श्री अमोल अनंत केळकर

संक्षिप परिचय 

मुळगाव : सांगली

सध्याचे ठिकाण: नवी मुंबई,  बेलापूर

नोकरी: स्टिल कंपनीत एक्पोर्ट म‌ॅनेजर

विडंबन, ललित लेखन, प्रासंगिक चारोळ्या लेखनाची  आवड

‘देवा तुझ्या द्वारी आलो’ (www.kelkaramol.blogspot.com), ‘माझे ‘टुकार ई-चार’ (www.poetrymazi.blogspot.com) या दोन अनुदिनीवर ( ब्लाॅग) नियमित लेखन

जोतिष शास्त्र अभ्यास

☆  विविधा : इकडचे – तिकडचे “ज्ञानविस्तार” – श्री अमोल अनंत केळकर

 

‘जगी सर्व ज्ञानी असा कोण आहे

विचारे इकडे, तिकडे शोधुनी पाहे’

खरं म्हणजे  मंडळी हा विषय तसा काही नवीन नाही . पण जरा वेगळ्या पध्द्तीने मांडतोय एवढंच.

आता तुम्हाला हे माहीतच आहे की पारंपारिक शिक्षण आपले हे  शिशु ( सुसु )वर्गापासून सुरु होऊन पुढे  लौकिकार्थाने पदवीपर्यंत पूर्ण होते. ज्याला आपण पाठयपुस्तकी शिक्षण म्हणू. जे आपण बाल मंदिर, शाळा , महाविद्यालये इथून पूर्ण करतो. या सगळ्या संस्थेचे ध्येय एकच असते

चिरा चिरा हा घडवावा , कळस कीर्तीचा चढवावा

अज्ञानी तो पढवावा, थेंब आम्ही तर सागर हे

सत्य शिवाहुन सुंदर हे

वेगवेगळ्या टप्प्यात आपण हे शिक्षण घेत असताना आपले मार्गही बदलतात जसे मराठी मिडीयम , इंग्रजी मिडीयम  हिंदी -संस्कृत  किंवा पुढे कला -विज्ञान- वाणिज्य , मग त्याहीपुढे इंजिनिअरींग, वैद्यकीय, व्यवस्थापन  किंवा अशा अनेक वाटा .

एक मार्ग स्वीकारल्यावर शेवटच्या ठरलेले स्टेशन आले की  प्रवास संपला पाहिजे पण असे होत नाही. बघा ना, रेल्वे बजेट मध्ये गेली काही वर्ष  अमुक गाडयांचा मार्ग विस्तारीत केला आहे असे आपण वाचतो. म्हणजे एखादी गाडी मिरजेपर्यतच जाते  पण आता ती बेळगाव पर्यत जाईल  हा झाला  त्या गाडीचा विस्तार . ज्ञान घेण्याबाबतीत तसा  विस्तार आपण ही करतो मग तो आपल्या आपल्या नोकरी/व्यवसायास/प्रोफेशनला पूरक म्हणून असेल   किंवा निव्वळ  आवड छंद म्हणून असेल

‘अपारंपारिक शिक्षण’ किंवा ‘ज्ञान – विस्ताराची’ सुरुवात तशी लहानपणापासून नकळत झालेलीच  असते. आई – बाबा हे आपले पहिले गुरु . नियमित अभ्यासक्रमात नसलेल्या अनेक गोष्टी (संस्कार/आचरण इ इ) शिकवायला त्यांनी सुरवात केलेली असते . नंतर येतात ते आपले शाळेतील , आजूबाजूचे सवंगडी

