☆ कवितेचा उत्सव : नाती ☆ कवी आनंदहरी ☆
शाळेमधली कुणी तेव्हाची, अवचित समोर येते
क्षणभर मग ती मना आपुल्या शाळेत घेऊन जाते
नाही बोलणे, नाही भेटणे, दुरून पाहणे होते
पाहणे तरी थेट कोठले ,नजर चोरणे होते
क्षणभर थबकून, ओळखून ती पहिल्यांदाच हसते
विचारीते ती काही काही तरी, वाटे प्रश्न हे नस्तेे
बोलावे तिने अजून वाटता, साद तिला ती येते
बोलवूनी त्यां, जवळत त्यांसी, ओळख करुनी देते
उगाच तेंव्हा, मनात आपुल्या टोचून जातो काटा
हात पतीचा धरुनी हाती, करूनी जाते ‘ टाटा ‘
आठवणी त्या फ़क्त आपुल्या, काही तिच्या न गावी
तरीही वाटते पुन्हा पुन्हा ती अजुनी भेटत रहावी
काळजातला हळवा कोपरा.. अजुनी तसाच असतो
वेडेपणा हा आपुल्या मनीचा,आपणां हळूच हसतो
परतुनीया ती जाते तरीही, हुरहुरते उगीच उरात
आठवणी त्या जपूनी ठेवीतो काळजातल्या घरात
राहवत नाही, पत्नीस सांगतो ,” ती भेटली होती “
हसुनी म्हणे ती ,’ शाळेमधली अशीच असती नाती’
© कवी आनंदहरी
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
वाह!! पहिलं अबोध प्रेम!!! अतिसुंदर!!!