☆ मनमंजुषेतून : कोनाडा – सुश्री दीपा पुजारी ☆
आज सकाळपासून मन सैरभैर झालंय माझं.कारणही तसंच होतं.भावानं फोन वर सांगितलेली बातमी तशीच होती.आई बाबांनी आमचं जुनं घर पाडून नवीन बांधण्याचं ठरवलं होतं. हे कधी ना कधी होणार च होत.पण मनच ते. केंव्हाच माहेरघरी पोचलं.
आमचं घर तसं जुनंच,मातीचं, दोन मजली.जुन्या पध्दतीचं, तरीही मायेचा गारवा
देणारं! या घरात आठवणींचा खजिना होता.असच एकदा बाहेरच्या खोलीतल्या कोनाड्यात मी एक पेन लपवून ठेवलं होतं. मिलिंद, माझा लहान भाऊ, त्यानं घेऊ नये म्हणून. बाबांनी आणलेलं तेच पेन दोघांना पाहिजे असे.बरेच दिवस या कोनाड्यानं पेनाचं गुपित सांभाळून ठेवलं.त्या कोनाड्यात आईनं एक कृष्णाची मूर्ती ठेवली होती.गोकुळाष्टमी ला तिथं कोनाड्यात च सजावट करून पूजा केली जाई. याच खोलीत गणपतीचा कोनाडाही होता. चांगला लांब रुंद तसाच उंच.पुढील चौकटीला छानशी नक्षीदार कमानी होती.कोनाडा बंद करण्यासाठी लहानस दार होतं,पिटुकल्या कडीसह.
माजघरातल्या कोनाड्यांची साठवण काही वेगळीच बरं. एकात तेलाची बुधली, फणीपेटी, कंगवे, कुंकू,रिबीनी इ.वस्तू असत. दुसऱ्या कोनाड्यात वाळवून ठेवलेल्या भाज्या, कडधान्य असतं.माहेरपणाला आलेल्या माझ्या आत्त्या या कोनाड्यांमध्ये त्यांचं बालपण शोधत स्वैपांकघरातील कोनाडे म्हणजे आजच्या घरांतील स्टोअररुम! चिंच, आमसुलं,गुळ,साखर, अशांच्या
बरण्या दाटीवाटीने, नटूनथटून, उंचीनुसार ऊभ्या असतं. दुपारी आई झोपली की आम्ही त्यांच्या शी सलगी करत असू.काय, सुटलं ना तोंडाला पाणी?
या कोनाड्यात माझ्या काही हळव्या, काही लज्जतदार, काही जायकेदार,तर काही जरतारी साठवणी साठवून ठेवल्या आहेत.तुळशीवृंदावनातल्या पणतीच्या कोनाड्यात
आजी आजोबांनी सांगितलेल्या किती गोष्टींचं संस्कारांचा गाठोडं आहे.
कोनाडा हा शब्द अलिकड हद्दपार झाला असला तरी आजकालच्या फ्ल्याट मध्ये तो शोकेसमध्ये गवसतो.नजाकतदार, डेकोरेटिव्ह विविध आकारात तो समोर येतो. माणसाने स्वत: बरोबर
त्याचीही ऊत्क्रांती केलेली दिसते.मन व राहणी आधुनिक असली तरीही आठवणी पाठशिवण करत येतातच ना? प्रत्येकाच्या मनात
एक कोनाडा असतोच ना? हो, फक्त त्याचा आकार वेगळा असेल इतकचं. कविवर्य सुरेश भटांनी दूर कोपरयात दिवा ठेवून तो अजरामर केलाच आहे.
© सुश्री दीपा पुजारी
इचलकरंजी, मो.नं. ९६६५६६९१४८
ई मेल [email protected]
सुस्वागतम् आणि अभिनंदन.
कोनाडा खूपच देखणा.मनात कायम राहिल असा.
प्रत्येकाच्या मनातील कोनाड्याच्या आठवणींना नक्कीच उजाळा मिळाला असेल. छानच.