मग हळूहळू आपली ओळख होते  पेपर , रेडिओ , दूरदर्शन (टीव्ही) या माध्यमांची. ज्ञान विस्ताराच्या या मार्गात  वयाच्या एका टप्प्यावर आपला संबंध वाचनालयाशी येतो .  इथेही अनेक गोष्टी कळतात, आपल्या ज्ञानाचे क्षेत्र विस्तारते. पुढे संगणक शिक्षण झाल्यावर वेगवेगळी संकेतस्थळे   आपले ज्ञान विस्ताराचे मार्ग बनतात आणि आज काल तर सोशल – मीडिया ( त्यातही फेसबुक , व्हाटसप )  हा तर ज्ञान विस्ताराचा जणू एक्स्प्रेस हायवेच झालाय. आता यात येणा-या किती गोष्टी ख-या असतात , अफवा असतात  किंवा दिलेले संदर्भ किती बरोबर – चूक असतात  हे ओळखणे ही एक ‘ कलाच ‘ आहे.  यात उतरलेल्यांना कले, कले ने ते समजत जातेही पण  सध्यातरी ज्ञान – विस्ताराचा हा ‘ राज ‘ मार्ग ठरला आहे यात शंका नाही

यात ही दोन प्रकार आहेत बरं  का. जस शाळेत आपण मुलांचे वर्गीकरण मिळणा-या गुणांनुसार  प्रामुख्याने दोन प्रकारे करतो १) हुशार २ ) मध्यम ( इथे ‘ ढ ‘ वगैरे प्रकार मला मान्य नाही )  तर  व्हायचं काय की  मुख्यतः दहावी बोर्डाच्या परीक्षेत वगैरे   एका ‘ मध्यम’ मुलाकडे  एखाद्या विषयाचे  दुसरे पुस्तक असायचे , किंवा काही तरी त्याला पुण्या-मुंबई कडच्या नातेवाईकांकडून  काही नोट्स वगैरे मिळायचे. ही बातमी  हळूहळू सगळीकडे जायची. ज्याच्याकडे त्या नोट्स किंवा काही वेगळे पुस्तक असायचे त्याबद्दल त्याला काही फार वाटायचे नाही . पण जी हुशार मुले असायची त्यांची मात्र  प्रचंड घालमेल व्हायची. अरे आपल्याकडे कसं नाही, काय असेल त्यात ? कसेही करून ते आपल्याला पाहिजे  इ इ मग ते पुस्तक / नोट्स त्या ‘मध्यम’ मुलाकडून मिळवल्या जायच्या. तो ही सहज द्यायचा , त्याला काही वाटायचे नाही. त्याच्यासाठी सामान्य अभ्यासक्रमच खूप असल्याने हे अतिरिक्त पुस्तक वाचले काय नाही वाचले काय फारसा फरक पडायचा नाही. तो आपलं सगळ्यांना देत रहायचा

आज हीच ‘ मध्यम ‘  मुले सोशल मीडियावर आपल्याकडे आलेले ज्ञान पुढे ढकलतात आणि हुश्शार मुले त्यावर अभ्यासाचा ‘ किस ‘ पाडतात ?

माफ करा थोडं विषयांतर झालं . पण मंडळी लहाणपणापासून  सुरु असलेली  ‘ ज्ञान – विस्ताराची  ‘  माणसाची उर्मी कायम राहील यात शंका नाही. पण यातही   पारंपारिक शिक्षणाबरोबरच अपारंपारिक शिक्षण असलेले

‘व्यवहार ज्ञान’  घेणे हे ही महत्वाचे नाही का ?

एखादवेळी गणितात थोडे कच्चे असले तरी चालेल पण माणसाने शब्दाला पक्के पाहिजे. हे

‘व्यवहार ज्ञान’ एकदा आत्मसात झाले की भले अक्षांश – रेखांशांच्या परिणामात गडबड झाली तरी  तुमचा जगण्याचा आलेख ( ग्राफ ) हा वर जाणाराच असेल यात शंका नाही  ?

चला मंडळी आवरत घेतो.

इधर चला में , उधर चला , जाने कहाॅ में किधर चला

वेळ झाली आहे आता जरा दुसरी कडे जाऊन तिथे आलेले

‘ज्ञानरूपी मोती’   ओजळीत गोळा करून इतरत्र देण्याची.

मज पामरासी काय थोरपण

पायींची वाहणं पायी बरी |

ज्ञानियांचा राजा गुरु महाराव

म्हणती द्यानदेव तुम्हा ऐसें ||

???

( अ-ज्ञानी ) अमोल

१३/०६/२०२०

 

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुहास रघुनाथ पंडित सांगली

वेगळी दृष्टी वेगळा लेख.
विचार ‘अमोल’ आहेत.
??????????????