☆ जीवनरंग ☆ सौभाग्य ☆ सौ अंजली गोखले ☆
माया आणि मृणाल शाळेपासून च्या पट्ट मैत्रिणी. आज मायाने मृणालला मुद्दाम जेवायला घरी बोलावले होते. मृणालच्या आयुष्यातले वादळ जरा कुठे निवायला लागले होते. आपली गाडी पार्क करून मृणाल आली. मायाने हसून स्वागत केले. पूर्वीसारखी हसरी, उत्साही मृणाल मलूल वाटली स्वाभाविक च होते.
जेवताना बालपणीच्या, शाळा – कॉलेजच्या सगळ्या आठवणीची उजळणी झाली. हसत चिडवत रम्य काळात रमतगमत अंगतपंगत छान रमली. जेवण झाल्यावर पुनः गप्पा रंगल्या. मायाने मृणालला हळूच विचारले,” मृणाल, आता पुढे काय करायचे ठरवते आहेस?” मृणालने चमकून पहात विचारले,.” अग काय ठरवू? सगळे छान आहे ना? नितीनला जग सोडून जावे लागले तरीतो कायम माझ्या हृदयात आहे. अग आमचा फ्लॅट. गाडी सगळे त्याचेच आहे. मीवापरते, उपभोगते. मी दुसरा कोणताही विचार करूच शकत नाही. तुला काय म्हणायचय ते कळलं मला. पण तो आहेच ग अजूनही माझ्यासाठी. हे सगळे सौभाग्य त्याच्याच मुळे तर आहे. एक सांगते पुढे काय करायचे ते मात्र मी पक्कं ठरवलय.मी एक लहान मुलगा आणि मुलगी दत्तक घ्यायचं ठरवलय.म्हणजे माझ्या सासुबाई माझ्याकडे रहायला येतील तो किती पोळलेला जीव आहे. दोपींच्याही जीवनात हिरवळ फुलेल. मुलांच्या रुपात फुलांचा सुगंध आणि आनंद ब हरे ल”
माया पटकन उठून तिच्या जवळ गेली. तिचा हात हातात घेऊन म्हणाली,” खरच ग, तुझ्याकडे पाहूनच नितीनचे अस्तित्व जाणवते. या मुलांमुळे खरच तुझ्या आयुष्यात बाग फुलेल. मस्त निर्णय आहे तुझा. चल, हा आनंद व्दिगुणित करुया. मी तुझी ओटी भरणार आहे. तुझे हे नवीन सौभाग्य तुला खूप आनंद आणि समाधान देईल”. दोघीजणी आनंदाने उठल्या.
©️ सौ अंजली गोखले
मो ८४८२९३९०११
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