☆ इंद्रधनुष्य : शेवटचा दिवस…. ☆ श्री अरविंद लिमये ☆
खूप वर्षांपूर्वी मी युनियन बँकेच्या सांगली शाखेत मॅनेजर होतो तेव्हा ‘मधू कांबळे’माझा स्टाफ मेंबर होता.जवळजवळ चार वर्षे आम्ही एकत्र काम केलेलं.ती जवळीक होतीच.पुढे खूप वर्षं उलटून गेल्यानंतर त्याची अचानक भेट झाली ,तो नुकताच रिटायर झाल्यावर आमच्या ‘युनियन बॅंक निवृत्तकर्मचारी संघटनेचा मेंबर झाला तेव्हा..!त्या मिटींगमधे गुलाबपुष्प देऊन माझ्या हस्तेच त्याचं स्वागत झालं होतं.मिटींग नंतरच्या चहापान कार्यक्रमात तो मुद्दाम माझ्या जवळ येऊन खूप मोकळेपणाने भरभरून बोलला.जुन्या आठवणींची उजळणी झाली.निघायची वेळ झाली तेव्हा मुद्दाम माझा पत्ता/मोबाईल नोट करून घेतलान् .’लेकीचं लग्न ठरलंय.ते झालं की मी खर्या अर्थाने रिटायर झालो म्हणायचं.पत्रिका छापून आल्या की घरी येऊन आमंत्रण देणाराय..’ म्हणाला आणि गेला.गेलाच.
अगदी अचानक.. अनपेक्षित..! लग्नाच्या तयारीची धावपळ… उत्साहाच्या भरात तब्येतीकडे झालेलं दुर्लक्ष..अचानक आलेला लो बीपीचा अटॅक..आणि त्याचं त्याच अवस्थेत जागच्याजागी कोसळणं.. ऐकून मला धक्काच बसला.लेकीच्या लग्नाची तारीख हाकेच्या अंतरावर आलेली..त्याच्यासकट सगळेच लगीनघाईत..घरातलं कामांच्या प्रचंड दडपणातलं आनंदी वातावरण…आणि…अचानक ध्यानीमनी नसताना हा घरचा कर्ताच अचानक गेला..! संपूर्ण घरावर शोककळा पसरली.आम्ही संघटनेचे प्रतिनिधी घरी सांत्वनाला जाऊन आलो.ते आवश्यकही होतंच.दिवसकार्य आवरलं. ठरल्याप्रमाणे संघटनेचे कार्यकर्ते फॅमिली पेन्शनसंबंधीचे फाॅर्म्स घेऊन मधूच्या घरी गेले. ते परतले ते भलंमोठ्ठं प्रश्नचिन्ह सोबत घेऊन…! घरचे सगळे आर्थिक व्यवहार मधूच्या पहात असे. त्याचे आर्थिक व्यवहार,गुंतवणूकी, नियोजन याबद्दल घरी कुणालाच काहीच माहीत नव्हतं.आपलं अचानक कांही बरंवाईट होईल असं त्याला वाटलं नसणार पण ते तसं झाल्यामुळे एक विचित्र त्रांगडं निर्माण झालं होतं एवढं मात्र खरं..!त्यातूनही मार्ग काढावा म्हंटलं पण घरच्यांना भरपूर शोध घेऊनही आर्थिक व्यवहाराच्या नोंदी वा कागदपत्रे कांहीच सापडलं नाही. बॅऺकेतल्या ठेवी, नाॅमिनेशन्स, म्युच्युअल फंड, शेअर्स, टॅक्स सेव्हिंग इनव्हेस्टमेंटस् सगळंच अधांतरी..! मुलीचं लग्न पुढं ढकललं असलं तरी जवळचाच मुहूर्त पाहून ते साधेपणानं का होईना लगेच करुन द्यायचं होतंच. पुढे खूप दिवसांनी संदर्भ शोधत हळूहळू सगळं मार्गी लागलं, तरी तोवर लग्न अक्षरश: कसंतरी उरकावं लागलं आणि त्यासाठी घ्याव्या लागलेल्या पैशांच्या सोंगासाठी नातेवाईकांनी केलेल्या तात्पुरत्या मदतीचं मिंधेपण आलं ते वेगळंच.
‘मृत्यू अटळ आहे’ हे सर्वज्ञात व सर्वमान्य सत्य! पण आपण ते स्वत:च्या बाबतीत सहजपणे गृहितच धरलेलं नसतं. ‘जेव्हाचं तेव्हा पाहू’ हीच काहीशी बेफिकीर वृत्ती असते बर्याचदा.पण जेव्हाचं तेव्हा पहायला आपण नसणार आहोत हेच नेमकं लक्षात घेतलं जातं नाही. या सगळ्यांची विलक्षण बोचरी जाणीव मला झाली, त्याला मधू कांबळे असा निमित्त झाला.
खरंतर या किती साध्या गोष्टी.तरीही तितक्याच महत्वाच्या.पण मला तरी ते महत्त्व मधू कांबळे गेल्यावर त्याच्या घरच्यांची ससेहोलपट होईपर्यंत कुठे जाणवलं होतं? आपण तरी आपली बायको, मुलगा, सून याना आपण मनोमन केलेल्या नियोजनाबद्दल सविस्तर कुठं काय सांगितलंय? सांगणं राहू दे, पण एकत्रित नोंद करुन तरी ठेवलंय का?हे विचार मनात आले आणि मी हादरलोच. आपण हे करायला हवं. करायलाच हवं..!
‘शेवटचा दिस’ यायचा तेव्हाच येणाराय. पण तो येणाराय कदाचित असाच. अचानक. न सांगता. शेवटचा दिस गोड व्हावाच पण तो आपल्यापुरताच नव्हे. आपल्यामागे आपल्या माणसांसाठीही. याकरता योग्य ते नियोजन प्रत्येकाने करायला मात्र हवं.
चारसहा दिवसांच्या प्रवासाची तयारीही आपण अगदी आधीपासून नियोजनपूर्वक करत असतो.मग न परतीच्या प्रवासासाठीची बांधाबांध काळजी पूर्वक करायला नको?त्या प्रवासाला जाताना आपण जे बरोबर नेणार आहोत त्या आपल्या कर्मांचं दस्तावेजीकरण परस्पर झालेलंच असतं. पण आपण आपल्या माणसांसाठी जे मागे ठेवणार आहोत त्याचे दस्तावेजीकरण आपणच निगुतीने नियोजनपूर्वक करायला हवंच. नाही का ?
© श्री अरविंद लिमये
सांगली
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
विचार करायला लावणारा लेख.
आपल्या साहित्य चे स्वागत आहे.