☆ कवितेचा उत्सव ☆ दरवळ ☆ सुश्री निलांबरी शिर्के ☆
डोक्यावर जडभार
कडेवर छोटे पोर
पावलाच्यापुढे
साऱ्या आयुष्याचा घोर
कडेवरच लेकरू
उद्या चालाया लागेल
शिरावरचाही भार
जरा हलका होईल
उरातील स्वप्ने सारी
माझ्या बाळात पहाते
तळपायीच्या काट्यांची
मज जाणीव ना होते
आज देह कष्टविते
पोटच्या या गोळ्यासाठी
तोच होऊनीया मोठा
माझ्या आधाराची काठी
सुशिक्षित लेकराची
स्वप्ने कष्टात पहाते
स्वप्नपुर्ततेचे हासु
मुखी सदा विलसते
हेच ध्येय जगताना
सारी संपेल ही वाट
माझी अन लेकराची
नवी जन्मेल पहाट
त्या सोनेरी प्रकाशी
सारे जाई उजळून
जगण्यातील कष्ट सारे
स्वाभिमाने ये फुलुन
स्वाभिमानाच्या फुलांचा
चिरंतन दरवळ
आयुष्याचा सुख झरा
वाहणार झुळझुळ
© सुश्री निलांबरी शिर्के
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