☆ जीवनरंग ☆ लोककथा – मुकणा मोर ☆ डॉ. मंजुषा देशपांडे 

 

खूप वर्षांपूर्वी गोंडवनात अगदी चिमण्यासारखे मोर असत त्यावेळची गोष्ट आहे ही.  त्या राज्यात मोराला खूपच महत्व होते.  राजाच्या किरीटावर चक्राकार मोरपिसे असत. राणीच्या किरीटावर पाच आणि अंबाड्यावरच्या सुवर्ण फूलावरही 2 मोरपिसे असत.  राजवाड्यातील जवळ जवळ सर्व दागिने मोरपिसांच्या घडणीचे बनवले जात. राजमुद्रेवरही मोराचे चिन्ह होते.  राजवाड्यात सगळीकडे मोराच्या विविध छटांची चित्रे चितारलेली असत.

त्या वाड्यात शंभर सव्वाशे लफ्फेदार पिसा-यांचे मोर  आणि त्यांच्या लांडोरी इकडून तिकडे सतत बागडत असत. राजवाड्यापासून दोन कोस दूरच्या जंगलातल्या टेकडीवर एक पठार होते.

ती होती मोरनाची! प्रत्येक वर्षी ‘शरद,चैत्र आणि वैशाख पौर्णिमेच्या रात्री  पिसारा झूलवत त्या जंगलातले सगळे मोर आणि मोरणी तिथे जात आणि रात्रभर स्वर्गीय नर्तन होई. दुसर्‍या दिवशी तिथे मोरपिसांचा नुसता सडा पडे.

वास्तविक मोर सोडून दुसर्‍या प्राण्यांना त्या पौर्णिमेच्या दिवशी मोरनाचीवर जायची मुभा नव्हती.  माणसे सोडून इतर सर्व प्राणी हा नियम कसोशीने पाळत.

राजा आणि त्याची माणसे मात्र पौर्णिमेच्या संध्याकाळी टेकडीवरच्या उंच झाडांवर चढून बसत आणि त्या सोहळ्याची मजा लुटत.

त्या मोरांचा एक राजा होता.  त्याला या प्रकाराचा खूपच राग येई.  पण करणार काय! त्याने एकदा राजाला एकटे गाठून सांगितले,  “चोरून मोरनाची पहाणा-यांच्या घरात मुकणा मोर जन्माला येतो”

” मुकणा मोर म्हणजे”? राजाने विचारले

“वयात आल्यावरही ज्याला पिसारा फुटू शकत नाही असा मोर”,  मोराने सांगितले. राजाला नीटसे कळले नाही पण राणीला कळले. तिला खूप भीती वाटली.  तिचे होणारे मूल तसे जन्माला आले तर… राजाने सारेच हसण्यावारी नेले.

राणी मनात झुरू लागली. ‘ मला मुलगी होऊ दे’,   म्हणून मनोमन प्रार्थना करायला लागली.  खरे तर राज्याला चांगला  वारस मिळावा म्हणून तिने किती व्रतवैकल्ये केली होती. ती लवकरच फळाला येणार होती.

त्या दिवशीही शरद पौर्णिमा होती.  राजा आणि त्याचे मित्रमंडळ शिकारीसाठी जंगलात गेले होते. राणीला खूप अस्वस्थ वाटत होते. ती आणि तिच्या सख्या पुनव पूजेसाठी त्यांच्या देवीच्या मंदिरात जाणार होत्या. पूजा झाल्यावर जेवण आणि त्यानंतर नाचाचे फेरे.

राणी पूजा करुन परत येणार होती. खरे तर तिचे दिवस भरत आले होते पण पूजा झाली नाही तर.. तो अपशकून मानला जाई. त्यामुळे ती जड पावले  टाकत कशीबशी मंदिरात पोचली. तिने देवीची पूजा केली. ‘जन्मणारे मूल चांगले निपजू दे.’  त्याचा वंश वाढू दे!,  म्हणून डोळ्यात पाणी आणून तिने देवीकडे प्रार्थना केली.

देवळातच तिच्या पोटातून कळा येऊ लागल्या.  सख्यांनी लगबग करून सगळी व्यवस्था केली आणि राणीने एका देखण्या राजपुत्राला जन्म  दिला.

राज्यभर गूळाच्या बट्टया वाटण्यात आल्या. राजाने चहुबाजूंना सैनिक पाठवून जंगलात अस्वलाने तयार त्याच्या बाळंतीण अस्वलीसाठी तयार केलेले लाडू शोधून आणायला पाठवले.

हे लाडू फारच पौष्टिक असतात असे म्हणतात.   मोहाची फूले,  बाभळीचा डिंक, चारोळ्या आणि मध घालून ओबडधोबड बांधलेले लाडू जर कोण्या आईने खाल्ले  तर आई आणि बाळ दोन्ही टणटणीत व्हायलाच पाहिजे… रोज राणीपुढे त्या लाडवांचा ढीग पडायला लागला.

