☆ इंद्रधनुष्य : सुखाचा मंत्र… ☆ सौ. राजलक्ष्मी देशपांडे ☆
अंगणात एक छानसा पक्षी आला होता. मी पक्ष्यांसाठी ठेवलेल्या पाण्याच्या कुंड्यात त्यानं चक्क आंघोळ उरकली. शेजारी ठेवलेले दाणे खाल्ले. पाणी प्यायला. थोडावेळ नाचला..चिवचिवला..उडून गेला. माझी सकाळ प्रसन्न झाली.मी पुन्हा कामाला लागले.
मनात सहज विचार आला..सुंदरच होता तो पक्षी. आवाजही गोड. पण ना मी त्याला पिंजऱ्यात ठेवलं, ना त्यानं माझ्याचकडे राहावं असा हट्ट धरला. ना त्यानं मी ठेवलेल्या दाण्यापाण्याबद्दल आभार मानले. खरं तर तो त्याच्या त्याच्या जगात स्वतंत्र जगत होता. योगायोगानं माझ्या अंगणात आला काही क्षण राहिला आणि उडून गेला. मला त्याच्या सहवासात आनंद झाला कारण मला त्याला बांधून ठेवायचं नव्हतं. त्याच्याकडून कसलीच अपेक्षा नव्हती माझी. मुळात मी त्याच्यात गुंतले नव्हते.
माणसांच्या बाबतीतही असाच विचार केला तर…म्हणजे अगदीच न गुंतणं शक्य नाही. विशेषत: जवळच्या नात्यात गुंततोच आपण. पण हे गुंततानाही थोडं भान ठेवलं, की हा माणूस एक स्वतंत्र जीव आहे आणि तो त्याचं आयुष्य जगायला या जगात आला आहे.आपण त्याला देऊ केलेल्या ऐहिक वस्तू(दाणा पाणी) प्रेम, संस्कार, विचार, मैत्री, मदत हे सगळं आपण आपल्या आनंदासाठी त्याला दिलं. आता ते घेऊन त्यानं उडून जायचं की आपल्या अंगणात खेळत राहायचं हा त्यांचा प्रश्न आहे ना…या सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त करून दखल घ्यायची की नाही हा त्याचा प्रश्र्न आहे. आपल्याला त्याच्या सहवासाचा जो आनंद मिळाला, आपले काही क्षण आनंदात गेले, तेच पुरेसं नाही का?गीतेत भगवंतांनी अनपेक्ष असलेला भक्त मला आवडतो असं म्हटलंय. यालाच निष्काम कर्मयोग म्हणत असतील. अल्बर्ट एलिस सारखा मानसशास्त्रज्ञ सांगतात, की कुणीतरी मला चांगलं म्हणावं ही अपेक्षाच चुकीची आहे. मी सुखी होणार की नाही, हे दुसऱ्यानं माझ्याशी कसं वागावं यावर अवलंबून असेल तर आपण कधीच सुखी होणार नाही.
मग मला साहीरच्या ओळी आठवल्या…
“जो भी जितना साथ दे एहसान है…”
मी त्या बदलून मनातच अशाही केल्या,
“जो भी जैसा साथ दे, एहसान है…”
आणि सुखाचा एक मंत्र मला सापडला.
© सौ. राजलक्ष्मी देशपांडे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
खूप छान आणि मार्मिक लेख.
सुंदर रचना
अगदी खरंय!!!