☆ विविधा : कौतुक – सुश्री अश्विनी कुलकर्णी ☆
कौतुक!एक आपलासा करणारा शब्द! कुणी कुणाचं कौतुक करावं?
जे खरच आवडतं आणि भावतंही …जे सहज सुंदर असतं… मग ते काव्य असो,लिखाण असो,चित्र असो, एखादी कलाकृती असो… एखाद्याच्या खेळातील यश असो…एखाद्याचा जबरदस्त विचार असो!
एखाद्याच्या शब्दाच कौतुक करावं, सुंदर हस्ताक्षराच करावं , एखाद्याच्या प्रगतीच, एखाद्याच्या निखळ आणि नितांत सुंदर भावनांचं कौतुक करावं! एखाद्याने केलेल्या पाककृतींचे कौतुक कराव, एखाद्याच्या अंगी असलेल्या छंदाच कौतुक करावं, तर प्रत्येकातील चांगलं काय? हे शोधून आणि ओळखून त्याच कौतुक करावं!
एखाद्याचा किरकोळ दोष सोडून देऊन, त्याकडे दुर्लक्ष करून त्या व्यक्तीला न तोडता, तिच्या गुणांना जर आपुलकीच्या शब्दांनी कौतुकाच प्रेम दिल तर नक्कीच अवगुणही लयास जाऊ शकतील !
कौतुक मारून मुटकून करता येत नसत. ते आतूनच करता येण म्हणजेच दुसऱ्यांच्या भावना जपण एकमेकांना आदर व आधार देण भावना न दुखावणार व माणुसकी जपणार, अस म्हणता येईल. खूप अवास्तव कौतुक करण्यापेक्षा एका शब्दाच झालेलं कौतुक, शाबासकी व पुढील वाटचालीस प्रेरणा दायी ठरेल अस असाव! आपला एखादा कौतुकाचा आणि योग्य मार्गदर्शनाचा शब्द कित्येकांचे यशाचे आलेख उंचावू शकतो.
कौतुक करताना ती अतिशयोक्ती आहे असं वाटू नये…वरवर कौतुक करणारेही कळतात आणि तोंड देखल करणारे ही कळतात….
जे चांगलं आणि कौतुक करण्यायोग्य असत, त्याच कौतुक करायला पैसे पडत नसतात. समोरच्याची बुद्धिमत्ता, हुशारी, चांगुलपणा, ह्याच कौतुक करायलाही खर तर मन मोठं असावं लागतं….ते सर्वानाच जमत नाही. मी का म्हणून? हा ‘मी’ जो आहे तोच खरा नाशक असतो आपल्या प्रगतीचा आणि भावी आयुष्याचाही!
आणि दुसर एक… मत्सर! एक मोठा भयावह दंश!हा दंश ज्यांना झालेला असतो त्यांचा तर विचारच सोडून द्यावा….
मन साफ आणि निर्मळ असावं! कायमच … म्हणचे भाव स्वभाव होऊन जातो!
दुसर्यांना चांगलं द्यावं ,माफ करावं, दुसऱ्यांकडून शिकाव, दुसऱ्यांचे चांगलं चिंताव! दुसऱ्यांच्या आनंदात जे खरोखर आनंदी होतात ते खरच मनापासून कौतूक करत असतात, आणि दुसऱ्याच्या कौतुकास ही पात्र होतात!
© सुश्री अश्विनी कुलकर्णी
सांगली
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
सुस्वागतम् आणि अभिनंदन