सुश्री ज्योति हसबनीस

एकांतातला आरसेमहाल

(प्रस्तुत है  सुश्री ज्योति  हसबनीस जी  का आलेख  एकांतातला आरसेमहाल)

एकांत किती हवाहवासा वाटतो . आपलाच आपल्याशी संवाद  साधायला, अंतर्मनात डोकावून बघायला, त्रयस्थासारखं स्वत:कडे निरखून बघायला , प्रत्येक कोनातून स्वत:ला न्याहाळायला !

ह्या एकांताचं आणि स्वमग्न मनाचं अगदी गाढ नातं आहे. एकांताच्या रूपात अवतरलेला आरसेमहाल आणि स्वमग्न मनाच्या प्रतिबिंबीत झालेल्या असंख्य छबी ..मोठं विलोभनीय दृष्य असतं ते. प्रत्येकच छबी स्वत:चं असं खास रुप घेऊन आलेली. कधी ती मैत्रिणींबरोबर भातुकलीत रमलेली असते, तर कधी अंगणातल्या ठिक्करबिल्ल्याच्या खेळात रमलेली, तर कधी शाळेच्या बाकावर बसून कवितेच्या जगात रममाण झालेली , तर कधी टारझनबरोबर आफ्रिकेच्या दाट जंगलात हरवलेली तर कधी श्रावणात झाडाला बांधलेल्या झोक्यावर बसून आकाशाशी स्पर्धा करत ऊंच ऊंच झोके घेणारी !

मध्येच एखादी छबी डोकावते डोळ्यात भरारीचं स्वप्न जागवणारी, तिचं तिचं आकाश शोधणारी, शोधलेल्या आकाशात जोडीदाराला सामावून घेणारी आणि नव्या जोमाने जणू इंद्रधनूच्या शोधात निघालेली ही छबी फारच लोभस भासते. तिच्या डोळ्यातील चमक बरंच काही बोलून जाते. तिच्या चेहऱ्यावरचे तृप्त भाव सुखाचा मूलमंत्रच जणू सांगू बघतात ..

 

आणि …अचानकच तिच्या अवती भवती वेगवेगळे भेसूर चेहरे डोकवायला लागतात …नको असलेले क्षण आणि त्यांनी व्यापलेले ठाण मांडून बसलेले त्या त्या घेरलेल्या क्षणांचे भेसूर चेहरे ..कितीही ठरवलं तरी ढवळून निघालेल्या तळातून सारं बाहेर येणारच ना ..आरसेमहालच तो, येणारी छबी लपून राहणार का …ती तर प्रतिबिंबीत होणारच..आणि एकांताच्या रूपातला तो आरसेमहाल एकदमच अंगावर येऊ बघतो, पण ….हीच वेळ असते स्वमग्न मनाला सावरायची, आधार द्यायची, फक्त आणि फक्त सुंदर तेच बघायला शिकवण्याची ! एकांताशी सुरेल नातं जोडायला शिकवण्याची !

नको असलेल्या कटू आठवणींचं ओझं किती वाहायचं, बोचकं बांधून भिरकावता आलंच पाहिजे आणि हिंमत करून एकदा भिरकावल्यावर, मागे वळून वळून त्या बोचक्याकडे कटाक्ष टाकणं, पुन: त्याला काखोटीला मारणं तर केवळ आत्मघातकीच !

 

एकांत आणि एकांतातलं स्वमग्न मन ह्यांच्यात सुसंवाद साधता यायला हवाच !

एकांतातल्या ह्या आरसेमहालातले स्वमग्न मनाचे चेहरे कायम उजळ हवेत, हंसरे हवेत, प्रसन्न हवेत  ! सगळ्या उजळ चेहऱ्यांनी हा आरसेमहाल कायम लखलखताच दिसायला हवा !!

 

*ज्योति हसबनीस*

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments