सौ. मानसी काणे
संक्षिप्त परिचय
शिक्षण – एम ए.
दूरसंचारमधे ३० वर्षे नोकरी. अनेक मासिकात कथा लेखन. अनुवाद. वर्तमानपत्रात सदर लेखन.
☆ विविधा ☆ मी मला भेटले ☆ सौ. मानसी काणे ☆
आयुष्याच्या भर मध्यान्हीत मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. कितीही विचारपूर्वक घेतलेला निर्णय असला तरी एकदम आलेल रिकामपण अंगावर आल. मुल मार्गी लागलेली. घरापासून दूर रहाणारी,नवरा नोकरीत आणि मी अशी एकटी रिकामी घरात. मग घरात साफसफाई कर,पंखे पूस,खिडययांच्या जाळया साफ कर अशी सटरफटर काम काढली. वाचून वाचून वाचणार तरी किती? कथाकीर्तन आणि अध्यात्माचा ओढा मला कधीच नव्हता. सामाजिक कार्यात झोकून देण्याची वृत्ती नव्हती. मी ऐहिक सुखात रमणारी साधी बाई. मग करायच तरी काय? अशाच एका संध्याकाळी मावळतीच्या सोनेरी किरणासारखी ती मला भेटली. रिकामपण अंगावर घेऊन संथ बसलेल्या मला तिन हलवून जाग केल. म्हणाली,‘‘काय ग,चांगली आनंदी असायचीस की नेहमी. मग आता का अशी सैरभैर झालीस? चल ऊठ. शिवणकाम,भरतकाम किती सुंदर करायचीस. मला नातू झाला आहे. नव्यान सुरुवात कर छान झबली टोपडी शिवायला. भरतकाम करून दुपटी शीव. पॅचवर्क कर. आणि लिहायच का बंद केलस ग? किती छान लिहायचीस तू कॅालेजमधे,ऑफिसच्या मॅगझिनमधे. कधी पेपरमधे. अस कर एक कथाच लिहून टाक झकासपैकी किंवा प्रवासवर्णन लिही आणि दे दिवाळी अंकात आणि इतर मासिकात पाठवून. दारात मस्त रांगोळी काढचांगली मोराची काढ. तुझी स्पेशालिटी होती ती. पानफुल आणि विविध प्रकारचे मोर. प्रत्येक मैत्रीणीच्या वाढदिवसाला छानशी पर्स किंवा पिशवी द्यायचीस भेट म्हणून स्वत: शिवलेली. त्यावर नाजुक मोर भरलेला असायचा. कुठ गेल ग ते सगळ? आणि पेंटिंग करायच का सोडलस?. ’’तुझ्या जुन्या घरातल्या बिंतींवर किती छान वेलबुट्टी काढलेली होती. आणि इथ साध स्वस्तीक नाही?
‘‘अग हो, हो किती बोलशील धबधब्यासारखी? कशी देवासारखी भेटलीस बघ. मी हे सगळ विसरुनच गेले होते. ’’मी म्हणाले. ‘‘हे भेटीचे क्षण घट्ट पकडून ठेवायचे. आनंदी रहायच अन आनंद वाटायचा विसरू नकोस. विनोदी बोलून सर्वाना हसवणे हे तर तुझ शस्त्र होत. ते नको म्यान करूस. बर निघू मी? उशीर झाला. ’’आली तशी वार्याच्या झुळुकीसारखी ती निघून गेली. तिन सांगितलेल सगळच तर माझ्याकड होत. मग मी हा मिळालेला वेळ का बर वाया घालवते आहे. मी झडझडून उठले. सुई , दोरा, रेशीम, कापड सगळ जमवल. शिवणाच मशीन स्वच्छ करून त्याला तेलपाणी केल आणि सुरु केल दणययात काम. सुंदर झबली टोपडी शिवली. जरीच्या कुंचीला मोती लावले. दुपट्यावर इटुकली पिटुकली कार्टून पॅच केली. वेगवेगळ्या रंगांचे तुकडे जोडून मऊमऊ गोधडी शिवली. एक मस्त पिशवी शिवली. हे सगळ पहात असताना मला हे कपडे घालून दुडदुडणार गोंडस बाळ दिसू लागल.
मी हातात पेन घेतल आणि सुरू केल लिहायला. मनातल्या भावना शब्दरूप घेऊन झरझर कागदावर उतरू लागल्या. काय लिहू आणि किती लिहू अस मला झाल. सकाळी रांगोळी हातात घेतली आणि तुळशीसमोर एक मोर पिसारा फुलवून उभा राहिला. माझ्या मनात नाचू लागला. आता मला वेळ पुरेना. इतकी आनंदात तर मी यापूर्वीही नव्हते. मला अचानक भेटलेली कोण ही जादुगारीण? माझच आस्तित्व मला पुन्हा मिळवून देणारी कोण होती बर ती? आणि एका क्षणी मला लख्ख समजल की ती दुसरी तिसरी कोणी नसून माझ्या आतली मीच होते. माझे माझ्याशीच ऋणानुबंध जुळले होते. जिवाशिवाची भेट झाली होती. ‘‘भेटीत तुष्टता मोठी’’ हे अगदी खर होत. मी नव्यान आनंदाला सामोरी जात होते. आनंद लुटत होते. नव्यान स्वत:ला भेटत होते.
© सौ. मानसी काणे
≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
खूप छान ओळख.
प्रत्येकीने अशी माझ्यातली मी शोधायालाच हावी खूपच छान ताई