बाळ खरंच सुदृढ झालं आणि बापासारखं शूरही व्हायला लागलं.  राणीला मात्र काही खटकत होतं… कारण तिचं बाळंतपण करणा-या एका म्हातारीने तिला मुद्दाम वाड्यात येऊन. ‘राजपुत्र मुकणा मोर असणार आहे’, असे नुकतेच सांगितले होते. राजपुत्र खरे तर फक्त आठ वर्षांचा होता आणि राणीची कूस त्यानंतर काही भरली नव्हती.

राणीने देवीची रोज पूजा घालायचे ठरवले.  रोज पहाटे जंगलात फिरून सुंदर आणि सुवासिक फूले आणून संध्याकाळी देवीची सालंकृत पूजा बांधे आणि दिवसभर काही न खाता संध्याकाळी थोडा कुटकीचा भात खाऊन उपास सोडी.

हळुहळू राजाच्याही लक्षात यायला लागले . आता दोघे मिळून ती पूजा करत. काही वर्षे गेली.  राजपुत्र 13 वर्षांचा झाला. त्याच्यासारखा तिरंदाज दुसरा कुणी नव्हता. त्याची भाला फेक तर भल्याभल्यांना अचंबित करे.

मुलगा आईबापांच्या आज्ञेतही होता. पण राजा राणी मात्र झूरत होती.

एका दिवशी पूजेनंतर राजा राणी विमनस्कपणे बसले होते कारण राजपुत्र आता लवकरच 15 वर्षांचा होणार होता.  मोठा समारोह करायचा होता प्रथेप्रमाणे त्यानंतर राजपुत्र वर्षभर जंगलात राहून परत आला की त्याला युवराज अभिषेक व्हायचा होता आणि त्यानंतर वीस वर्षांच्या आत त्याचे लग्न करुन देणे भाग होते. एकमेकांशी काहीही न बोलता दोघेही हाच विचार करत होते. अचानक देवीच्या गाभा-यातून एक म्हातारी आजी बाहेर आली.  तिने राणीला सांगितले,  “सलग पाच  दिवस, मुकण्या मोराचे मांस मोराला खायला घाल.” सगळं मार्गाला लागेल.

जंगलात मुकण्या मोराला शोधणे सोपे नव्हते. कारण  त्या मोरांना मोरनाचीत प्रवेश नसतो त्यामुळे ते  पौर्णिमेचा तो मयूर क्रीडेचा सोहळा,  एखाद्या उंच झाडावर बसून टिपे गाळत पाहतात.

राजाने किंवा कुणीच असला मोर कधी पाहिला नव्हता.

पुन्हा मयूर राजा मदतीला आला.  तो म्हणाला..”मुकण्याला पिसारा नसला आणि त्याला पिल्ले द्यायची क्षमता नसली तरी तो अतिशय चिडलेला असतो  आणि तो मोरांमध्ये सर्वात बलवान असतो.  तो दहा नागांशी एकटा लढेल आणि जिंकेल.  ”  आपल्या जवळपास कुठे मुकणा मोर नाही पण सात टेकड्या ओलांडून पलिकडच्या जंगलात तो रहातो.”

राजा म्हणाला,  ” तुला कसे माहीत?

मोर म्हणाला, ” मागच्या जन्मी मी माणूस असताना मी टेकडीवरच्या झाडांवर चढून मोरनाचीवरचा पौर्णिमेचा सोहळा पहात असताना,  झाडावरून पडून मृत्यू पावलो होतो.

“खरेतर मीच मुकणा व्हायचो पण कसलासा डिंक आणि मखमलीचे किडे खाऊन मला पिसारा आला पण माझ्या पहिल्याच अंड्यातून मुकणा मोर निपजला पण त्यानं निसर्गाच्या विरूध्द जायचं नाकारलं आणि तो दूर जंगलात निघून गेला.”  मोर हुंदके देऊन रडू लागला.  राजा राणीच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. ही कहाणी ऐकत मागे उभा असलेला राजपुत्र म्हणाला, ” मीही मुकणाच आहे ना,  मग त्या मोराच्या संगतीने मी त्याच्या जंगलात राहीन” मला राज्याचा लोभ नाही.  असे म्हणून तो कुणाचेही काही न ऐकता उजाडायच्या आत जंगलात निघून गेला.

राजानेही  पुन्हा कधी मोरनाची पाहिली नाही.

यथावकाश राणीला दुसरा मुलगा झाला आणि तो राजा बनला.

इकडे राजपुत्र मुकण्या मोराला भेटला आणि त्यांनी मुकण्यांची मोरनाची सुरू केली.  वास्तविक मोरनाचीचा एक उद्देश मोराचे प्रजनन असा असतो पण मुकण्यांच्या मोरनाचीत केवळ क्रीडा आणि निखळ आनंद असतो.

अजूनही नवेगावच्या जंगलातल्या एका टेकडीवर ‘मुकण्यांची मोरनाची’ आहे.  दरवर्षी वैशाख पौर्णिमेला पंचक्रोशीतले मुकणे मोर आणि मुकणे पुरुष तिथे जमा होतात आणि पुढचे चार दिवस मोठी धूम असते.

©  डॉ. मंजुषा देशपांडे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments