☆ मनमंजुषेतून : मडबाथ ☆ सुश्री सावित्री जगदाळे ☆
शेतात ऊसाची रोपे लावायला गेलो होतो. आता नर्सरीत ऊसाची देखील रोपे मिळतात . ऊसाची लागण करणारी पुरुषांची टीम असते. रोपं लावायला मात्र बायकाच असतात. मग मीही बायकांबरोबर गेले. शेतात काम करण्याचा आनंद असतो. जसा लेखन वाचनात असतो. शारीर कष्टाने मनही टवटवीत होते.
रोपांची लावणी करण्याची पध्दत मला माहीत नव्हती. मी वाकून लावू लागले. तर बायका म्हणाल्या, ‘वाकून कुठवर लावशील? बसून लाव.’
‘मला दोन पायावर बसता येत नाही. बसून मागे सरकता येत नाही.’ मी म्हटलं.
‘अगं असं फतकल घालायचे. अन् असं सरीवर हात टेकवून मागं सरकायचं.’
६० वय ओलांडलेल्या फुईंनी सांगितलं. मग मी बसले सरीत फतकल घालून, खुरप्याने खड्डा खणून त्यात ऊसाचे रोप लावायचे. माती घालून नीट दाबायचे. मग खुरपे , रोपांमधील अंतर मोजण्यासाठी दिलेली दोन फुटाची काटकी. रोपांचा ट्रे मागे ओढायची आणि सरीवर हात टेकूवून मागे सरकायची. जमायला लागलं . मग मलाही हुरूप आला. बाकीच्यांनी डोक्याला टॉवेल, अंगात जुना शर्ट, कमरेला जुनं गुंडाळलेलं. त्यामुळं त्यांना कपडे खराब होण्याची भिती नव्हती. मला फुई म्हणाल्या, ‘सायबीन आली तशीच. डोक्याला काय न्हाय, अंगात काय न्हाय.’ मी म्हटलं, ‘असू द्या. कुठं ऊन आहे? आभाळ तर आलंय.’
तेवढयात पाऊस सुरूच झाला. शिरबातात्या आणि ह्यांचं सुरु, ‘वातावरण मस्त आहे. आता रोप तकवा धरणार.’
पण आमची भंबेरी उडाली. शिरबा तात्या सगळ्यांना ट्रे आणून देत होते. मग त्यांनी छत्र्याही आणून दिल्या. ह्यांनी मला जर्कीन आणि प्लॉस्टीकची टोपी दिली. पावसामुळे चिखल झाला. सगळं अंग चिखल्याने लडबडून गेलं. साडी, जर्कीन चिखलात माखले. रोपं लावायला सगळ्यांनाच उत्साह आला मग मी तरी का उठून जाऊ. साठी, पासष्टीच्या बायका सहज माती चिखलात काम करत होत्या. पाऊस झेलत होत्या. मग मलाच का जमू नये? मी ही जिद्दीने मडबाथ घेत रोप लागण करू लागले.
© सुश्री सावित्री जगदाळे
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
सुस्वागतम् आणि अभिनंदन .
लेख खूप छान .
सुंदर रचना