’ घट्ट धरलाय ही जाणीव सतत मनाशी जपावी, ती जाणीव आपला प्रवास नेहमी सुरक्षित होईल ह्याची काळजीच घेते! आपल्याला उभारी देऊन निश्चिंत करते!!
© ज्योति हसबनीस